मुरुड प्रतिनिधी सा. लातूर सप्तरंग / श्रीकांत टिळक
मुरुड : लातूर तालुक्यातील मुरुड येथे भाजपमधील अंतर्गत संघर्षाने आता उघड बंडाचे स्वरूप धारण केले असून, अनेक वर्षे पक्षासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संयम अखेर संपल्याचे चित्र आहे. पक्षांतर्गत अन्याय, वरिष्ठ नेतृत्वाकडून सातत्याने होणारे दुर्लक्ष आणि विकासाच्या नावाने केवळ घोषणांचीच पुनरावृत्ती यामुळे भाजपमधून मोठ्या प्रमाणात पक्षांतर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुरुड शहरात प्रत्यक्ष सत्ता नसतानाही गेली अनेक वर्षे पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांनी भाजपची संघटना जिवंत ठेवली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे तब्बल १६ उमेदवार निवडून येणे हे त्याचे ठळक उदाहरण मानले जाते. मात्र सत्ता मिळाल्यानंतर याच निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याचे काम काही वरिष्ठ नेत्यांकडून जाणीवपूर्वक केले जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या.
विशेष म्हणजे ग्रामीण भागातील उपसरपंच पदासाठी उमेदवार ठरवताना स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निर्णय लादले जात असल्याची भावना तीव्र होत आहे. उपसरपंच पदाच्या निवडीत अंतर्गत गटबाजीला जाणीवपूर्वक खतपाणी घातले गेल्याचा आरोपही कार्यकर्त्यांकडून होत असून, याच कारणातून मुरुड भाजपमध्ये असंतोषाचा स्फोट झाल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.
कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, निवडणुकीनंतर मुरुड शहरासाठी एकही ठोस विकासकाम मंजूर करण्यात आले नाही. पक्ष संघटना पूर्णपणे बाजूला ठेवून उपसरपंचाची निवड करण्यात आली. त्यानंतर पदाचा कार्यकाळ स्पष्ट न करता संबंधित व्यक्तीने तब्बल तीन वर्षे पदावर राहणे आणि नंतर अचानक काही ‘वरिष्ठांच्या’ आदेशावरून राजीनामा मागण्यात येणे, हे प्रकार कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरले.
राजीनाम्यानंतर अवघ्या काही दिवसात नव्या उपसरपंचाची घाईघाईत निवड करण्यात आल्याने पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, लातूर तालुक्यातील इतर गावांवर आमदार निधीचा अक्षरशः पाऊस पडत असताना, मुरुड शहराला मात्र आजवर एक रुपयाचाही निधी मिळालेला नाही, असा संतप्त आरोप निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केला आहे. या निधीअभावी मुरुड शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि स्वच्छता यांसारखे मूलभूत प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिले असून, नागरिकांना रोजच्या जीवनात गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे.
"लातूर ग्रामीणचे आमदार मुरुडकडे अक्षम्य दुर्लक्ष; रस्त्यांचा प्रश्न चिघळला, सरपंच-उपसरपंच हतबल"
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुरुडकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात असून, निधीअभावी मुरुड शहरातील व परिसरातील रस्त्यांचा प्रश्न अधिकच बिकट बनला आहे. वर्षानुवर्षे रखडलेल्या रस्ते विकासाच्या कामांवर कोणताही ठोस तोडगा निघत नसल्याने ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच नागरिकांच्या रोषासमोर अक्षरशः हतबल झाल्याचे चित्र आहे.
पावसाळ्यात चिखल, तर उन्हाळ्यात धुळीचे लोट अशी अवस्था असलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे. शाळकरी मुले, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र, वारंवार निवेदने, मागण्या व पाठपुरावा करूनही निधी मंजुरी होत नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनाही नागरिकांना उत्तर देता येईनासे झाले आहे.
सरपंच व उपसरपंचांनी आतापर्यंत केवळ आश्वासनांची मलमपट्टी करत परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, समस्यांचा डोंगर वाढत असताना आश्वासनांवर विश्वास ठेवण्यास नागरिक आता तयार नसल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामसभांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, लोकप्रतिनिधींच्या संयमाचीही कसोटी लागत आहे.
“आमदार निधी इतर भागात खर्च होत असताना मुरुडला मात्र डावलले जात आहे. रस्ते हा मूलभूत प्रश्न असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. लवकरात लवकर निधी मंजूर करून रस्त्यांच्या कामांना सुरुवात करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
एकीकडे विकासाच्या घोषणा आणि दुसरीकडे मुरुडची दयनीय अवस्था यातील तफावत अधिकच ठळक होत चालली असून, लातूर ग्रामीणच्या आमदारांची भूमिका आता थेट प्रश्नांकित केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एका ज्येष्ठ नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “आम्ही कर भरतो, मतदान करतो; पण विकासाच्या वेळी मात्र मुरुड कायम दुर्लक्षित राहतो. इतर गावांत कामे दिसतात, आमच्याकडे फक्त आश्वासनं दिसतात.!”
एका तरुण नागरिकाने संताप व्यक्त करत म्हटले, “शहरातील रस्ते अक्षरशः मृत्यूचे सापळे बनले आहेत. पावसाळ्यात शहरात चालणे तर दूरच, उभे राहणेही कठीण होते. मग आमदार निधी नेमका कुणासाठी असतो ? की तो केवळ निवडणुकीपुरता वापरून, नागरिकांना मतदानाची बँक समजले जाते की काय ?” अशाही चर्चांना उधाण आले आहे.
मुरुड शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, महिलांसह नागरिकांचा संयम अखेर सुटला आहे. “फिल्टर प्लांट आणि पाण्याच्या टाक्या असूनही तब्बल वीस ते पंचवीस दिवस नळाला पाणी नाही. अंतर्गत वाद, नियोजनाचा अभाव आणि निधीअभावी नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत. कुठे गेली ‘हर घर नल’ योजना? आजपर्यंत ती सर्वसामान्यांच्या दारात पोहोचलेलीच नाही. या योजनेचे सूत्रसंचालन नेमके कोण करत आहे आणि त्यावर नियंत्रण कुणाचे आहे?” असा थेट, संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला.
नागरिकांचा वाढता रोष पाहता लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मुरुडला जाणीवपूर्वक विकासापासून दूर ठेवले जात आहे का? असा सवाल आता उघडपणे चर्चेत आला आहे. वेळेत ठोस निर्णय व तातडीची दखल न घेतल्यास हा असंतोष भविष्यात अधिक तीव्र, संघटित आणि आक्रमक स्वरूप धारण करण्याची दाट शक्यता आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेविरोधात कधीही रस्त्यावर उतरण्याचा इशारा संतप्त नागरिकांकडून देण्यात आला आहे.
या सर्व प्रकारांमुळे भाजप नेतृत्वाने मुरुडला जाणीवपूर्वक वाऱ्यावर सोडल्याची भावना आता उघडपणे व्यक्त केली जात आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका अवघ्या काही ने दिवसावर येऊन ठेपल्या असताना, काही प्रमुख पदाधिकारी आणि जुने कार्यकर्ते अत्यंत कठोर व धक्कादायक निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा दबक्या आवाजात नाही, तर उघडपणे होत आहे.
दरम्यान, या अंतर्गत संघर्षाचा थेट राजकीय फायदा विरोधी पक्षांना होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. विरोधी पक्षनेत्यांनी विविध सभांमध्ये मुद्दे मुद्दाम नोंदवून ठेवत, योग्य क्षणाची वाट पाहत असल्याची चर्चा आहे. आतापर्यंत साठवून ठेवलेले ‘पिटारा ’ आता लवकरच उघडले जाणार असून, हा हल्ला सौम्य नसून भाजपसाठी मोठा राजकीय धक्का ठरणार, अशीच चिन्हे दिसत आहेत.
या घडामोडी प्रत्यक्षात आल्यास मुरुडमध्ये भाजपचे राजकीय गणित पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षांतर्गत असंतोष उफाळून आल्याने नाराज व निष्ठावंत कार्यकर्ते पक्षत्यागाच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा असून, हे कार्यकर्ते नेमक्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे संपूर्ण मुरुड शहराचे लक्ष लागले आहे. आगामी काळात होणाऱ्या या घडामोडी मुरुडच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम घडवून आणू शकतात.
0 Comments