दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत योजनांचा लाभ घ्यावा
- मनपा आयुक्त श्रीमती मानसी
यांचे आवाहन
लातूर /प्रतिनिधी: शहरातील विविध घटकांसाठी केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रात राबवले जात आहे. यातील विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी केले आहे.
मनपा अंतर्गत शहरात उपायुक्त वसुधा फड यांच्या मार्गदर्शनात या अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत 1560 बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. यात शहरातील जवळपास 16 हजार गरीब,गरजू, मागासवर्गीय, शहरी गरीब व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांचा सहभाग आहे. गटाच्या स्थापनेनंतर 3 महिन्यांनी गटाचे मूल्यांकन करून प्रति बचत गट 10 हजार रुपये प्रमाणे केंद्र शासनाच्या पैसा पोर्टल च्या माध्यमातून 1231 बचत गटांना 1 कोटी 23 लक्ष रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.6 महिने ते 1 वर्षानंतर बचत गटाला बँकेच्या माध्यमातून अल्प व्याजदरात कर्ज मिळते शहरातील. 1382 बचत गटांना 35 कोटी रुपये कर्ज यातून मिळाले आहे. बचत गटातील जवळपास 4000 महिलांनी छोटे व्यवसाय उभे करण्यासाठी याचा लाभ घेतला आहे.
अभियानाच्या माध्यमातून स्वयंरोजगार कार्यक्रमात 850 वैयक्तिक लाभार्थ्यांना 840 लक्ष रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देत व्यवसाय वाढीस हातभार लावण्यात आला आहे.
या अभियानाच्या माध्यमातून नागरी बेघर निवारा योजना राबवली जाते.लातूर येथे विवेकानंद रुग्णालयाच्या पाठीमागे मनपा शाळा क्रमांक 4 येथे 100 बेघर नागरिक वास्तव्य करतील इतक्या क्षमतेचा 'नंदनवन' नागरी बेघर निवारा सुरू करण्यात आला आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी आश्रय घेणारे वृद्ध, अपंग, भिकारी, बालके, महिला, निराश्रित व्यक्ती व बेवारस अशांना येथे आश्रय मिळतो.आज घडीला 30 ते 35 बेघर नागरिक येथे लाभ घेत आहेत. या केंद्रात महिला, पुरुष व दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरातील पथ विक्रेत्याना अभियानाच्या माध्यमातून मदत केली जाते. लातूर शहरातील 2976 फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण करून कागदपत्रे उपलब्ध करून देणाऱ्या 1735 पथ विक्रेत्याना ओळखपत्र व व्यवसाय परवाना देण्यात आला आहे.
प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधीच्या माध्यमातून शहरातील 7013 पथविक्रेत्यांना 7 कोटी 3 लक्ष रुपये कर्ज बँकेकडून अल्प व्याज दराने उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात आता सुधारणा करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 15 हजार रुपये कर्ज घेतले व ते फेडले तर पुढे 25 हजार रुपये,50 हजार रुपये असे कर्ज दिले जात आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत आलेल्या हजारो नागरिकांच्या अर्जांची छाननी करण्यात आली आहे.
शहरातील पात्र लाभार्थ्यांनी दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी केले आहे.
0 Comments