सोन्याचे दर आणखी वाढतच जाणार की, घसरण लागणार? जाणून घ्या, तज्ज्ञांचे म्हणणे काय?
- थिओ लेगेट
साहजिकच बडे गुंतवणुकदार असोत की, सर्वसामान्य माणूस सोन्याच्या भाव हा सर्वत्रच चर्चेचा विषय आहे. अशा तेजीच्या वातावरणात सोन्यात गुंतवणूक करण्याचा मोह होणं स्वाभाविक आहे.
मात्र, ही गुंतवणूक करणं योग्य ठरेल का? त्यामुळे फायदा होईल की तोटा? सोन्याच्या तेजीसाठी कारणीभूत ठरणारे घटक कोणते? सोन्याचे भाव अशाच प्रकारे वाढत जातील की, पुन्हा खाली येतील? यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती देणारा हा लेख.
"तुमच्याकडे 2,50,000 पाऊंड किंमतीचं सोनं आहे," असं एम्मा सिबेनबॉर्न मला म्हणाल्या. त्या मला एका जुन्या प्लास्टिकच्या डब्यात असलेलं जुनं सोनं दाखवत होत्या. त्यात झीज झालेले दागिने, अंगठ्या, आकर्षक ब्रेसलेट, गळ्यातील हार आणि कानातले होते.
एम्मा या लंडनच्या सराफा बाजाराचं केंद्र असलेल्या हॅटन गार्डनमधील हॅटन गार्डन मेटल्सच्या स्ट्रॅटेजी या एका गोल्ड डिलरशिपच्या स्ट्रॅटेजी संचालक आहेत. ही गोल्ड डिलरशिप एका कुटुंबाकडून चालवली जाते.
या छोट्या सजावटीच्या वस्तूंसारख्या भांड्यातील सोनं, म्हणजे त्या दररोज काऊंटरवर विकत घेत असलेल्या वस्तूंचा एक नमुना होता. एका अर्थानं ते एकप्रकारचं 'भंगार असलेलं सोनं' आहे. ते आता वितळवलं जाईल आणि त्याचा पुन्हा वापर केला जाईल.
तसंच टेबलावर एका छान ट्रेमध्ये सुंदरपणे सोन्याची नाणी आणि बार मांडलेले आहेत. त्यातील सर्वात मोठ्या सोन्याच्या बारचा आकार आणि जाडी एखाद्या मोबाईल फोनएवढी आहे. त्याचं वजन 1 किलो आहे आणि किंमत 80,000 पाऊंड.
या कॉइन किंवा नाण्यांमध्ये बिस्किटाच्या आकाराच्या ब्रिटानिया आहेत. त्यातील प्रत्येकात 24 कॅरेटचं एक औंस (1 औंस म्हणजे 31.1 ग्रॅम) सोनं आहे, तसंच छोटी सोन्याची नाणी आहेत. ही सर्व विक्रीसाठी आहेत. गेल्या काही काळात सोन्याच्या भावात वाढ झाल्यामुळे त्यांच्या मागणीत वाढ झाली आहे.
झोई लिऑन्स या एम्माच्या बहीण आहेत आणि त्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी असं यापूर्वी कधीही पाहिलेलं नाही. बऱ्याचवेळा त्यांना विक्रीसाठी आलेले रांगेत उभे असलेले दिसतात. बाजारात उत्साह आणि गर्दी असते.
त्या म्हणाल्या,"मात्र, त्याचबरोबर भीती आणि चिंतादेखील असते."
"सोन्याच्या भावाचं काय होणार, ते कोणत्या दिशेनं जाणार याबद्दल चिंता दिसून येते. ज्यावेळेस अशा प्रकारच्या भावना असतात, तेव्हा त्यातून मोठे व्यवहार होतात."
तिथून काही अंतरावर असलेल्या एमएनआर ज्वेलर्समधील एक सेल्समनदेखील या मुद्द्याशी सहमत आहे. तो म्हणतो, "सोन्याची मागणी नक्कीच वाढली आहे."
सोने निश्चितच तेजीत आहे. सोन्याच्या भावात गेल्या वर्षभरात 40 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एप्रिलच्या शेवटी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 3,500 डॉलर (2,630 पौंड) प्रति ट्रॉय औंस वर पोहोचला होता. ट्रॉय औंस मौल्यवान धातूंच्या मोजमापासाठी वापरलं जाणारं परिमाण आहे (1 ट्रॉय औंस म्हणजे 31.10 ग्रॅम).
सोन्याच्या भागाची ही आतापर्यंतची विक्रमी पातळी होती.
अगदी जानेवारी 1980 मध्ये सोनं ज्या उच्चांकावर पोहोचलं होतं, त्यापेक्षाही सोन्याचा भाव वाढला होता. यामुळे महागाईला चालना मिळाली. त्यावेळेस सोन्याचा भाव 850 डॉलर होता किंवा आजच्या चलनानुसार 3,493 डॉलर इतका होता.
सोन्याचा भाव विक्रमी पातळीवर जाण्यामागे विविध घटक असल्याचं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यातील सर्वात प्रमुख कारण म्हणजे, ट्रम्प सरकारनं अमेरिकेच्या व्यापार धोरणात केलेले अनपेक्षित बदल हे आहे.
त्यामुळे जगभरातील बाजार हादरले आहेत. त्याउलट सोन्याकडे अनेकजण गुंतवणुकीचा एक सुरक्षित, ठोस पर्याय म्हणून पाहतात. त्याचबरोबर भूराजकीय अनिश्चिततेमुळेही सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोन्यातील गुंतवणुकीतील तुलनात्मक स्थैर्याला अनेक गुंतवणुकदार महत्त्व देत आहेत.
अब्जाधीश वॉरेन बफे यांनी कधीकाळी सोन्याला 'निर्जीव' आणि 'फार अधिक उपयुक्त किंवा लाभ न मिळवून देणारा' पर्याय म्हणून नाकारलं होतं. मात्र, अनिश्चिततेच्या वातावरणात गुंतवणुकदार सोन्याकडे आकृष्ट होत आहेत.
"सध्याची परिस्थिती सोन्यासाठी एक परिपूर्ण वादळी किंवा अनुकूल स्थिती असल्याचं आम्ही मानतो," असं लुईस स्ट्रीट म्हणतात. ते वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलमध्ये वरिष्ठ विश्लेषक आहेत. खाणउद्योगानं या व्यापारी संघटनेची स्थापना केली आहे.
"यातून संभाव्य महागाईच्या दबावांवर लक्ष केंद्रीत होत आहे. मंदीचे धोके वाढत आहेत. तुम्ही पाहिलं आहे की, अलीकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (आयएमएफ) आर्थिक वाढ कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे."
मात्र, जे वर जातं ते खालीदेखील येऊ शकतं. सोनं हा गुंतवणुकीचा स्थिर पर्याय मानला जात असला तरी किंमतीतील चढउतारांपासून सोनंदेखील अलिप्त नाही. किंबहुना, भूतकाळात, सोन्याच्या भावात मोठी वाढ झाल्यानंतरच्या काळात लक्षणीय घसरण नोंदवली गेली आहे.
मग, आता पुन्हा असं काय घडण्याचा धोका आहे, ज्यामुळे आज सोन्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक असणाऱ्या गुंतवणुकदारांना मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं?

सोनं हा एक दुर्मिळ धातू असल्यामुळे, शतकानुशतकं त्याच्याकडे संपत्ती साठवण्याचं एक साधन म्हणून पाहिलं गेलं आहे.
मात्र, जगभरात होणारा सोन्याचा पुरवठा मर्यादित आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलनं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जगात फक्त 2,16,265 टन सोन्याचं उत्खनन झालं आहे. (यात दरवर्षी जवळपास 3,500 टन सोन्याची भर पडते आहे).
याचा अर्थ, जगभरात सोन्याकडे मालमत्तेचा किंवा गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय म्हणून पाहिलं जातं, जे त्याचं मूल्य टिकवून ठेवेल.
मात्र, गुंतवणुकदार म्हणून त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत.
शेअर बाजारातील कंपन्यांच्या शेअर्सप्रमाणे सोन्यातील गुंतवणुकीतून कधीही लाभांश मिळणार नाही.
बाँड्स किंवा कर्जरोख्यांप्रमाणे त्यातून स्थिर, निश्चित स्वरुपाचं उत्पन्न मिळणार नाही. तसंच त्याचा उद्योग क्षेत्रात होणारा उपयोगदेखील तुलनेनं मर्यादित आहे.
मात्र, सोनं बाळगण्याचा फायदा असा आहे की, ते बँकिंग व्यवस्थेबाहेर अस्तित्वात असणारं एक भौतिक उत्पादन आहे.
महागाईमुळे चलनवाढ होते, त्यातून पैशांचं मूल्य घटतं, त्यामुळे महागाईविरोधात संपत्ती किंवा मालमत्तेचं रक्षण करण्यासाठीचं एक साधन म्हणून देखील त्याचा वापर केला जातो. कारण चलनांचं मूल्य हळूहळू कमी होत जातं. मात्र सोन्याच्या मूल्याच्या बाबतीत तसं होत नाही.
रस मोल्ड, ए जे बेल या स्टॉक ब्रोकिंग फर्मचे गुंतवणूक संचालक आहेत. ते म्हणतात,"जगभरातील देशांमधील शिखर बँका (ज्याप्रमाणे आपल्याकडे रिझर्व्ह बँक आहे) चलन छापतात. मात्र या बँका त्याप्रमाणे सोनं छापू शकत नाहीत. तसंच ते हाताची सफाई किंवा जादू दाखवून हवेतून काढता येत नाही."
ते पुढे म्हणतात, "अलीकडच्या काळात, आर्थिक संकट आल्यानंतर त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारं मोठ्या प्रमाणात विविध उपाययोजना करतात, धोरणात्मक पावलं उचलतात."
"यात व्याजदर कमी करणं, वित्त पुरवठा वाढवणं, पतधोरणाच्या माध्यमातून बाजारातील चलनाची उपलब्धता वाढवणं, चलन किंवा पैसे छापणं यासारख्या उपाययोजनांचा त्यात समावेश असतो."
"या सर्व गोष्टींमध्ये सोन्याकडे एक स्थिर, सुरक्षित मालमत्ता म्हणून पाहिलं जातं आणि त्यामुळे त्याकडे संपत्ती साठवण्याचं एक साधन म्हणून पाहिलं जातं."

अलीकडच्या काळात तथाकथित एक्सचेंज ट्रेडेड फंड्सच्या माध्यमातून सोन्याच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे गुंतवणुकीचं असं साधन ज्यात सोन्यासारख्या मालमत्तेचा अंतर्भाव असतो. गुंतवणुकदार या फंड्सची खरेदी आणि विक्री करू शकतात.
मोठ्या संस्थात्मक गुंतवणुकदारांमध्ये हे एक्सचेंज ट्रेडेड फंड लोकप्रिय आहेत. या गुंतवणुकदारांकडून केल्या जात असलेल्या गुंतवणुकीमुळे या फंड्सच्या किंमतीत वाढ झाली आहे.
जानेवारी 1980 मध्ये तत्कालीन सोव्हिएत युनियननं अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यानंतर सोन्याचा भाव तोपर्यंतच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता.
कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत होती, विकसित देशांमध्ये महागाई वाढत होती आणि गुंतवणुकदारांना त्यांच्या संपत्तीचं रक्षण करायचं होतं. त्यामुळे ते सोन्यात गुंतवणूक करत होते.
जागतिक वित्तीय संकटानंतर देखील सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे 2011 मध्ये सोन्याचा भाग नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.
ट्रम्प सरकारच्या निर्णयांमुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. पण त्याला बाजारांनी ज्या प्रकारे प्रतिसाद दिला, त्यामुळे अलीकडच्या काळात सोन्याच्या भावात मोठी वाढ झाल्याचं दिसतं.
सोन्याच्या भावातील सर्वात अलीकडची तेजी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरॉम पॉवेल यांच्यावर ऑनलाईन हल्ला चढवल्यानंतर आली. ट्रम्प यांनी तत्काळ व्याजदरात कपात करण्याची मागणी केली.
जेरेम पॉवेल कर्ज घेण्याचा खर्ज कमी करण्यात म्हणजे व्याजदर कमी करण्यात अपयशी ठरल्याबद्दल ट्रम्प त्यांना "मेजर लूझर" म्हणजे "मोठा तोटा झालेले" असं म्हणाले.
ट्रम्प यांच्या वक्तव्याकडे काही जणांनी, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या म्हणजे फेडरल रिझर्व्हच्या स्वायत्ततेवरील हल्ला म्हणून पाहिलं.
शेअर बाजारात घसरण झाली. जगातील इतर प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरचं मूल्य घसरलं आणि सोन्याच्या भावानं अलीकडच्या काळातील विक्रमी पातळी गाठली.
मात्र सोन्याची ताकद ट्रम्प फॅक्टरद्वारे पूर्णपणे स्पष्ट होत नाही.

लुईस स्ट्रीटनुसार, 2022 च्या अखेरीपासून सोन्याच्या भावात तीव्र वाढ झाली आहे. त्याला काही अंशी जगातील मध्यवर्ती बँकादेखील कारणीभूत आहेत.
"जगभरातील मध्यवर्ती बँका, गेल्या 15 वर्षांपासून त्यांच्या अधिकृत साठ्यात भर घालण्यासाठी सोनं विकत घेत आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षात त्यात वेगानं वाढ झालेली आपण पाहिली आहे."
2022 पासून जगभरातील मध्यवर्ती बँकांनी दरवर्षी एकत्रितरित्या 1,000 टनाहून अधिक सोन्याची खरेदी केली आहे.
2010 ते 2021 दरम्यान या बँकांनी दरवर्षी सरासरी 481 टन सोनं खरेदी केलं होतं. सोनं खरेदीत गेल्या वर्षी पोलंड, तुर्की, भारत, अझरबैजान आणि चीन हे देश आघाडीवर होते.
विश्लेषकांचं म्हणणं आहे की, वाढत्या आर्थिक आणि भू-राजकीय अनिश्चिततेच्या परिस्थितीत, मध्यवर्ती बँका बहुधा सोन्याचा वापर अस्थिरतेला तोंड देण्यासाठी करत असतील.
डान स्ट्रुवेन गोल्डमन सॅक्स या जागतिक कमोडिटीज रिसर्च फर्मचे सह-प्रमुख आहेत.
त्यांच्या मते, "2022 मध्ये युक्रेनवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या मध्यवर्ती बँकेचे सोन्याचे साठे गोठले होते. जगभरातील मध्यवर्ती बँकांच्या रिझर्व्ह व्यवस्थापकांच्या हे लक्षात आलं की, कदाचित त्यांचे साठेही सुरक्षित नाहीत. मग मी सोनं विकत घेतलं आणि माझ्या तिजोरीत ठेवलं तर काय होईल?"
"म्हणूनच, मध्यवर्ती बँकांकडून सोन्याच्या मागणीत ही पाचपट वाढ पाहिली आहे."

सिमॉन फ्रेंच, पॅनम्युअर लिबरम या गुंतवणूक फर्ममध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ आणि संशोधन प्रमुख आहेत.
त्यांनादेखील वाटतं की, डॉलरवर आधारित बँकिंग व्यवस्थेपासून स्वातंत्र्य मिळणं हे मध्यवर्ती बँकांनी हे पाऊल उचलण्यामागचं प्रमुख कारण आहे. "मी चीनकडे लक्ष ठेवून आहे, रशियाकडे देखील. या देशांच्या मध्यवर्ती बँका सोन्याच्या प्रमुख खरेदीदार आहेत. त्यात तुर्कीचाही समावेश आहे."
ते पुढे म्हणतात, "जगातील अनेक देशांना डॉलर व्यवस्थेचा आणि संभाव्यपणे युरो व्यवस्थेचा वापर शस्त्राप्रमाणे होण्याची भीती वाटते आहे."
"जर हे देश राजनयिक आधारावर, लष्करी आधारावर अमेरिका किंवा पाश्चात्य देशांच्या जवळचे किंवा त्यांच्याशी जुळवून घेत नसतील, तर त्यांच्या मध्यवर्ती बँकेत अशी मालमत्ता असणं, जिच्यावर त्यांच्या लष्करी किंवा राजकीय शत्रूंचं नियंत्रण नाही, हे एक आकर्षक वैशिष्ट्यं आहे."
सोन्याच्या भावात वाढ होण्यामागे आणखी एक घटक कारणीभूत ठरत असेल, तो म्हणजे 'फोमो' म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आऊट. म्हणजे एखादी संधी चुकण्याची भीती. सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्यामुळे, काही घटकांमध्ये त्याबद्दल रोज चर्चा होते आहे.
झोई लिऑन्स यांना वाटतं की, हॅटन गार्डनमध्येही असंच घडतं. "(लोकांना) सोन्याच्या या तेजीतील थोडा भाग हवा असतो. त्यामुळे ते प्रत्यक्षात सोनं खरेदी करू इच्छितात."

मोठा प्रश्न असा आहे की, पुढे काय होणार. काही तज्ज्ञांना वाटतं की, सोन्याच्या भावातील तेजीचा ट्रेंड असाच सुरू राहील.
अमेरिकेच्या धोरणातील अनिश्चितता, महागाई वाढण्याचा दबाव आणि मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची खरेदी यामुळे सोन्याच्या भावात वाढ होत राहील.
किंबहुना, गोल्डमन सॅक्सनं अंदाज वर्तवला आहे की, 2025 च्या अखेरीपर्यंत सोनं 3,700 डॉलर प्रति औंस (2,800 पौंड प्रति औंस) आणि 2026 च्या मध्यापर्यंत 4,000 डॉलर प्रति औंस (3,000 पौंड प्रति औंस) ची पातळी गाठेल.
मात्र, गोल्डमन सॅक्स असंही म्हणतं की, अमेरिकेत मंदी आल्यास किंवा व्यापार युद्ध आणखी भडकलं तर या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा भाव 4,500 डॉलर प्रति औंस (3,400 पौंड प्रति औंस) वर देखील जाऊ शकतो.
"सोन्याच्या जागतिक बाजारपेठेपेक्षा अमेरिकेचा शेअर बाजार 200 पट मोठा आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या शेअर बाजारात किंवा मोठ्या बाँड बाजारात झालेल्या लहान घडामोडीमुळे, त्यापेक्षा कितीतरी छोट्या असलेल्या सोन्याच्या बाजारात प्रचंड मोठी वाढ होईल," असं डॅन स्ट्रुवेन म्हणतात.
दुसऱ्या शब्दात सांगायचं तर, सोन्याच्या भावात वाढ होण्यासाठी जगातील प्रमुख गुंतवणूक बाजारांमध्ये फार मोठ्या प्रमाणात अशांतता असण्याची आवश्यकता नाही.
तरीही इतरांना चिंता वाटते की, सोन्याच्या भावात इतकी प्रचंड वाढ झाली आहे की त्यामुळे तेजीचा एकप्रकारचा बुडबुडा तयार होतो आहे आणि हे बुडबुडे फुटू शकतात.

उदाहरणार्थ, 1980 मध्ये सोन्याच्या भावात नाट्यमय वाढ झाल्यानंतर तितकीच घसरणदेखील झाली होती. जानेवारीच्या अखेरीस सोन्याचा भाव 850 डॉलर प्रति औंस (640 पौंड प्रति औंस) होता. तो एप्रिलच्या सुरुवातीला फक्त 485 डॉलर प्रति औंस (365 पौंड प्रति औंस) वर आला होता.
तर पुढच्याच वर्षी जूनच्या मध्यापर्यंत सोन्याचा भाव फक्त 297 डॉलर प्रति औंस (224 पौंड प्रति औंस) च्या पातळीवर आला होता. सोन्याच्या विक्रमी पातळीवरून त्यात तब्बल 65 टक्क्यांची घसरण झाली होती.
2011 मध्ये सोन्याचा भाव उच्चांकी पातळीवर असताना त्यात मोठी घसरण झाली. नंतर अस्थिरतेचा काळ आला. फक्त चार महिन्यांच्या कालावधीत त्यात 18 टक्क्यांची घसरण झाली.
त्यानंतर तो काही काळ स्थिर राहिला आणि नंतर त्यात घसरण होत राहिली. 2013 च्या मध्यापर्यंत तो सर्वात खालच्या पातळीवर आला. उच्चांकी पातळीवरून सोन्याच्या भावात 35 टक्क्यांची घसरण झाली होती.
प्रश्न असा आहे की, आतादेखील तसंच घडू शकतं का?

काही विश्लेषकांना वाटतं की सोन्याचा भाव शेवटी लक्षणीयरित्या कमी होईल. जॉन मिल्स मॉर्निंगस्टारमधील या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. ते मार्च महिन्यात चर्चेत आले होते. कारण त्यांनी सुचवलं होतं की, पुढील काही वर्षांमध्ये सोन्याचा भाव फक्त 1,820 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली येऊ शकतो.
यासंदर्भातील त्यांचं मतं होतं की, खाणकाम करणाऱ्या कंपन्यांनी सोन्याचं उत्खनन वाढवलं आणि बाजारात अधिकाधिक पुनर्वापर केलेलं सोनं आलं की सोन्याच्या पुरवठ्यात वाढ होईल.
त्याचवेळी मध्यवर्ती बँका त्यांचा सोनं खरेदीचा वेग कमी करू शकतील. तसंच सोन्याच्या मागणीला चालना देणारे इतर अल्पकालीन घटक कमी होतील. परिणामी सोन्याचे भाव खाली येतील.
नंतर या अंदाजात थोडी सुधारणा करत सोन्याच्या भावात किंचित वाढ दाखवण्यात आली आहे. त्यामागचं प्रमुख कारण खाण उद्योगाच्या उत्पादन खर्चात म्हणजे सोन्याच्या उत्खननाच्या खर्चात वाढ झाल्यामुळे तसं करण्यात आलं.
डॅन स्ट्रुवेन याच्याशी सहमत नाहीत. त्यांना वाटतं की, थोड्या कालावधीसाठी सोन्याच्या भावात घसरण होऊ शकते, मात्र एरवी सोन्याचा भाव वाढतच जाईल.
जर युक्रेन-रशिया शांतता करार झाला किंवा व्यापार युद्ध वेगानं थंडावलं, तर मला वाटतं की हेज फंड त्यांचे काही पैसे सोन्यातून काढून घेतील आणि ते शेअर मार्केटसारख्या जोखीमयुक्त गुंतवणूक प्रकारात गुंतवतील.
"त्यामुळे तुम्हाला सोन्याच्या भावात तात्पुरती घसरण दिसू शकते. मात्र आम्हाला खात्री आहे की, या अत्यंत अनिश्चित भू-राजकीय वातावरणात आणि जिथे मध्यवर्ती बँका त्यांची मालमत्ता सुरक्षित प्रकारात ठेवू इच्छितात, मध्यम कालावधीत सोन्याची मागणी वाढतच राहील."
रस मोल्ड यांना वाटतं की, तेजीमध्ये किमान एखादी घसरण किंवा थोडीशी मंदी येईल. ते म्हणतात, "सोन्याच्या भावात इतकी जबरदस्त तेजी आली आहे की, एखाद्या टप्प्यावर ही तेजी थोडीशी रोखली जाईल किंवा छोटासा थांबा घेईल अशी अपेक्षा करणं तर्कसंगत ठरेल."
मात्र त्यांना वाटतं की, जर तीव्र आर्थिक मंदी आली आणि व्याजदरात कपात करण्यात आली, तर सोन्याचा भाव दीर्घ कालावधीत वाढू शकतो.
गुंतवणुकदारांसाठीची एक समस्या म्हणजे या गोष्टीचा शोध घेणं की, अलीकडच्या काळात सोन्याच्या भावात झालेली विक्रमी वाढ ही 4,000 डॉलर्सपेक्षा अधिक वाढ होण्यातील एक टप्पा होता की, ती त्याची उच्चांकी पातळी होती.

पॅनम्युअर लिबेरममधील सिमॉन फ्रेंच यांना वाटतं की, सोन्याच्या भावातील उच्चांकी पातळी आता खूपच जवळ आलेली असू शकते.
खूप जास्त पैसे मिळवण्याच्या किंवा अधिक परतावा मिळवण्याच्या आशेनं सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे लोक आता निराश होण्याची शक्यता आहे.
इतरांनी इशारा दिला आहे की, सोन्यातील तेजीची चर्चा आणि बातम्यांमुळे ज्यांनी अलीकडेच सोने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे, त्यांचा जर सोन्यातील भावाची तेजी संपून घसरण सुरू झाल्यास तोटा होऊ शकतो.
हार्ग्रिव्हज लँन्सडाऊनमधील मनी अँड मार्केटच्या प्रमुख सुसान्ना स्ट्रीटर म्हणतात, "अल्पकालावधीत सोन्याच्या तेजीचा अंदाज बांधून गुंतवणूक केल्यास त्यामुळे नुकसान होऊ शकतं. जरी विक्रमी पातळीचा फायदा घेत त्यात गुंतवणूक करण्याचा मोह असेल तरी त्यात तोटा होऊ शकतो."
"सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओतील एक भाग म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक करावी. त्यांनी त्यांचा सर्व पैसा फक्त सोन्यातच गुंतवू नये. गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण ठेवावा."