https://www.amazon.in/bb/registration/start/?_encoding=UTF8&ref_=cct_cg_12345_1a1&pf_rd_p=9acff4bf-eee0-4854-9cca-99af421dadcf&pf_rd_r=HJNTZM43QKTMGKZ3FXDN

कुरेशी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मूक मोर्चास लातुरात भर पावसात मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद



कुरेशी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मूक मोर्चास लातुरात भर पावसात मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

लातूर : कुरेशी समाज व विविध संघटनांच्या वतीने  लातुरात  सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मूक मोर्चास भर पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकरी, व्यापारी, कुरेशी यांच्यावर गोरक्षकांच्या माध्यमातून होणाऱ्या अन्याय - अत्याचाराच्या विरोधात कुरेशी समाजाने एक महिन्यापासून पशूंची खरेदी, विक्री , कटाई बंद केली आहे.  कुरेशी समाजावर होणाऱ्या या अन्यायाचा निषेध करण्यासाठी सदर भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात  होते. 
सध्या लातूर शहर व परिसरात दमदार पावसाचे पुनरागमन झाले आहे. भर पावसातही गंज गोलाईमधील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून हा मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दरम्यान अण्णाभाऊ साठे, महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या  पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. अण्णाभाऊ साठे चौकातून निघालेला हा मूक मोर्चा गंज गोलाई, हनुमान चौक, मध्यवर्ती बस स्थानक, गांधी चौक या शहरातील प्रमुख मार्गावरून लातूर तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, कार्याध्यक्ष सत्तार  पटेल, कोअर कमिटी अध्यक्ष राजेंद्र मोरे, जिल्हाध्यक्ष अरुणदादा कुलकर्णी यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या. तथाकथित गोरक्षकांकडून जाणीवपूर्वक शेतकरी बांधव, कुरेशी समाज, व्यापाऱ्यांना दिला जाणारा  त्रास त्वरित थांबविण्यात यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली. आपल्या व्यथा शासनापर्यंत पोहचविण्यात आल्या असल्या तरी लोकशाही मार्गाने लढा  देण्याच्या उद्देशाने आजच्या या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. 
तथाकथित गोरक्षकांच्या नावाखाली गावगुंडांकडून होत असलेली जनावरांची वाहतूक अडविणे, कायदा हातात घेऊन लूटमार करणे, मारहाण करणे, मॉब लिचिंगद्वारे हत्या करणे आदी प्रकरणात कठोरात कठोर कार्यवाही करून प्रतिबंध करणे, सर्व गोशाळेंची  उच्च स्तरीय चौकशी करणे, मुस्लिम खाटीक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणे, जनावरांच्या वाहतुकीसाठी वाहन कायद्यात बदल करणे, लातूर जिल्ह्यातील तालुका, नगर पालिका, ग्रामपंचायतच्या क्षेत्रात स्लॅटर  हाऊसची निर्मिती करणे, शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव देणे, पोलिसांमार्फत शेतकरी, व्यापारी, कुरेशी, वाहन चालक,यांच्यावर दाखल केलेले गुन्हे तात्काळ परत घ्यावेत, मॉबा लीचिंगद्वारे हत्या झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मोबदला द्यावा आदी मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या हातात महापुरुषांच्या जयघोषासह  आपल्याला न्याय मिळावा अशा आशयाचे फलक होते. गोमातेचे रक्षण झालेच पाहिजे असा फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा ठरत होता. मोर्चामध्ये संविधान सेवा संघाच्या संस्थापक अध्यक्षा एड. शहेजादी शेख आपल्या हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाल्या होत्या. अनेक मोर्चेकरांच्या हाती तिरंगा ध्वजासह आपल्या मागण्यांचे  फलक दिसत होते. 
मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचल्यानंतर  ऑल इंडिया जमिअतुल कुरेश महाराष्ट्र राज्यचे  उपाध्यक्ष अफजल कुरेशी यांनी सविस्तर असे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी या मूक मोर्चाच्या आयोजनामागची वस्तुस्थिती स्पष्ट शब्दात विशद केली. कुरेशी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी अफसर कुरेशी यांनी आभार प्रदर्शन केले.  या मूक मोर्चात जमीअतुल कुरेशी कमिटी, लातूरचे जिल्हा अध्यक्ष हाजी इब्राहिम कुरेशी, उपाध्यक्ष फय्युम कुरेशी, सचिव अफसर कुरेशी, संविधान सेवा संघाच्या अध्यक्षा एड. शहेजादी शेख,  उपाध्यक्ष एड. गोविंद सिरसाठ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधी आघाडीचे  अध्यक्ष  एड. विजय जाधव, इस्माईल कुरेशी, चांद कुरेशी, शफिक कुरेशी, जावेद कुरेशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  अनेक प्रमुख पदाधिकारी यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिकांची  उपस्थिती होती.



Post a Comment

0 Comments