लातूर येथे बचतगटातील महिलांच्या मेळाव्यात मतदार जागृती
· ‘माविम’च्या सहाय्याने जिल्हा स्वीप कक्षाचा उपक्रम
लातूर, दि. 02 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या वतीने बचतगटातील महिलांचा मेळावा 30 एप्रिल रोजी लातूर येथील हनुमान मंदिर सभागृहात झाला. महिलांनी 7 मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
जिल्हा स्वीप कक्षाच्यावतीने मतदार जनजागृतीसाठी आयोजित या कार्यक्रमाला नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त तथा स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी रामदास कोकरे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे (माविम) जिल्हा समन्वय अधिकारी एम. एस. पटेल, स्वीप समन्वयक रामेश्वर गिल्डा उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करत रामदास कोकरे यांनी लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्व पटवून दिले. तसेच सर्व महिलांनी आपण स्वतः मतदान करण्यासोबतच आपल्या संपर्कातील महिला, नव्याने मतदार नोंदणी केलेल्या युवती यांनाही मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.
माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी एम. एस. पटेल यांनी प्रास्ताविकात महिला मेळाव्याचा हेतू विषद केला. प्रत्येक महिलेने मतदानाचा हक्क बजावावा. सोबतच कुटुंबातील इतर सर्व सदस्य, आपल्या बचत गटातील व वस्तीमधील सर्व महिलांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करून आपल्या जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी जिल्हा स्वीप समन्वयक रामेश्वर गिल्डा यांनी महिलांना मतदानाची शपथ दिली.
7 मे रोजी होणाऱ्या मतदाना करिता उपस्थित महिलांनी मी मतदान करणार तुम्ही पण मतदान करा व लोकशाही बळकट करा, अशा घोषणा देत अख्ये सभागृह दणाणून सोडले. माविम जिल्हा कार्यालयाचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी दिपक टेकाळे, परमेश्वर इंगळ, सूर्यकांत वाघमारे, किरण तांदळे आणि एकता लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक श्रीमती सुजाता तोंडारे, जय हिंद लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक सविता पाटील, जिजाऊ वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष श्रीमती संतोषी मदने व सचिव अश्विनी सुरवसे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमीच्या यशस्वीतेसाठी लोकसंचलित साधन केंद्राच्या सहयोगिनी श्रीमती शोभा वाकडे, श्रीमती सोनाली जाधव, सविता पेंढारकर , सुलक्षणा माटे, शोभा घोलप, दीपा वाघमारे, मीरा कांबळे सगिता गव्हाने, अनिता कांबळे, श्रद्धा कावळे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment