मोठी ब्रेकिंग! उजनीचा ५० वर्षे जुना डावा कालवा पाटकूलजवळ फुटला; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
सोलापूर : उजनी धरणातून शेतीसाठी १८ जानेवारीपासून डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. सुरवातीला कमी वेगाने पाणी सोडले होते, पण काही अडथळा नसल्याने त्याचा वेग वाढवला होता. वास्तविक पाहता डाव्या कालव्यात १४०० क्युसेक पाणी मावते आणि सध्या १२५० क्युसेकपर्यंतच पाणी सोडले होते. तरीदेखील अचानक डावा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. त्या कालव्याला जवळपास ५० वर्षे पूर्ण झाली असल्याने अनेक ठिकाणी कालवा जीर्ण झाला आहे.
शेतीसाठी सोडलेले धरणातील पाणी बंद करण्यात आले असून कुरुल, बेगमपूर व कारंबा भागातील शेतकऱ्यांना आता आठ-दहा दिवसांनी पुन्हा पाणी सोडले जाणार आहे. तत्पूर्वी, लोखंडी ॲंगल टाकून त्या डाव्या कालव्याच्या फुटलेल्या ठिकाणाची दुरुस्ती केली जाणार आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना योग्य ती भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी बोलताना दिली.
ठळक बाबी...
उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले असून त्याच दरम्यान पाटकूल (ता. मोहोळ) येथे डावा कालवा फुटला आहे.
१२५० क्युसेक वेगाने पाणी सोडले होते; कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून पंचनामे करून त्यांना भरपाई दिली जाणार आहे.
फुटलेला डावा कालवा ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आला असून त्याची क्षमता १४०० क्युसेक एवढी आहे.
शेतात साचलेल्या पाण्याचा वाट मोकळी करून दिली असून जवळील ओढ्यात पाणी सोडले जात आहे.
बेगमपूर, कुरुल व कारंबा या परिसरातील शेतकऱ्यांचे पाणी आता बंद करण्यात आले आहे.
आठ-दहा दिवसांत त्याची दुरुस्ती करून पुन्हा शेतकऱ्यांसाठी पाणी सोडले जाणार आहे.
Tags
महाराष्ट्र