मुंबई दि. 2 : रोजगार हमी योजने (‘रोहयो’) अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले.
राज्यातील रोहयो अंतर्गत कार्यरत असलेल्या ३५०० कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्री श्री. भुमरे बोलत होते. आमदार विनोद अग्रवाल, संजय गायकवाड, संजय बनसोडे, महेंद्र दळवी, अपर मुख्य सचिव नंदकुमार, यांच्यासह कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, राज्यातील ‘रोहयो’अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात शासन सकारात्मक आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी असलेली समिती स्थापन करून त्यावर तातडीने अहवाल मागविण्यात येईल. मानधन वाढ तसेच इतर मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. भुमरे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींना सांगितले तसेच राज्यभर सुरू असलेला संप मागे घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
०००
राजू धोत्रे/विसंअ/
from महासंवाद https://ift.tt/MEJGHiV
via IFTTT https://ift.tt/dl7fUBk