भाजप १४४ आमदार निवडून आणणार असेल तर शिंदे गटाचे लोक धुणीभांडी करायला ठेवलेत का - latursaptrangnews

Breaking

Monday, January 2, 2023

भाजप १४४ आमदार निवडून आणणार असेल तर शिंदे गटाचे लोक धुणीभांडी करायला ठेवलेत का

 


भाजप १४४ आमदार निवडून आणणार असेल तर शिंदे गटाचे लोक धुणीभांडी करायला ठेवलेत का


मुंबई: भाजपकडून महाराष्ट्रात 'मिशन १४४' राबवण्यात येणार आहे. जर भाजप आपले १४४ आमदार निवडून आणणार असेल तर मग शिंदे गटाची लोकं धुणीभांडी करायला ठेवली आहेत का, असा खोचक सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला. शिंदे गटातील आमदार आणि नेत्यांना भाजपच्या पायरीवरही उभे केले जात नाही. शिंदे गटाशी युती ही भाजपने केलेली तात्पुरती तडजोड आहे. हे सरकार आणि शिंदे गट फारकाळ टिकणार नाही. शिंदे गटातील अर्ध्यापेक्षा जास्त आमदार स्वत: भाजपमध्ये विलीन करुन घेण्याच्या तयारीत आहेत. कारण शिवसेना त्यांना परत पक्षात घेणार नाही. त्यामुळे या आमदारांसमोर कोणताही पर्याय उरलेला नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सोमवारी महाराष्ट्रात भाजपच्या मिशन १४४ चा शुभारंभ होणार आहे. त्यासाठी जे.पी. नड्डा आज चंद्रपूर आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी जे.पी. नड्डा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने मोर्चेबांधणी करण्यासाठी पाऊल टाकणार आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. शिंदे गट आणि भाजपची युती ही तात्पुरती तडजोड आहे. शिंदे गटात अंतर्गत वाद सुरु झाले असून त्यांच्यातच अनेक गट तयार झाले आहेत. त्यामुळे हे सरकार आणि शिंदे गट फारकाळ टिकणार नाही. भाजप महाराष्ट्रात १४४ आमदार निवडणून आणण्याची रणनीती आखत आहे. मग अशावेळी शिंदे गटातील लोक हे केवळ धुणीभांडी करायला ठेवले आहेत का? भाजपच्या मिशन १४४ मध्ये शिंदे गटाला कुठे स्थान आहे, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
शिंदे गटात सध्या टोळीयुद्ध सुरु झाले आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना पूर्वीइतकीच जोमाने वाढत आहे. दीपक केसरकर यांनी आत्मपरीक्षण केल्यानंतर त्यांना दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, असे वाटू लागले आहे. शिंदे गटात आणखी काही गट निर्माण झाले आहेत. कालच अब्दुल सत्तार यांनी माझ्याच पक्षातील काही लोक माझा 'करेक्ट कार्यक्रम' करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे म्हटले होते. या अंतर्गत वादांमुळे शिंदे गट फारकाळ टिकणार नाही. दीपक केसरकर यांना आत्मपरीक्षण केल्यानंतर याची जाणीव झाली आहे. त्यामुळेच वैफल्यग्रस्त झालेल्या केसरकर यांना दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, असे बोलावे लागत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
    अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या एका वक्तव्यावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. भाजपने याविरोधात वातावरण तापवून अजित पवार यांना कोंडीत पकडले आहे. याविषयी संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी 'नो कमेंटस' अशी प्रतिक्रिया देत या विषयावर बोलणे स्पष्टपणे टाळले. संजय राऊत यांनी अनेक प्रश्न विचारण्यात आले. मात्र, मला काही माहिती, मी या विषयाचा अभ्यास करुन बोलेन, अशा त्रोटक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment