वाळू माफियांचा धुमाकूळ....

 


वाळू माफियांचा धुमाकूळ, भरधाव टिप्परची दुचाकीला धडक


बुलढाणा : अनेक वेळा वाळू माफियांचे अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले केल्याचे प्रकार आपण ऐकत असतो. कोणतीही परवा न करता फक्त काही पैशांसाठी ते थेट जीवघेणे हल्ले करताना विचार देखील करत नाही. वाळू माफियांचा दिवस हा रात्री सुरू होतो. चोरीच्या मार्गाने अवैधरित्या वाळू उपसा करून बांधकामापर्यंत ते रात्रीचा दिवस करतात. कमी वेळे त्यांना हे काम पार पाडायचे असतात. त्यामुळे ग्रामीण भागातून नदीकाठी ते शहरापर्यंत यांच्या टिप्पर गाड्या सुसाट असतात. आता त्यामध्ये अपघात देखील घडत आहेत. असाच एक अपघात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे झाला आहे.

मलकापूर तालुक्यातील बेलाड येथून दुचाकीवर घीर्णीकडे जात असलेल्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने जबर धडक दिली. या धडकेनं दुचाकीस्वार खाली पडला आणि त्याच्या डोक्यावर टिप्परचे चाक गेल्याने झालेल्या अपघातात २५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील अन्य दोघं जखमी झाल्याची घटना काल रात्री पावणे नऊ वाजताच्या दरम्यान घीर्णी येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे बेलाड येथील प्रदीप भरत निंबोळकर (वय २५), बळीराम भरत निंबोळकर (वय २२ ) आणि गजानन त्रंबक सबारे (वय ३२) सर्व रा. बेलाड. हे तिघं दुचाकी क्रमांक एमएच १४ जेडी ८९८४ ने गिरणीकडे जात होते. तेवढ्यात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्पर क्रमांक एमपी ०९ एचजे ५०५५ ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत प्रदीप भरत निंबोळकर हा खाली पडला आणि त्याच्या डोक्यावरून टिप्परचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला.


बळीराम भरत निंबोळकर आणि गजानन त्रंबक संबारे हे दोघं जखमी झाले आहेत. बेलाड घीर्णी रस्त्यावर हा अपघात झाला असून याच रस्त्यावर जिल्हा परिषद शाळा आणि हायस्कूल आणि बस स्टॉप सुद्धा आहे. गावातून जाताना वाहने सावकाश चालवा याबाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी असताना देखील वाहनचालक काही ऐकत नसल्याने त्या भरधाव वाहनांचा प्रदीप बळी ठरला असल्याची ग्रामस्थांकडून खंत व्यक्त करण्यात येत आहे. वाहने सावकाश न चालवल्यास हा रस्ता ग्रामस्थ बंद करणार असल्याची चर्चा सुद्धा या घटनेनंतर समोर येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post