बीडमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्यावर बलात्काराचा गुन्हा; पीडित शिक्षिकेची पोलिसात फिर्याद
बीड : जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसून येत नाहीत, गेल्या वर्षभरापासून बीड जिल्हा गुन्हेगारी वृत्तांमुळे केंद्रस्थानी असून राजकीय हस्तक्षेप सातत्याने दिसून येतो. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आमदार धनंजय मुंडेंचे (Dhananjay munde) निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडसह गँगला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, अद्यापह येथील गुन्हेगारी कमी होताना पाहायला मिळत आहे. आता, बीडच्या (Beed) माजी जिल्हा परिषद सदस्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका शिक्षकेने दिलेल्या तक्रारीवरून हा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून नारायण शिंदे असं माजी जिल्हा परिषद सदस्याचे नाव आहे. शिंदे हे बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील सक्रिय कार्यकर्ता आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून, एप्रिल 2006 ते डिसेंबर 2022 या कालावधीत बीडसह इतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन नारायण शिंदे याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच, फ्लॅटसाठी आणि इतर कामासाठी पैसेही मागितले होते, तर जीवे मारण्याची धमकीही दिल्याचं पीडितेने दाखल तक्रारीत म्हटलं आहे. याच तक्रारीवरुन नारायण शिंदे याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 376, 376 (2) (एन), 406, 506 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, नारायण शिंदे नेकनुर जिल्हा परिषद सर्कलमधून माजी जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील ते पदाधिकारी आहेत. दरम्यान, या घटनेनंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर, 2006 पासून सुरू असलेल्या अत्याचाराची तक्रार आत्ता दिल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments