बनावट नोटाप्रकरणी धागेदोरे लातूरच्या माजी नगरसेवकापर्यंत ? - latursaptrangnews

Breaking

Friday, February 3, 2023

बनावट नोटाप्रकरणी धागेदोरे लातूरच्या माजी नगरसेवकापर्यंत ?

बनावट नोटाप्रकरणी धागेदोरे लातूरच्या माजी नगरसेवकापर्यंत ?



लातूर : बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी हिंगोली येथे नऊ जणांच्या आंतरजिल्हा टोळीला अटक करण्यात आली. या टोळीत लातूरमधील काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचाही समावेश आहे. आपली फसवणूक झाल्याची तक्रार एका महिलेने गस्तीवर असलेल्या पोलिसांकडे केली होती. या घटनेमुळे लातूर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हा नगरसेवक या टोळीचा म्होरक्या आहे की काय? अशी चर्चा लातूरमध्ये होतेय.


बुलडाणा जिल्ह्यातील एकाने एक लाखाचे तीन लाख देतो म्हणून १२ लाख ५० हजार रुपये घेऊन त्या ऐवजी ३९ लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा देऊन पळ काढला. हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना मुजफ्फर नजीर शेख या महिलेने या प्रकरणी तक्रार दिली होती. ती औरंगाबादची आहे. या महिलेच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी आरोपींचा मोबाइल नंबर ट्रॅक केल्याने आरोपी रीसोडच्या पुढे गेल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे हिंगोली, वाशिम, बुलढाणा पोलिसांना याची माहिती देऊन नाकाबंदी करायला सांगितले. अन् आरोपी खामगाव इथे येताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. खामगाव येथील अभय नगर येथील रहिवासी ज्ञानप्रकाश परमेश्वर जांगिड, तर घरिपुर नका येथील लखन गोपाल बजाज आणि राहुल चंदू सिंग ठाकूर यांना ताब्यात घेऊन घराची झाडाझडती घेतली. यात ७५ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा आढळून आल्या. या तीन आरोपींसह लातूरमधील काँग्रेसचा माजी नगरसेवक सुनील जांगवाड, सोमनाथ दाबके, उदगीरच्या विनोद शिंदे, नांदेडच्या विलास वडजे, केशव वाघमारे, गुणाजी मधुले यांना पोलिसांनी या प्रकरणी अटक केली.


आंतर जिल्हा टोळीचे धागेदोरे

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये लातूर, नांदेड जिल्ह्यातील आरोपींचा समावेश आहे. शिवाय ज्या महिलेची फसवणूक करण्यात आली ती औरंगाबादची आहे. त्यामुळे या बनावट नोटा प्रकरणाचे धागेदोरे आणखी इतर जिल्ह्यातही सापडण्याची शक्यता नाकारता येत आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.


'बच्चों की बँक' च्या बनावट नोटा


ताब्यात घेण्यात आलेल्या नोटा या खेळण्यातील 'बच्चों की बँक' या बनावटीच्या आहेत. आरोपींनी या बनावट नोटांच्या बंडलांच्यावर आणि खालच्या बाजूने प्रत्येकी एक खरी खुरी नोट लावली होती आणि या बनावट नोटा खपवत होते.


बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; ९ जण ताब्यात

No comments:

Post a Comment