महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम

मुंबई, दि.  30 : महाराष्ट्र  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)  संचालनालयाने प्रतिष्ठेचे ‘प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी त्यासाठी संचालनालयाचे अभिनंदन केले आहे. राज्य शासनाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली येथील कॅन्टॉन्मेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅलीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’ 2022-23 च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या  बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्राप्त विजेतेपदाचा चषक महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट सुकन्या राणा दिवे, सिनियर अंडर ऑफिसर देवेंद्र बडगुजर, संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी यांनी प्रधानमंत्री बॅनर स्वीकारले. देशातील एकूण 17 एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर 2021 ते  नोव्हेंबर 2022 मधील विविध स्तरांवरील मूल्यांकन तसेच यावर्षी 1 ते 28 जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताकदिन शिबिरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर ‘प्रधानमंत्री बॅनर’चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्राला सलग दुसऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनर

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण 18 वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. मात्र,गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र उपविजेता किंवा पहिल्या तीन क्रमांकात असायचा. यावर्षीही महाराष्ट्राने हा बहुमान मिळविल्याने राज्याने सात वर्षांनी सलग दोन वर्ष ‘प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून  उत्तम कामगिरी केली आहे.

00000

राजू धोत्रे/विसंअ



from महासंवाद https://ift.tt/MwuyBFS
via IFTTT https://ift.tt/9MA4v8y

Post a Comment

Previous Post Next Post