धक्कादायक! नांदेडमध्ये वडील आणि भावांनी तरुणीला संपवलं




 

धक्कादायक! नांदेडमध्ये वडील आणि भावांनी तरुणीला संपवलं


नांदेड: पुरोगामी आणि सामजिकदृष्ट्या प्रभल्भ असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. मात्र, आजही राज्यातील ग्रामीण भागामध्ये जुन्या चालीरिती, प्रतिष्ठा आणि परंपरांचा खोलवर पगडा आहे. अशाच बुरसटलेल्या मानिसकतेमधून नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन एका तरुणीची तिच्या कुटुंबीयांनीच हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेडच्या महापाल पिंपरी येथे ही दुर्दैवी घटना घडली. याठिकाणी राहणाऱ्या एका तरुणीचे तिच्याच नात्यामधील तरुणाशी प्रेमसंबंध होते. ही तरुणी वैद्यकीय शिक्षण घेत असून तिसऱ्या वर्षात शिकत होती. परंतु, तिच्या प्रेमसंबंधांची कुणकुण लागल्यामुळे कुटुंबीयांनीच या तरुणीची हत्या केल्याचे समोर आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही तरुणी नांदेडमध्येच वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिचे स्वत:च्या नात्यातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. याची कुणकुण तरुणीच्या कुटुंबीयांना लागली. त्यामुळे या तरुणीचे कुटुंबीय प्रचंड संतापले. याच संतापाच्या भरात मुलीच्या जन्मदात्या वडिलांनी आणि भावांनी या तरुणीची हत्या केली. त्यानंतर या सगळ्यांनी मिळून या तरुणीचा मृतदेह जाळून टाकला. मृतदेहाची राख झाल्यानंतर ती हवेत उधळून दिली. त्यामुळे जवळपास चार दिवस मुलीची हत्या झाल्याची बाब कोणाच्याही ध्यानात आली नाही.

अखेर या तरुणीच्या एका मैत्रिणीने या सगळ्या प्रकाराला वाचा फोडली. तरुणीच्या मैत्रिणीने थेट राज्य महिला आयोगाकडे धाव घेत सर्व प्रकार सांगितला. यानंतर तपासाची चक्रे फिरायला सुरुवात झाली. तेव्हा तरुणीशी प्रेमसंबंध असलेल्या मुलाचेही अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी वेगाने तपास सुरु केला आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री उशीरा या प्रकरणात पाच जणांना अटक केली. यामध्ये मुलीचे वडील, भाऊ, दोन चुलत भाऊ आणि मुलीच्या मामाचा समावेश आहे. या घटनेमुळे महिपाल पिंपरी गावात खळबळ उडाली असून गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post