लिव्ह इन पार्टनरला संपवलं.....

 


लिव्ह इन पार्टनरला संपवलं.....


नालासोपारा: मुंबईजवळच्या नालासोपारा हत्या प्रकरणाच्या तपासातून महत्त्वाची माहिती उघडकीस आली आहे. हार्दिक शाहनं त्याच्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून तिचा मृतदेह बेडमध्ये लपवला. पार्टनरची हत्या केल्यानंतर शाह १२ तास तिच्या मृतदेहाजवळ बसून होता. महिलेचा मृतदेह ज्यावेळी सापडला, त्याच्या ३६ तासांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नागारकर यांनी दिली. मृतदेह सापडण्याच्या २४ तासांपूर्वीच आरोपी शाह फरार झाला होता. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी १३ फेब्रुवारीला हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली.

हार्दिक शाहनं त्याची ३५ वर्षीय लिव्ह इन पार्टनर मेघा धनसिंह तोरवीची हत्या केली. मेघा मूळची कर्नाटकच्या गुलबर्गीची रहिवासी होती. नर्स म्हणून प्रशिक्षण घेतल्यानं ती मुंबईत नोकरीसाठी आली. हार्दिक आणि मेघा यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मागील सहा महिन्यांपासून ते नालासोपाऱ्यात एका फ्लॅटमध्ये भाड्यानं राहत होते. दोघांपैकी एकटी मेघाच कमावती होती. हार्दिक बेरोजगार होता. हार्दिक व्यसनाच्या आहारी गेल्यानं दोघांमध्ये वाद व्हायचे.

मेघाची हत्या केल्यानंतर हार्दिक तुळींज पोलीस ठाण्याच्या बाहेर पोहोचला. जवळपास दोन तास हार्दिक पोलीस ठाण्याच्या परिसरात होता. त्याला पोलीस ठाण्यात पोहोचून गुन्ह्याची कबुली द्यायची होती. मात्र त्यासाठी त्याला धीर एकवटता आला नाही. त्यामुळे हार्दिक तिथून पळाला. त्याला पोलिसांना राजस्थानमधून अटक केली आणि बुधवारी नालासोपाऱ्यात आणलं. त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं आरोपीला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

हार्दिक आणि मेघामध्ये सातत्यानं वाद व्हायचे. अशाच वादादरम्यान हार्दिकनं मेघाला संपवलं. भांडण सुरू असताना हार्दिकनं मेघाचा मोबाईल तोडला. दोघांकडे मोबाईल दुरुस्त करण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे हार्दिक आणि मेघाचा वाद झाला. दोघांमध्ये दररोज होत असलेल्या वादांना शेजारी कंटाळले. त्यांनी याची माहिती जोडप्याला फ्लॅट मिळवून दिलेल्या एजंटकडे केली. त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा वाद पेटला. यावेळी हार्दिकनं टॉवेलच्या मदतीनं मेघाचा गळा आवळला आणि तिला संपवलं. यानंतर त्यानं मेघाचा मृतदेह बेडमध्ये लपवला.

Post a Comment

Previous Post Next Post