संविधान जगलो तर आपला देश महासत्ता बनेल -रमेश पतंगे 'आपले संविधान,तत्व विचार, मूल्य संकल्पना, ध्येयवाद' या पुस्तकाचे प्रकाशन
संविधान जगलो तर आपला देश महासत्ता बनेल -रमेश पतंगे
'आपले संविधान,तत्व विचार, मूल्य संकल्पना, ध्येयवाद' या पुस्तकाचे प्रकाशन
लातूर/प्रतिनिधी:संविधानाने आपल्याला अमर्याद अधिकार दिले आहेत.संविधान जाणून घेतले पाहिजे.संविधानाची कलमे पुस्तकात राहता कामा नयेत,ती जगण्याचा विषय झाली पाहिजेत. संविधान जगलो तर आपण महासत्ता बनू,असे मत मुंबईच्या हिंदुस्तान प्रकाशनचे अध्यक्ष रमेश पतंगे यांनी व्यक्त केले.
रमेश पतंगे यांनी लिहिलेल्या 'आपले संविधान, तत्व विचार, मूल्य संकल्पना,ध्येयवाद' या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसमकर यांच्या हस्ते संपन्न झाले.अधिवक्ता परिषद,लातूर आणि साप्ताहिक विवेक,मुंबई यांच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.या कार्यक्रमात रमेश पतंगे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे काका तर व्यासपीठावर अधिवक्ता परिषदेचे महामंत्री ॲड.जगन्नाथ चिताडे,लातूर अधिवक्ता परिषदेचे पालक ॲड. श्रीराम देशपांडे यांची उपस्थिती होती.
यावेळी मनोगत व्यक्त करताना रमेश पतंगे यांनी संविधान साक्षरता ही काळाची गरज असल्याचे सांगितले.सामान्य देशाला महासत्ता बनवण्याचे काम संविधानाकडून केले जाते.देश एक ठेवण्यासाठी,देशाला बलवान व सामर्थ्यशाली करण्यासाठी संविधान आवश्यक आहे. संविधान हा फक्त मूलभूत अधिकार नाही.केवळ दंडशक्तीने मनुष्यात परिवर्तन होऊ शकत नाही.कायदा रुजवायचा असेल तर त्यामागे असणारे तत्त्वज्ञान सांगितले पाहिजे.संविधानाबाबत प्रबोधनाची गरज आहे.केवळ मूलभूत अधिकार नाही तर कर्तव्य पालन ही आपली संकल्पना आहे.कायदे देशासाठी असतात.आपल्याला संविधानाने दिलेले अधिकार निरंकुश नाहीत, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही म्हटलेले आहे. संविधानाला देश व व्यक्तीच्या संरक्षणाचे कार्य करावे लागते. संविधानातील कायदे प्रत्येकाला माहित झाले पाहिजेत.संविधान काय आहे ? याची जाणीव असली पाहिजे.त्यासाठी संविधानाची कलमे जगण्याचे विषय व्हावेत,असे मत रमेश पतंगे यांनी व्यक्त केले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसमकर म्हणाल्या की,संविधान साक्षरतेसाठी अधिवक्ता परिषदेने आयोजित केलेला हा कार्यक्रम स्तुत्य आहे.संविधान चांगल्या लोकांच्या हाती पडले,त्यांनी त्याचा चांगला वापर केला तर ते राज्य लोकराज्य होईल,असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सुपूर्द करताना सांगितले होते.परंतु फार कमी लोकांना संविधानाविषयी माहिती आहे. संविधानाने हक्क आणि कर्तव्यही सांगितली आहेत.शाळा- महाविद्यालयात संविधान हा विषय शिकवला जावा.संविधान साक्षरता आज गरजेची झाली आहे.संविधान ही आचारसंहिता ठरावी,असेही श्रीमती कोसमकर म्हणाल्या.
अध्यक्षीय समारोपात डॉ. अशोकराव कुकडे काका यांनी आपले संविधान ऐतिहासिक असल्याचे सांगितले. संविधानामुळे आपल्या देशाच्या भवितव्याची चिंता नाही. संविधान हा धर्मग्रंथ असून तो प्रत्येकाच्या अभ्यासाचा विषय व्हावा,असेही काका म्हणाले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.ॲड.श्रीराम देशपांडे यांनी प्रास्ताविकातून पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजनामागची अभिवक्ता परिषदेची भूमिका विषद केली. विलास आराध्ये यांनी साप्ताहिक विवेकचा या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश सांगितला.भारत विकास परिषदेच्या वतीने अमित कुलकर्णी यांनी विचार मांडले.
विलास आराध्ये व ॲड.
शिवकुमार गिरवलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.रुग्णसेवा सदनच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास देवगिरी प्रांताचे पालक ॲड.सुनील जाधव, सहमंत्री अतुल काळे,विभाग मंत्री किरण कोळपे,लातूर जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे, लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलराव देशपांडे, वैजनाथअप्पा लातूरे,दिलीप देशपांडे यांच्यासह शहरातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
No comments