आज लातुरात द्वारकादास शामकुमार परिवाराच्या वतीने गुरुजनांचा सन्मान , निरूपण व संगीतमय कार्यक्रम : तुकाराम पाटील
लातूर : द्वारकादास शामकुमार परिवाराच्या वतीने शनिवार, दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी चार वाजता लातुरात शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरुजनांचा सन्मान सोहळा तसेच ख्यातनाम व्याख्याते व प्रबोधनकार प्रा. गणेश शिंदे यांचे निरूपण आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तथा महाराष्ट्राची महागायिका पुरस्कार प्राप्त गायिका सौ. सन्मिता धापटे - शिंदे यांचा गायनाचा एक वैचारिक, भक्तिमय अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती द्वारकादास शामकुमारचे संचालक तुकाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
द्वारकादास शामकुमार परिवाराच्या वतीने मागच्या सलग अकरा वर्षांपासून अशा प्रकारचा उपक्रम अविरतपणे राबविण्यात येत असल्याचे सांगून तुकाराम पाटील पुढे म्हणाले की, ज्या समाजाने आपल्याला भरभरून दिले आहे, त्या समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न म्हणून आपण सामाजिक उपक्रम राबवितो. द्वारकादास शामकुमार परिवाराची महाराष्ट्रात एकूण ८० शोरूम्स आहेत. त्यापैकी मराठवाड्यात २२ शोरूम असून मराठवाड्यातील सर्व शोरूममध्ये कामाची सुरुवात राष्ट्रगीताने होते. असा उपक्रम राबविणारे द्वारकादास शामकुमार हे राज्यातीलच नव्हे तर देशातील एकमेव कपड्यांचे शोरूम असावे, असेही त्यांनी बोलून दाखविले. आपल्या सर्वच शोरूममध्ये काम करणाऱ्या तरुणांना स्वतःच्या आई -वडिलांचा सांभाळ करणे क्रमप्राप्त केले आहे. आई - वडिलांना न सांभाळणाऱ्यांना आपण कामावरच ठेवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.
आंतरराष्ट्रीय महिला दिन असो की डॉक्टर्स डे , प्रत्येक उपक्रमादिवशी त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्याचे काम आपल्या परिवाराच्या माध्यमातून केले जाते . शिक्षक दिनानिमित्तही जास्तीत जास्त शिक्षक - शिक्षिकांचा सन्मान, गौरव करण्याचे काम शनिवारी केले जाणार आहे. समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान अतुलनीय असे असते. प्रत्येक गुरुजनांचा सन्मान व्हावा, अशी आपली प्रांजळ भावना आहे. गुरुजनांच्या सन्मान सोहळ्यासोबतच प्रा. गणेश शिंदे यांच्या प्रबोधनात्मक किर्तन , प्रबोधनाचा कार्यक्रमही यावेळी होणार आहे. त्याचप्रमाणे कलर्स मराठीच्या सूर नवा - ध्यास नवा च्या विजेत्या सौ. सन्मिता धापटे - शिंदे यांच्या गीत गायनाचा ' मोगरा फुलला ' हा संगीतमय कार्यक्रमही यावेळी संपन्न होणार आहे. त्याचप्रमाणे द्वारकादास शामकुमार परिवाराच्या वतीने प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र अभियान राज्यभर राबविण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने २ लाख कापडी पिशव्यांचे मोफत वितरणही यावेळी करण्यात येणार आहे. शनिवारी सायंकाळी चार वाजता दयानंद सभागृहात होणाऱ्या या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही तुकाराम पाटील यांनी यावेळी केले.
याप्रसंगी तुकाराम पाटील मित्रमंडळाचे प्राचार्य डॉ. राम बोरगावकर, प्राचार्य निलेश राजेमाने, रमेश बिरादार, प्राचार्य बाबुराव जाधव, शशिकांत पाटील , संभाजी नवघरे , राजूभाऊ पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
0 Comments