आशादीप परिवार आणि मनपाच्या संयुक्त विद्यमाने
१२१ टीबी रुग्णांना न्यूट्रिशनल सपोर्ट किटचे वाटपलातूर : येथील आशादीप परिवार आणि लातूर शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री टीबी मुक्त अभियान अंतर्गत १२१ टीबी रुग्णांना मंगळवार, दि. १७ जून २०२५ रोजी न्यूट्रिशनल सपोर्ट किटचे वाटप करण्यात आले.
या अभिनव उपक्रमास लातूर शहर महानगरपालिकेच्या नूतन आयुक्त सौ. मानसी मीना यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी आशादीप परिवाराचे सर्वश्री डॉ. अशोक पोद्दार, रामेश्वर सोमाणी, विजय पस्तापुरे , श्याम धूत, राजू मिनियार, नरेंद्र भुतडा, संजीव भार्गव, रतन बिदादा आदी मान्यवरांनीही उपस्थिती होती. लातूर शहरांमध्ये फूड बास्केट देण्याचा राबवण्यात येणारा उपक्रम हा अत्यंत स्तुत्य असून यामुळे मला आनंद झाला आहे, असे मत मनपा आयुक्त श्रीमती मानसी मीना यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच आरोग्य विभाग मनपा यांच्या या कामी समन्वयाबद्दल कौतुक केले. फक्त यावरच न थांबता टीबी रुग्णांना वर्षभराकरिताचे न्यूट्रिशनल किटचा पुरवठा होणेकामी नियोजन करण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.
लातूर जिल्हा क्षयरोग मुक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत मोफत औषधींचा पुरवठा करण्यात येतो. परंतु औषधासोबतच रुग्णाच्या पूर्ण बरे होण्याकरिता आवश्यक असणाऱ्या पोषण आहाराच्या पूर्ततेसाठी लोक सहभागामधून न्यूट्रिशनल सपोर्ट किट देऊन निक्षय मित्र होता येते. निक्षय मित्र होण्याची प्रेरणा घेऊन लातूर शहरामधील नामांकित अस्थिशल्य चिकित्सक डॉ. अशोक पोद्दार यांनी टीबी रुग्णांकरिता त्यांच्या मित्रमंडळींना देखील या कामी सक्रिय योगदान देण्याकरिता प्रोत्साहित केले आहे, याबद्दल सौ. मानसी मीना यांनी डॉ. पोद्दार यांच्या कार्याचेही कौतुक केले. वैद्यकीय सेवेसोबतच डॉ.अशोक पोद्दार सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात. आपल्या मित्र परिवारांनाही सामाजिक कार्यात सहभागी होऊन वेळोवेळी अशा प्रकारची मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. त्याचप्रमाणे आशादीप परिवाराचे सदस्य संजीव भार्गव यांनी दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये ९१ किमी अंतर निर्धारित वेळेत यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचा मनपा आयुक्त सौ. मानसी मीना यांच्या हस्ते याप्रसंगी सत्कार करण्यात आला. कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये एकूण ४१३ भारतीयांनी सहभाग नोंदविला असून त्यामध्ये लातूरच्या तिघांचा समावेश होता. संजीव भार्गव यांच्या व्यतिरिक्त लातूरचे डॉ. ब्रिजमोहन झंवर व डॉ. आरती झंवरही या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.
यावेळी टीबी रुग्णांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते न्यूट्रिशनल किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारती यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ऋषिकेश खरोळकर यांनी केले. यावेळी दात्यांसह मनपाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्यासह आशा स्वयंसेविका आणि क्षयरोग विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment