उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भोईरवाडी शाळेच्या नूतन इमारतीचे उद्धाटन - latursaptrangnews

Breaking

Friday, February 10, 2023

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भोईरवाडी शाळेच्या नूतन इमारतीचे उद्धाटन

पुणे, दि.10: उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कॅपिटॅलँड होप फांऊडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून भोईरवाडी (ग्रामपंचायत मान) येथे उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्धाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख, मुळशीचे गट विकास अधिकारी संदीप जठार, कॅपिटालॅंड होप फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधांशू दत्त, उपाध्यक्ष मनोज सोमवंशी, शालेय समितीचे अध्यक्ष काशिनाथ भोईर, मुख्याध्यापक रामेश्वर झुळुक आदी  उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, कॅपिटालँड होप फाऊंडेशने सामाजिक उत्तर दायित्व निधीतून खासगी शाळेएवढीच उत्तम दर्जाची  शाळा उभारुन लहान मुलांच्या भविष्याच्यादृष्टीने मोठे काम केले आहे. खासगी शाळांपेक्षाही अधिकच्या सुविधा या शाळेत उपलब्ध केल्या आहेत. या शाळेतील विद्यार्थी भविष्यात विज्ञान,  कला, राजकारण, क्रीडा अशा विविध क्षेत्रात पुढे जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खेळ, सांस्कृतिक आदी उपक्रमांबरोबरच शैक्षणिक कार्यासाठी सामाजिक उत्तरदायित्त्व निधी योग्यप्रकारे कसा खर्च करावा याचे हे उत्तम उदाहरण आहे. शाळेची देखभाल, स्वच्छता राखण्याची जबाबदारी शाळा आणि ग्रामस्थांची आहे. गावच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने काम केले पाहिजे, असेही उद्योग मंत्री म्हणाले.

ग्रामस्थांच्या मागण्या लक्षात घेऊन ग्राम दैवत कमलजादेवी मंदिरासमोरील मोकळी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत, टी.सी.एस कंपनी ते भोईरवाडा नवीन रस्ता बांधणीसाठी रस्त्याबाबत तात्काळ अंदाजपत्रक तयार करण्याचा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यासाठी आवश्यक निधी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून देण्यात येईल,  असे श्री. सामंत यांनी सांगितले.

श्री. प्रसाद म्हणाले, देशातील शाळांचा मूलभूत आणि गुणवत्तापूर्ण विकास करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया’ (पीएमश्री) योजनेत जिल्ह्यातील 403 शाळांचा समावेश झाला आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून सामाजिक उत्तरदायित्व निधीतून या शाळेत सुसज्ज इमारत, ग्रंथालय, संगणक कक्ष, अद्ययावत प्रयोगशाळा, शुद्ध पेयजल, स्वच्छ शौचालये, मध्यान्ह भोजन योजना, सौर उर्जा युनिट, बालवाचनालय आदी भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या भागातील उद्योजकांनी वेळोवेळी सीएसआरमधून निधी दिला आहे. शिक्षण गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रयत्न करीत आहेत, असे श्री. प्रसाद यावेळी म्हणाले.

कॅपिटालॅंड होप कंपनीच्यावतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत भारतातील 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून अंतिम निवड झालेल्या 16 पैकी 9 विद्यार्थीं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोईरवाडी शाळेचे आहेत. हे विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोईरवाडी विषयी माहिती

या शाळेची स्थापना जून 1960 मध्ये करण्यात असून शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत 261 मुले व 244 मुली असे एकूण 505 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सामान्य ज्ञान प्रश्न, प्रश्न मंजुषा, चित्रकला, शालेय खेळ व क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, क्षेत्र भेट उपक्रम, गणित दिवस, भाषा दिन, शिष्यवृती परीक्षा आदी उपक्रम घेण्यात येत आहेत.

महाटेक प्रदर्शनाला भेट

या कार्यक्रमापूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कृषि महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित  ‘महाटेक 2023’ या लघु व मध्यम उद्योजकांच्या प्रदर्शनाला भेट दिली. शासन लघु व मध्यम उद्योजकांच्या विकासासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाटेकचे संचालक विनय मराठे, सुमुख मराठे,  प्रकल्प संचालक संतोष नांदगावकर, महाव्यवस्थापक सुधाकर थत्ते, पुणे प्रकल्प संचालक महेन्द्र घारे आदी उपस्थित होते. मंत्री सामंत यांनी विविध दालनांना भेट देऊन माहिती घेतली.



from महासंवाद https://ift.tt/MCfisou
via IFTTT https://ift.tt/M6gAlxq

No comments:

Post a Comment