मनोज जरांगेंच्या मालमत्तेची ईडी चौकशी करा, पूर्व समर्थक अमोल खुणेंचे गंभीर आरोप
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या मालमत्तेची ईडी चौकशी करा, पूर्व समर्थक अमोल खुणेंचे गंभीर आरोप
बीड : एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवली येथे शनिवारपासून (30 मे) आमरण उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे, त्यांच्याच पूर्व समर्थकानेच त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मालमत्तेची ईडी चौकशी करण्याची मागणी अमोल खुणे यांनी केले आहेत. अमोल खुणे हे मनोज जरांगे यांचे पूर्व समर्थक असून त्यांच्यावर जरांगेंना मारण्याची सुपारी घेतल्याचे आरोप करण्यात आले होते. तसेच, जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संपत्तीत अचानक वाढ कशी झाली? यासाठी ईडी (ED) मार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
मनोज जरांगेंचे आंदोलन
मनोज जरांगे यांनी शनिवारपासून अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. ते भर उन्हात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत मराठा समाजाचे शेकडो नागरीकही उन्हात बसले. या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाला भेटायचे असले तरी या उन्हात येऊन भेटावे लागेल आणि इथेच चर्चा करावी लागेल, असे जरांगेंकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यानुसार, भेटीसाठी सरकारच्या शिष्टमंडळातील नेते तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगेंसोबत भरउन्हात बसून चर्चा केली. यावेळी विखे पाटील त्यांच्यासोबत सरकारने तयार केलेला आश्वासनांचा ड्राफ्ट घेऊन आले होते. मात्र, आपण आपल्या तज्ज्ञांशी बोलून आणि सरकारने सुद्धा याचा मसुदा तयार केल्यावरच आपण उपोषण सोडणार असल्याची भूमिका जरांगेंकडून स्पष्ट करण्यात आली आहे.
अमोल खुणे यांचे आरोप काय?
माध्यमांशी बोलताना अमोल खुणे म्हणाले की, “मनोज जरांगे यांच्या संपत्तीत अचानक वाढ कशी झाली? त्यांचे सहकारी पांडुंग तारक यांनी तब्बल 49 एकर जमीन कशी घेतली? गंगाधर काळकुटेंनी चंदन नगरला 7 गुंठे जागा कशी घेतली? स्वप्नील तारखने 1.5 कोटींची जमीन कशी घेतली? आणि संजय कटारेचा तब्बल 5 कोटींचा बोजा तहसीलदारांनी माफ कसा केला? हे स्पष्ट झाले पाहिजे. खासकरून, या सर्वांची ईडीमार्फत चौकशी करून त्यांच्यासोबत माझीही नार्को टेस्ट केली पाहिजे. मी त्यांची सुपारी घेतली असेल, तर मी कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार आहे. पण ते दोषी आढळले तर समाजाने त्यांना दगड मारून, साड्या नेसवून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी त्यांची धिंड काढली पाहिजे.” अशा शब्दात त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. “या लोकांनी कोणत्यातरी देवस्थानात 700 कोटी रुपये ठेवले आहेत. सध्या 986 कोटी, 150 कोटी आणि 30 कोटी रुपयांचे जे टेंडर रद्द झाले आहे. ते परत मिळवण्यासाठी हे उपोषण करत आहेत असा माझा तर्क आहे. मराठा समाजाला अंतरवली सराटीत आणून तुम्हाला तुमचे रद्द झालेले टेंडर परत आणायचे आहे का?” असा सवाल त्यांनी केला.
No comments