विधानसभा निवडणूक : प्रचारात गाजले 'हे' 5 मुद्दे, कसा होईल निकालावर परिणाम?
विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपलेला आहे. उद्या (20 नोव्हेंबर) मतदान पार पडेल.
भाजप आणि काँग्रेसचे अनेक राष्ट्रीय नेते प्रचारात उतरले. पंतप्रधान मोदी, अमित शाह, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या सभा झाल्या. महाविकास आघाडी आणि महायुतीने आपल्या जाहिरनाम्यात मतदारांना थेट पैसे मिळतील, अशा योजनांची घोषणा केली.
पण या संपूर्ण प्रचारात महाराष्ट्राचे नेमके कोणते मुद्दे गाजले? कोणत्या मुद्द्यांवर प्रचार झाला? हे मुद्दे निवडणुकीच्या निकालावर किती परिणाम करतील का? याचा घेतलेला हा आढावा :
1) लाडकी बहीण योजना
निवडणुकीचा प्रत्यक्ष प्रचार सुरू होण्याआधीच एक मुद्दा गाजला तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा.
मध्य प्रदेशात भाजपचं सरकार येण्यासाठी लाडली बहीण योजनेचा फायदा झाला. त्यामुळे महायुती सरकारनं सुद्धा निवडणुकीच्या दोन महिन्यांआधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली.
महिला मतदार जास्त असल्यानं महायुतीनं त्यांना टार्गेट करत ही योजना राबवली. त्यानंतर या योजनेची गावागावात चर्चा सुरू झाली. निवडणुकीच्या प्रचारातही जाहिरातीच्या माध्यमातून, सभांमधून या योजनेचा प्रचार करण्यात आला. लाभार्थी महिलांचे मेळावे घेण्यात आले.
काँग्रेस ही योजना बंद करणार असल्याचा प्रचार महायुती सरकारनं केला. महायुतीच्या प्रत्येक उमेदवारांनी सावत्र भाऊ म्हणजे विरोध पक्ष आपली योजना बंद करणार असल्याचं मतदारांना सांगितलं. त्यामुळे या योजनेचा कुठे ना कुठे महायुतीला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
म्हणूनच कदाचित महाविकास आघाडी सरकारनं त्यांच्या जाहिरनाम्यात महालक्ष्मी योजना आणत महिलांना 3000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं.

पण एकीकडे या योजनेचा फायदा होईल, असं बोललं जातंय, तर दुसरीकडे मात्र आम्हाला फुकटाचे पैसे नको हाताला काम द्या, अशीही मागणी अनेक महिलांनी केली. आमच्या शेतमाला भाव द्या अशीही मागणी महिला शेतकऱ्यांनी केली.
त्यामुळे हा पैसा निवडणुकीसाठी दिला जातोय अशी भावना लाभार्थी महिलांची झालेली आहे. आता प्रचारात जितकी ही योजना प्रभावीपणे राबविण्यात आली, तितका त्याचा फायदा खरंच होतो का? हे पाहावं लागेल.
2) हिंदुत्वाच्या मुद्द्यावरील प्रचार
निवडणुकीचा प्रत्यक्ष प्रचार सुरू होताच सभांचा धडाका सुरू झाला आणि यातच भाजपनं आपला हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारात आणला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्याच सभेत 'बटेंगे तो कटेंगे' हा नारा दिला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक हैं तो सेफ हैं' असा नारा दिला.
भाजपच्या नेत्यांनी सुद्धा आपल्या सभांमध्ये या घोषणेचा वापर करत हिंदू मतदारांना भाजपच्या छत्राखाली एकत्र येण्याचं आवाहन केलं.
दुसरीकडे, भाजपनं जिथं हिंदुत्वाचा मुद्दा जास्त चालू शकतो, अशा काही ठिकाणी हैदराबादच्या माधवी लता, बागेश्वर बाबा यांचे कार्यक्रम आयोजित केले.
या निवडणुकीत भाजपनं कट्टर हिंदुत्वाची लाईन घेतलेली पाहायला मिळाली. पण महाराष्ट्रासारख्या राज्यात 'बटेंगे तो कटेंगे'सारखं कट्टर हिंदुत्व चालणार नाही, असं भाजपच्या काही नेत्यांनी बोलून दाखवलं.

अशोक चव्हाण, विखे-पाटील यांनी या घोषणेसोबत असहमत असल्याचं सांगितलं. तरीही देवेंद्र फडणवीसांनी हा मुद्दा प्रचारात उचलून धरला.
यापुढे जात त्यांनी प्रचाराच्या शेवटच्या काही दिवसांत व्होट जिहादचा आरोप करत ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते मौलाना खलील उर्ररहमान सज्जाद नोमानी यांची क्लीप ऐकवली.
यात महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नाना पटोले, शरद पवार यांची नावं होती. तुम्ही व्होट जिहाद करणार असाल तर आम्ही मतांसाठी धर्मयुद्ध करू असंही फडणवीस म्हणाले.
भाजप धर्माच्या नावाखाली लहान लहान जातींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी हरयाणा निवडणुकीतही हा प्रयोग केला होता. पण महाराष्ट्रात भाजपला या हिंदूत्वाचा फायदा होतो का? हे बघणं महत्वाचं आहे.
3) अदानींवरून आरोप-प्रत्यारोप
उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरून काँग्रेसनं भाजप आणि मोदींना नेहमीच टार्गेट केलं आहे. या निवडणुकीत सुद्धा विरोधी पक्षांनी अदानींचा मुद्दा लावून धरला.
राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात महाराष्ट्र अदानींना विकू देऊ नका, असं म्हणत भाजपवर टीका केली, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील अदानींच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला.
मुंबईत उद्धव ठाकरेंची सभा झाली. यावेळी ठाकरेंनी कोल्हापूरपासून तर चंद्रपूरपर्यंत जिथं जाईल तिथं महायुती सरकारनं सगळे उद्योधंदे, शाळा अदानीला दिल्याचा आरोप केला.

प्रचारसभांमध्ये हा मुद्दा तर गाजलाच. पण, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या “एक हैं तो सेफ हैं”च्या नाऱ्यावर मोदी, अदानी असा फोटो, तर एका पेपरवर धारावीचा नकाशा असे दोन पोस्टर त्यांनी तिजोरीतून बाहेर काढले.
मोदी, शाह, अदानी एक आहेत आणि अदानी सेफ आहे, असा आरोप त्यांनी केला.
त्यानंतर भाजपचे विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे अदानींसोबत कसे संबंध आहेत, यासाठी प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री गेहलोत यांचे अदानींसोबतचे फोटो दाखवून राहुल गांधींनी उत्तर दिलं.
प्रचारात अदानींना मुद्दा गाजला असला तरी महाराष्ट्रातल्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर त्याचा किती फायदा होतो हे बघणं महत्वाचं आहे.
4) सोयाबीनचा मुद्दा
शेतमालाला मिळणाऱ्या तुटपुंज्या भावाचा प्रश्न तर निवडणुकीत होताच. पण विरोधी पक्षांनी तो मुद्दा लावून धरला नव्हता. महायुती आणि महाविकास आघाडीनं त्यांच्या जाहीरनाम्यात हमीभावाचं आश्वासन दिलं.
पण ऐन निवडणुकीच्या काळात सोयाबीनचे भाव घसरले आहेत, हमीभाव 4892 रुपये असला तरी कुठं 3 हजार रुपये, तर साडेतीन हजार रुपये दरानं सोयीबानची खरेदी सुरू आहे याकडे सुरुवातीला लक्ष विरोधी पक्षाचं लक्ष गेलं नाही. पण, प्रचार मध्यावर आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना ही बाब लक्षात आली.
त्यांनी प्रचार मध्यावर आल्यावर का होईन पण सोयाबीनच्या भावाचा मुद्दा लावून धरला. काँग्रेसनं सरकार शेतकरी विरोधी कसे आहे असं म्हणतं हा मुद्दा त्यांच्या प्रचारातून जनतेपर्यंत पोहोचवला.

राहुल गांधींनी सोयाबीनला 7 हजार रुपये भाव देण्याचं आश्वासन त्यांच्या सभेत दिलं. त्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली. शेवटी फक्त हमीभावाचं आश्वासन देणाऱ्या भाजपला, पंतप्रधान मोदींनाही याची दखल घ्यावी लागली आणि महायुतीचं सरकार आलं तर सोयाबीनला सहा हजार रुपये प्रतिक्विटल भाव दिला जाईल असं आश्वासन दिलं.
आम्हाला 1500 रुपये नको पण आमच्या सोयाबीनला भाव द्या, अशी मागणी शेतकरी महिलांनी केली होती. आता विदर्भ, मराठवाड्यासारख्या पट्ट्यात जिथं सोयाबीनचं उत्पन्न जास्त आहे तिथं पडलेल्या भावाचा काय परिणाम होतो? विरोधकांचं सोयाबीन अस्त्र चालतं का? हे पाहावं लागेल.
5) संविधानाचा मुद्दा
लोकसभा निवडणुकीत प्रामुख्यानं चर्चेत असलेला संविधान बचावचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत इतका दिसला नाही. पण महाविकास आघाडीकडून विशेषतः काँग्रेसकडून हा मुद्दा लावून धरण्यात आला.
संविधान धोक्यात असल्याचं राहुल गांधींनी त्यांच्या प्रत्येक सभांमध्ये सांगितलं. तसेच, नागपुरात संविधान संमेलन झालं. त्यात राहुल गांधींच्या हातात संविधानाचं लाल पुस्तक होतं. त्याचा संबंध फडणवीसांनी अर्बन नक्षलसोबत जोडला. काँग्रेस संविधानविरोधी असल्याचा प्रचार भाजपनं केला.

भाजप संविधान बदलविणार असल्याचा खोटा प्रचार काँग्रेसनं केल्याचा भाजप नेते त्यांच्या प्रचारसभांमधून सांगत आहेत. या निवडणुकीत संविधान बचावचा मुद्दा इतका प्रभावी नसताना सुद्धा काँग्रेस हा मुद्दा प्रचारात लावून धरताना दिसत आहे. आता हा मुद्दा लोकसभेत जसा प्रभावी ठरला होता तसा तो आताही ठरतो का? हे बघावं लागेल.
या मुद्द्यांची विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रामुख्यानं चर्चा झाली. यासोबतच महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा हे मुद्दे आहेतच. पण, प्रत्येक मतदारसंघातली लढाई वेगळी आहे. तिथल्या स्थानिक मुद्द्यांवर प्रचार करून ही निवडणूक लढवली जातेय. स्थानिक प्रश्न, तिथल्या समस्या, जातीय समीकरणं यावरही निवडणूक निकालाचं बरंच गणित अवलंबून असणार आहे.
हे मुद्दे निकालावर किती परिणाम करतील?
लाडकी बहीण योजना, हिंदुत्व, अदानी, सोयाबीनचे पडलेले भाव याचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होईल? याबद्दल राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे सांगतात, विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीनच्या मुद्द्याचा प्रभाव दिसेल, तर संपूर्ण महाराष्टरात लाडकी बहीण योजनेबद्दल अनुकूल वातावरण दिसतंय. त्याचा महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे.
भाजपच्या हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारात असला तरी तो स्थानिक समस्या, मुद्द्यांवर भारी पडेल का? हा प्रश्न आहे. कारण एखादा शेतकरी कट्टर हिंदूत्वादी असेल आणि तो सोयाबीनच्या पडलेल्या भावामुळे त्रस्त असेल तर तो मतदान करताना हिंदूत्वापेक्षा आपल्याला समस्यांचा आधी विचार करेल.
हिंदुत्वाचा मुद्दा इतका जोरदार चालेल असं वाटत नाही. तसेच अदानींच्या मुद्दाही प्रत्यक्ष निकालावर परिणाम करण्याची शक्यता कमीच आहे. हा मुद्दा फक्त धारावीपुरता मर्यादीत राहील. कमी अधिक प्रमाणात सर्वच मुद्दे यशस्वी होतील. एकच मुद्दा पूर्ण महाराष्ट्रात प्रभावी ठरेल असं दिसत नाही.

नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने सांगतात, “लाडकी बहीण योजनेचा फायदा महायुतीला होईल हे स्पष्टपणे दिसतंय. पण त्याचं प्रमाण किती असेल हे पाहावं लागेल. कटेंगे तो बटेंगेचा प्रचार मतदारांना रुचलेला नाही असं दिसतं. पण 'एक हैं तो सेफ हैं'चा संबंध राहुल गांधींनी अदानींसोबत जोडून त्याला महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडण्याचा प्रयत्न केलाय. तो काही प्रमाणात चालू शकतो.
पण, लाडकी बहीण योजनेला टक्कर देणारा प्रचारातला मुद्दा म्हणजे सोयाबीनचे पडलेले भाव आहेत. त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. ग्रामीण भागात लाडकी बहीण विरुद्ध सोयाबीनचे पडलेले भाव अशी निवडणूक रंगणार असल्याचं दिसतंय.”