समतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देणार –  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

            पुणे, दि. ९ : समाजातील विषमता दूर करून समतेसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देण्यात येईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

            महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्यावतीने सामाजिक दायित्व निधीतून ९ सामाजिक संस्थांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ येथे आयोजित या कार्यक्रमाला महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे आणि संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, काही सामाजिक संस्था समाजातील विषमता दूर करण्यासाठी सेवाभावीवृत्तीने आणि चांगले संस्कार सोबत घेऊन कार्य करत आहेत याचे समाधान वाटते. अशा संस्थांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांनी त्यांच्या कार्याचे चांगल्याप्रकारे सादरीकरण करून प्रस्ताव सादर करावेत. राज्य सरकारच्यावतीने सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून या संस्थांना आर्थिक मदत उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

            आज महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने ९ संस्थांना आर्थिक मदत देण्यात आली याचा आनंद होत आहे, असे सांगून त्यांनी सामाजिक संस्थांच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.

आर्थिक मदत देण्यात आलेल्या संस्था

            जनसेवा न्यास हडपसर, सेवा आरोग्य फाऊंडेशन, पुणे, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान, सिंहगड रोड, पुणे, स्वरूप वर्धिनी, पुणे, विवेक व्यासपीठ,पुणे, वनांचल समृध्दी अभियान फाऊंडेशन, नवी मुंबई, हिंदुस्थान प्रकाशन संस्था,मुंबई व भोगावती सांस्कृतिक मंडळ, कोल्हापूर या संस्थांना यावेळी आर्थिक मदत देण्यात आली.

            या संस्था समाजातील झोपडट्टीवासीय नागरिकांना आरोग्य सुविधा, मुलांसाठी अभ्यासिका, संस्कार वर्ग, किशोरी विकास प्रकल्प, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा, साक्षरता, सामाजिक विकासासाठी शिक्षण, पर्यावरण व दुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकास करण्यासाठी वसतिगृहे, इत्यादी माध्यमातून कार्य करत आहेत.

०००



from महासंवाद https://ift.tt/evTH1yQ
via IFTTT https://ift.tt/ok3ehAL

Post a Comment

Previous Post Next Post