Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या गाडीचा अपघात, छातीला मार बसला पण प्रकृती सुखरुप - latursaptrangnews

Breaking

Wednesday, January 4, 2023

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या गाडीचा अपघात, छातीला मार बसला पण प्रकृती सुखरुप

 


Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या गाडीचा अपघात, छातीला मार बसला पण प्रकृती सुखरुप


बीड: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनजंय मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. धनजंय मुंडे यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली. यामध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामळे माझ्या गाडीचा लहानसा अपघात झाला आहे. यामध्ये माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी सध्या मला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केली आहे.
या अपघातानंतर धनंजय मुंडे यांच्या कारचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये कारच्या पुढच्या काही भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याचे दिसत आहे. त्यावरुन हा अपघात अगदीच किरकोळ म्हणता येणार नाही. सध्या धनंजय मुंडे यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, धनंजय मुंडे यांना दुपारी दोनच्या दरम्यान ॲम्बुलन्सद्वारे लातूरहून मुंबई येथील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

गेल्यावर्षी धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. तेव्हा धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांची प्रकृती व्यवस्थित होती. मात्र, या अपघातात त्यांच्या छातीला मार बसला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना पुढील उपचारांसाठी मुंबईला आणण्यात येणार आहे. याप्रकरणात आता आणखी काय माहिती समोर येते, हे पाहावे लागेल.
काही दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. त्यांची गाडी नदीच्या पुलावरून ५० फूट खाली कोसळली होती. या अपघातामध्ये जयकुमार गोरे यांना गंभीर दुखापत झाली होती. साताऱ्यातील फलटण येथील मलठण येथे हा अपघात झाला होता. त्यांच्यावर सध्या पुण्याच्या रुबी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

No comments:

Post a Comment