न्यायधिशाच्या भूमिकेत न रहाता पत्रकार बांधवांनी जनतेची वकीली करण्याचे काम सक्रीयपणे करावे - जयप्रकाश दगडे
न्यायधिशाच्या भूमिकेत न रहाता पत्रकार बांधवांनी जनतेची वकीली करण्याचे काम सक्रीयपणे करावे
- जयप्रकाश दगडे
भाजयुमोचा पुढाकार ः दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान
लातूर दि.07/01/2023
दर्पण दिनाबाबत पत्रकार व सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम आहे. काही पत्रकार बांधव त्यांची जयंती म्हणून साजरा करतात तर काही पत्रकार दर्पण हे पहिल मराठी साप्ताहिक 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केले म्हणून दर्पण दिन साजरा करतात. परंतु 6 जानेवारी हा दर्पण दिनच आहे. असा ठाम विश्वास व्यक्त करीत पत्रकारांनी समाजाच्या प्रश्नासांठी सक्रीयपणे काम करावे. स्पर्धेच्या युगामध्ये सोशल मिडीयाचा वापर वाढल्यामुळे काही प्रमाणात विश्वासार्हता कमी होत असल्याचे म्हटले जात असले तरी झालेल्या जागतिक सर्वेमध्ये 62 टक्के नागरिकांनी मुद्रिम माध्यमांची विश्वासार्हता टिकून असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यापुढील कालावधीतही पत्रकार बांधवानी न्यायधिशाच्या भूमिकेत न रहाता सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी जनतेची वकीली करण्याचे काम सक्रीयपणे करावे असे प्रतिपादन पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी केले.
यावेळी दर्पण दिनानिमित्त भाजपा युवा मोर्चा शहर जिल्ह्याच्यावतीने जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या अटल लॅब सभागृहात आयोजित पत्रकार बांधवांचा स्नेहमेळावा व पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर, दिग्विजय काथवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना दगडे म्हणाले की, सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये पॅकेजमध्ये पत्रकारिता गुदमरली जात आहे. पूर्वीच्या काळात जाहीरातीपेक्षा कॉलेटी न्यूजबाबत विचारले जायचे. परंतु आता मात्र पत्रकारितेत पूर्णपणे व्यवसायीकता आलेली आहे. तसेच पत्रकाराच्या नियुक्तीबाबतही अॅग्रीमेंटचा प्रकार समोर आलेला आलेला आहे. कोरोनाच्या काळात जाहीराती कमी झाल्या असे बोलले जात असले तरी जाहीराती कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे पत्रकारांनी सकारात्मक दृष्टीकोण ठेवून वाटचाल करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले
कार्यक्रमाचे प्रस्ताविक युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अपर्ण करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रामच्या प्रारंभी लातूर शहर व जिल्ह्यातील पत्रकारांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, लेखणी व डायरी भेट देवनू सन्मान करण्यात आला. तसेच कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार अभय मिरजकर, संजय देशपांडे, पंकज जैस्वाल, प्रभाकर शिरूरे, दीपक पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड.गणेश गोजमगुंडे, सागर घोडके,गजेंद्र बोकण, पुनम पांचाळ, राजेश पवार यांच्यासह भाजपा युमोच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अब्दूल गालिब शेख यांनी मानले.
सकारात्मक दृष्टीने लातूरची पत्रकारिता सुरू आहे - प्रदीप नणंदकर
पत्रकारितेत काम करीत असताना अनेक अडचणी आल्या तरी त्यावर मात करीत पत्रकारांनी सक्रीयपणे काम करावे. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत असताना. पत्रकारांनाही अनेक अडचणी येतात. त्या समजून घेवून काम करणार्यांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे यापुढील काळात तरी राजकीय, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील व्यक्तींनी पत्रकारांनी समजून घेवून आपली वाटचाल करावी. असे आवाहन करीत पत्रक व कॉपी पेस्ट पत्रकारिता न करता क्रियटिव्ह पत्रकारिता करावी जेणेकरून स्पर्धेच्या युगातही आपली पत्रकारिता यशस्वीपणे चालू राहील असे मतही ज्येष्ठ पत्रकार नणंदकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
अजित कव्हेकरांनी जागतिक विषय मांडण्याचे काम केले
राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत असताना सुध्दा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांना पत्रकारिता क्षेत्राचा चांगला अभ्यास आहे. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्थानिक पातळीवरचेच नाही तर जागतिक स्थरावरील पत्रकारितेची माहिती सांगून उपस्थित पत्रकार बांधवांना प्रभावीत केले असल्याचे जेष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर म्हणाले तर त्यांचा हा पत्रकारितेतील अभ्यास पाहून जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनीही प्रभावित होवून अजितचे भाषण अप्रतिम झाले असून मी त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणामुळे खर्या आर्थाने त्यांच्या प्रेमात पडलो असल्याची भावनाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. तसेच इतर पत्रकार बांधवांचाही दर्पण दिनानिमित्त सन्मान केल्याबद्दल उपस्थित पत्रकार बांधवांनी ऋण व्यक्त केले.
------------------------------
No comments