🔎 श्रद्धा वालकर हत्याकांडात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा :
श्रद्धा हत्याकांडात पोलिसांना महत्त्वाचा पुरावा हाती लागल्याची माहिती समोर आलीय. आज 17 नोव्हेंबरला आफताब पूनावालाच्या फ्लॅटवर पोहोचलेल्या फॉरेन्सिक टीमला किचनमधून रक्ताचे डाग आढळल्याचे समोर आलेय. हे डाग किचनच्या खालच्या शेल्फवर होते जिथे सहसा सिलेंडर ठेवला जातो. मिळालेल्या माहितीनुसार आफताबने त्या ठिकाणी कोणताही डाग राहू नये, यासाठी फ्रिज आणि फरशीला केमिकल टाकून स्वच्छ केल्याचे समोर आले आहे.
👀 आता घरगुती सिलेंडरवर QR Code :
घरगुती म्हणजेच एलपीजी सिलेंडर बाबत सरकारने एक नवी अपडेट जाहीर केली आहे. आता घरगुती सिलेंडरवर QR Code असणार. येत्या तीन महिन्यात क्यूआर कोड असलेले घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर देशभरात उपलब्ध होणार. अनेकदा एलपीजी गॅस सिलेंडरबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात ज्याची उत्तरे कुठेच मिळत नाही पण आता या QR Codeच्या मदतीने या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे.
🗣️ राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीरांचा माफीनामा दाखवला :
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांना माफीचे पत्र लिहिले होते, यावर मी ठाम आहे, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत सावरकरांचे माफीचे पत्रच माध्यमांसमोर दाखवले. तसेच, हे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरसंघलाचक मोहन भागवत यांनाही दाखवा, असेही गांधी म्हणाले. पत्रात सावरकरांनी इंग्रजांना उद्देशून असे लिहिले आहे की, 'सर मै आपका नौकर रहना चाहता हूँ'. या पत्राच्या खाली वीर सावरकर यांची स्वाक्षरीही आहे, असंही ते म्हणाले.
🤓 राहुल गांधींचे वक्तव्य चूकच - उद्धव ठाकरे :
राहुल गांधी यांचे सावरकरांबद्दलचे वक्तव्य चूकच आहे. त्यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. मात्र, आमची भूमिका विचारणारे तुम्ही कोण. तुमचीही कुंडली काढा की, स्वातंत्र्यलढ्यात तुमचे कोण होते, असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला. ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते. देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. आपली हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
💁♂️ नारायण राणेंकडूनच अधीश बंगल्यावर हातोडा :
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीच आपल्या अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील जुहूमध्ये हा बंगला आहे. येत्या 8 ते 10 दिवसांत बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पूर्णपणे हटवले जाईल. राणे, ठाकरे गटाच्या वादात मविआ काळात मुंबई पालिकेने या बंगल्यासंदर्भात राणेंना नोटीस बजावली होती.