माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी बाभळगाव येथे आदरांजली कार्यक्रम * शास्त्रीय संगीताचे सुप्रसिद्ध गायक हेमंत पेंडसे यांच्या भाव स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन
माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी बाभळगाव येथे आदरांजली कार्यक्रम * शास्त्रीय संगीताचे सुप्रसिद्ध गायक हेमंत पेंडसे यांच्या भाव स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन
लातूर (प्रतिनिधी): शनिवार, २३ मे २०२६
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि
महाराष्ट्राच्या राजकीय व सांस्कृतिक पटलावर आपल्या अमोघ नेतृत्वाने भुरळ
पाडणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री लोकनेते
आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त मंगळवार,
दि. २६ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता विलासबाग, बाभळगाव येथे सार्वजनिक
आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशमुख कुटुंबाच्या वतीने
आयोजित या कार्यक्रमात विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्मृतींना उजाळा
दिला जाणार आहे.
या निमित्ताने या ठिकाणी सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक हेमंत पेंडसे
यांच्या भाव स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक
अत्यंत लोकप्रिय, सुसंस्कृत आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व होते. बाभळगावचे
सरपंच, जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे दोनदा मुख्यमंत्री आणि केंद्रीय
मंत्री असा त्यांचा संघर्षमय व यशस्वी राजकीय प्रवास राहिला आहे. आपल्या
अमोघ वक्तृत्वाने आणि हजरजवाबीपणाने त्यांनी जनतेच्या मनावर अधिराज्य
गाजवले. केवळ राजकारणच नव्हे, तर उद्योग, सहकार, क्रीडा, साहित्य, संगीत
आणि कला अशा सर्वच क्षेत्रांत त्यांचा सहज वावर राहिला. ग्रामीण
महाराष्ट्राच्या विकासाचे मोठे श्रेय त्यांना जाते. लातूरच्या विकासाचा
ध्यास घेतलेल्या आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी मांजरा नदीवर
बॅरेजेसची साखळी निर्माण करून शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळवून दिले.
विरोधकांनाही आपल्या दिलदार आणि संवेदनशील स्वभावाने आपलेसे करणारे
आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे नेते आणि
युवकांचे प्रेरणास्थान अशी आजही त्यांची ओळख आहे.
लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांना ८१ व्या जयंतीनिमित्त
मंगळवार दि. २६ मे २०२६ रोजी बाभळगाव येथील विलासबाग येथे आदरांजली
वाहण्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी सकाळी
सर्वांनी ८.४५ वाजता विलासबाग येथे स्थानापन्न व्हावे अशी अपेक्षा आहे.
सकाळी ९.०० वाजता सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी
यांच्या शिष्य परिवारातील ज्येष्ठ सुप्रसिद्ध शिष्य हेमंत पेंडसे व
त्यांचे सहकारी शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून ‘भावस्वरांजली’ सादर
करतील. उपस्थित सर्व नागरिकांनी, पदाधिकारी कार्यकर्ते व स्नेही मंडळींनी
पुष्पांजली अर्पण केल्यानंतर सकाळी १०.०० वाजता आदरांजली सभेचा समारोप
होईल. या प्रसंगी सूत्रसंचालन विवेक सौताडेकर करतील.
या आदरांजली कार्यक्रमास विलासबाग, बाभळगाव येथे जनतेने आवर्जून उपस्थित
राहावे, असे आवाहन देशमुख कुटूंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments