https://www.amazon.in/bb/registration/start/?_encoding=UTF8&ref_=cct_cg_12345_1a1&pf_rd_p=9acff4bf-eee0-4854-9cca-99af421dadcf&pf_rd_r=HJNTZM43QKTMGKZ3FXDN

समाजाची पुनर्बांधणी काळाची गरज



 समाजाची पुनर्बांधणी काळाची गरज


काही दिवसांपूर्वी श्रद्धा वालकर या तरुणीच्या झालेल्या निर्घृण हत्येमुळे पशुत्व ही वरमले! अख्खा देश, जनता, समाजमन ढवळून निघाले. काळजात चर्र झाले! तपास सुरू झाले, यंत्रणा सज्ज झाल्या, समाजमाध्यमे सक्रिय झाली, वर्तमानपत्रे, टी.व्ही, इंटरनेट सेवा या सर्वांनी यथोचित वार्तांकन सुरू केले, बातमी हा हा म्हणता सर्वत्र पोहोचली. गेल्या काही दिवसांपासून पालकवर्ग अस्वस्थ झाला आहे, शैक्षणिक संस्था हवालदिल झाल्या. आपण एक समाज म्हणून कुठे जात आहोत याचा मागोवा घेण्याची उत्कट निकड अशा भयकारी घटना घडून गेल्या नंतरच निर्माण व्हावी ही आपल्या समाजाची सर्वात मोठी कमजोरी ठरते आहे. अशी घटना घडली की तेवढ्यापुरती आणीबाणी सदृश्य स्थिती निर्माण होते. मोठमोठ्या चर्चांची गुऱ्हाळे सुरू होतात. विविध माध्यमांतून व्यक्त होणारे व्यक्त होत जातात. मोठ मोठे मोर्चे, आंदोलने, धरणे, निदर्शने हे सर्व काही होते, पण फार फार तर पंधरा दिवस ते महिनाभर हे वातावरण कायम असते आणि नंतर ते जे कायमस्वरूपी थंडावते ते पुढची घटना घडेपर्यंत! समाजात सर्व स्तरांवर होत असलेल्या आमूलाग्र बदलांची ही विषारी फळे आहेत. विषवल्ली बांडगूळासारख्या फोफावत चालल्या आहेत. आधुनिकतेच्या नावाखाली स्विकारले गेलेले प्रथितयश आणि तथाकथित सेलेब्रिटी संस्कृतीमधून निपजलेले हे लिव इनचे खूळ! अशी विविध प्रकारची सामाजिक खुळे आज पिकात वाढणार्‍या धसकटागत निदर्शनास येत आहेत. त्या खुळास बळी पडलेली श्रद्धा वालकर ही तरुणी... अशा अनेक श्रद्धा आणि अनेक मुली व स्त्रिया आज प्रचंड यातनामय जीवन जगत आहेत. त्यांच्यावरील अत्याचाराच्या कहाण्या मन हेलावून टाकतात, हे सर्व अर्थातच समाजातील प्रत्येक घटकातील महिलांसोबत कमी अधिक प्रमाणात सुरूच असते, अशा वेळी समाज म्हणून आपण मूग गिळून गप्प बसणे भूषणावह नाही. असे नव्हे की अत्याचार स्त्रियांवरच होतात, तर ते लहान मुले, पुरुष आणि वंचित घटकांतील सर्वांवरच सुरू असतात. अशा परिस्थितीत जे क्रौर्याचे विध्वंसक रूप पुढे येते तो समाजासमोर खरा प्रश्न आहे. श्रद्धाच्या निमित्ताने ते सर्व प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आलेत इतकेच! या प्रकरणात जी असंख्य जीवघेण्या प्रश्नांची साखळी निर्माण झाली तिचे करायचे काय? आपल्या संस्कृतीत लिव इन चे समर्थन करण्याचे एकही कारण सापडत नाही, आधुनिकतेचे हे भयानक विकृत अपत्य आपण गोंजारत चाललो आहोत... त्याचवेळी आपण पालक म्हणून देखील कमी पडतो आहोत, समाज म्हणून आपणा सर्वांना नितांत बदलाची आवश्यकता आहे. त्याच बदलांची आवश्यकता अधोरेखित करण्याचा हा अल्पसा प्रयत्न... 

आधुनिकता म्हणजे काय हे उत्तर आधुनिकतेकडे झुकून सुद्धा आपणास उमजत नाही हे आपले दुर्दैव आहे. आधुनिकतेच्या नावाखाली अनियंत्रित स्वैराचार स्विकारला तर परिणाम असेच होणार. आपले राहणीमान, पेहराव, कपडे, बोलणे, वागणे, आपल्या सवयी, आपले आहार, विहार हे सर्व आधुनिक बनवण्यासाठी आपण अत्यंत केविलवाणे प्रयत्न करत आहोत. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण जणू काही आपल्या रक्तात भिनले आहे असे दिसते. आधुनिक म्हणजे जर पौष्टिक, घरंदाज, सुसंस्कृतपणा यांचा त्याग करणे असेल तर त्या आधुनिकतेला चार हात लांब ठेवलेलेच बरे. ज्या तरुणाची सावली देखील स्वतःवर पडू द्यायला नको त्या तरुणाबरोबर ही सालस पोरगी तीन वर्षे राहते, प्रचंड अत्याचार सहन करते आणि यादरम्यान कुटुंबीय, बहीण भाऊ मित्र - मैत्रिणी, यांच्याशी ती संपर्क ठेवत नाही किंवा फारच नगण्य संपर्क ठेवते. आणि हे भेटतात कसे तर डेटिंग अॅप वरून! डेटिंग अॅप हा शब्दच या दोन तीन दिवसांपूर्वी पहिल्यांदा ऐकला! विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा गैरवापर करून हा मानव समाज त्यांना किती बदनाम करणार आहे हा मोठाच संशोधनाचा विषय ठरतो आहे. 'आफताब' म्हणजे 'सूर्य' आणि कर्म अंधाराला देखील लाजवेल असे, काळ्या कळकट कोळशापेक्षा काळे आणि डांबरापेक्षाही डांबरट. या भूतलावरील पशूंच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर त्या अफताब एवढा क्रूर पशू शोधून सापडणार नाही, अर्थात असे अनेक आफताब आज समाजात सापडत आहेत ही अत्यंत चिंतनीय आणि भयावह बाब आहे.

जात, धर्म इत्यादींचे राजकारण तर आपले नेहमीचेच ठरलेले आहे, कोणत्याही गंभीर प्रकरणात जात, धर्म आणि पंथ असे अनेक पातळ्यांवरचे राजकारण घुसवण्यात आपला देश पुढे पुढे सरकतो आहे हे लांछनास्पद आहे. केवळ आगीत तेल ओतण्याचा हा प्रकार आहे. आपणा सर्वांनाच प्रत्येक घटनेच्या मुळाशी जाऊन छडा लावणे क्रमप्राप्त आहे. अर्थात हे साध्य करण्यासाठी आपणास स्वतःला बदलणे, तसेच समाज म्हणून आपली पुनर्रचना करून घेणे आवश्यक ठरते. संस्कृतीच्या आधुनिकीकरणाच्या नावाखाली जे विद्रूपीकरण स्विकारले जात आहे, त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणे हेच आपल्या हातात आहे. प्रेमाला विरोध नसावा, पण ज्याला प्रेमाची व्याख्या देखील पुरती उमजत नाही अशा व्यक्तीला प्रेम करण्यासाठी निवडले जाणे म्हणजे स्वतःचा विनाश ओढवून घेणे होय याचे ज्ञान आपल्या भावी पिढ्यांना करून देणे ही आपल्या सर्वांची म्हणजे पालक, शिक्षणसंस्था आणि समाज या तिहेरी व्यवस्थेची नैतिक जबाबदारी आहे. आपल्या पाल्यांना जोडीदार निवडीसाठी विरोध नसावा, पण योग्य जोडीदाराची निवड करण्याचे संस्कार त्यांच्यावर करणे ही काळाची गरज आहे. आपल्याकडे सर्रासपणे पालकवर्ग मुलांना स्वतःची खाजगी मालमत्ता समजून त्यांच्यावर अगदी बालपणापासून ते जोडीदार निवडीपर्यतचे संपूर्ण निर्णय थोपवत असतो, या लादलेल्या निर्णयांमुळे त्यांच्याशी मोकळा संवाद करण्याचा प्रघात आपल्याकडे अजूनही  रुजताना दिसत नाहीच... यातूनच मग विरोध, उठाव, बंड आणि अत्यंत टोकाचे निर्णय घेत घातपात करणे, करून घेणे असे विनाशकारी प्रकार होत राहतात. आता तर पालक आणि पाल्य यांच्यातील संवाद पुरता हरवत चालला आहे. याविषयी ओरड होत असते. याचे प्रमुख कारण म्हणजे असंख्य वेगवेगळ्या गोष्टींमधे मनुष्य प्राण्याने स्वतःला गुंतवून घेतले आहे. संपत्तीसाठी संततीकडे दुर्लक्ष केले जात आहे. नको त्या अस्मिता आणि मुद्द्यांना प्रतिष्ठेचे कोंदण जोडले जाते, त्यातूनच मग बंडखोरीचा उदय होतो आणि भावी पिढ्या नको त्या गोष्टींच्या आहारी जात त्यातून विकृतींचा जन्म होतो. तेव्हा समाज म्हणून आपण सर्व पातळीवर क्रांतिकारक बदल स्वीकारणे अनिवार्य आहे. आपली मुलगी ही दुसर्‍याच्या दुष्ट कपटी मुलाला सुधारण्याचे साधन होऊ शकत नाही. आपल्या दिवट्यांसाठी दुसर्‍यांच्या लेकीबाळी आयुष्यातून उठवणाऱ्या पालकांनी 'राजमाता जिजाऊ' , 'राजमाता अहिल्याबाई' होळकर, 'मदर इंडिया' या स्त्रियांच्या व्यक्तिरेखा जरूर अभ्यासाव्या. या भूमीला स्त्री दाक्षिण्याची अजरामर परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. राजा राम मोहनराय, फुले, शाहू, आंबेडकर, महर्षी कर्वे यांचा उज्ज्वल मागोवा आहे. ही वेळ आहे पालकांनी सजग होण्याची, ही वेळ आहे स्त्रीने निर्बुद्ध न राहता निर्भीडपणे समाजातील कुप्रथांचा विरोध करण्याची, आणि त्याचवेळी स्वतःचा तोल ढळू न देण्याची. समाज म्हणून गहन चिंतन करत उधळते वारू रोखण्याची आम्हा शिक्षणव्यवस्थेच्या पाईकांची तारेवरची कसरत ठरते ती याचमुळे आणि तेच आमचे विहित कर्तव्य देखील आहे.


- डॉ. संगीता जी. आवचार,

उपप्राचार्य व इंग्रजी विभाग प्रमुख

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी 

चल भाष्य : 9767323290

Post a Comment

1 Comments

  1. मनःपूर्वक हार्दिक धन्यवाद

    ReplyDelete