दिवसभरातील ताज्या घडामोडी
शिंदे सरकारचा 15 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारला 6 महिने झालेत. या 6 महिन्यांत एकदाच मंत्रिमंडळ विस्तार झाला. तेव्हापासून सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली होती. आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. शिंदे गटाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या मते, 20 ते 22 जानेवारीदरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.
😎 राज्य सरकार व्हेंटिलेटरवर, संजय राऊत यांचा दावा :
राज्य सरकार व्हेंटिलेटरवर असून दोन गट पडले आहेत. हे सरकार फेब्रुवरी महिना पुर्ण पाहणार नाही, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवाय, राज्यपाल लवकरच जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संजय राऊत हे सद्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली.
💥 आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात :
माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि दापोली मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीत पोलादपूर जवळ कशेडी घाटात हा अपघात झाला. रात्री दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. तर सुदैवाने या अपघातामध्ये आमदार योगेश कदम हे किरकोळ जखमी झाले असून ते सुखरूप बचावले आहेत.
🗣️ बोलताना अजित पवार चुकले, दिलगिरी व्यक्त :
पुण्यात एका कार्यक्रमात भाषण करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' ऐवजी 'क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर' असा उल्लेख झाला होता. यावर अजित पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. पवार म्हणाले, पुण्यात भाषणावेळी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊं माँसाहेब' या महामानवांचं स्मरण करताना, कर्तृत्व सांगताना बोलण्याच्या ओघात माझ्याकडून 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' ऐवजी 'क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर' असा उल्लेख झाला.
🏏 आज भारत-श्रीलंका 3रा टी-20 सामना करो की मारो :
भारत-श्रीलंका टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.00 वाजता खेळवला जाईल. या सामन्याच्या निकालावर मालिकेचा निकाल निश्चित होईल. सध्या तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला प्रथमच श्रीलंकेकडून घरच्या मैदानावर मालिका गमावण्याचा धोका आहे.
No comments