नवभारताच्या निर्माणात योगदान द्या – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी - latursaptrangnews

Breaking

Sunday, February 5, 2023

नवभारताच्या निर्माणात योगदान द्या – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

अकोला,दि. (जिमाका)- आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. कृषी पदवीधारकांना देशाची सेवा करण्याची मोठी संधी आहे. आपल्या क्षेत्रात अथक परिश्रम करुन आपण नवभारताच्या निर्माणात योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज केले. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३७ वा दीक्षान्त समारंभ आज संपन्न झाला. या सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत राज्यपालांनी नव स्नातकांशी संवाद साधला.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात हा दिमाखदार सोहळा पार पडला. या सोहळ्यास भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे माजी उपमहासंचालक, श्री करण नरेंद्र कृषी विद्यापीठ जोबनेर, कुलगुरु महाराणा प्रताप कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ तथा संचालक गितांजली तंत्रज्ञान व विज्ञान संस्था उदयपूर डॉ. नरेंद्र सिंह राठोर, कुलगुरु डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, संचालक विस्तार शिक्षण  डॉ. धनराज उंदिरवाडे, आ. विप्लव बाजोरिया तसेच विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य, माजी कुलगुरु डॉ. व्यंकट मायंदे, डॉ.जी.एम. भराडे, डॉ.विलास भाले, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

आपल्या संबोधनात राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, कृषी सेवा आणि शिक्षण हे असे क्षेत्र आहेत जे नेहमीच फलदायी ठरले आहे. कृषी क्षेत्रात अमाप संधी आहेत. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा कृषी क्षेत्र आहे. अशाप्रकारे कृषी क्षेत्राला संशोधक, विद्यार्थी, कुशल मनुष्यबळ पुरविणारे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जेथे स्थित आहे त्या अकोला जिल्ह्याचे यामुळेच देशासाठी मोठे योगदान आहे.  आपल्या संस्कृतीत कृषी हे क्षेत्र नेहमीच सर्वश्रेष्ठ मानण्यात आले आहे.  कोरोना काळातही सर्व क्षेत्र बंद पडले असतांनाही केवळ कृषी हेच क्षेत्र अव्याहतपणे सुरु होते, असे त्यांनी सांगितले. नव्या पदवीधरांना संदेश देतांना राज्यपाल म्हणाले की, कृषी पदवी प्राप्त केल्यानंतर आपणास प्राप्त विद्येचा योग्य वापर करावा. यंदाचे वर्ष हे तृणधान्य वर्ष असून तृणधान्य पिकांच्या संशोधनात, त्यांच्यावरील प्रक्रिया पद्धतीत आपण आपले योगदान देऊ शकता. कृषी विद्या क्षेत्रात महिलांनी चांगली प्रगती केली आहे. त्यांचा या क्षेत्रातील योगदानाचा नक्कीच देशाला फायदा होईल, अशा शब्दात त्यांनी महिलांचे कौतुक केले. ते म्हणाले की, कृषी विद्यापीठांच्या संशोधनाला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पदवीधारकांनी, संशोधकांनी, विद्यापीठांनी प्रयत्न करावे. त्यासाठी आपली कृषी विज्ञान केंद्र सशक्त करावे,असा सल्लाही त्यांनी दिला.

कृषी विस्तार कार्यात डिजीटल तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आवश्यक डॉ. नरेंद्र सिंह राठोर

कृषी शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. असे होत असतांना हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जे विस्तार कार्य केले जाते; त्यात डिजिटल तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. नरेंद्र सिंह राठोर यांनी केले. ते म्हणाले की, शिक्षण, संशोधन, पूरक संशोधन  आणि विस्तार असे कृषी शिक्षणाचे टप्पे आहेत. त्याद्वारेच आपण कृषी उत्पादनात वाढ करु शकतो. त्यासाठी आता उद्योगांना पूरक असे मनुष्यबळ निर्माण व्हावे, अशीही अपेक्षा आहे.  त्यादृष्टीने विद्यापीठांनी आपल्या अभ्यासक्रमांमध्ये बदल करावे. संशोधन हे सुद्धा उद्यमशीलतेला चालना देणारे असावे, शेतकऱ्यांमध्येही उद्योगाभिमुखता रुजविण्यासाठी प्रयत्न व्हावे,असे त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न कुलगुरु डॉ. गडाख

प्रास्ताविकात कुलगुरु डॉ. गडाख यांनी विद्यापीठाच्या वाटचाली विषयी माहिती दिली. ते म्हणाले की, विद्यापीठाने आजपर्यंत १७६ वाण विकसित केले असून त्यातील १९ वाण हे राष्ट्रीय स्तरावर शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.  तसेच ४६ अवजारेही विकसित केली आहेत.  विद्यापीठाने आपल्या संशोधनाचे ३७ बौद्धिक संपदा हक्क   मान्यतेसाठी पाठविले आहेत. विविध संशोधन प्रकल्पांमध्ये विद्यापीठाचा पुढाकार असून त्यासाठी निधीही प्राप्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त  ज्वारी पिकाच्या २६००० वाणांची लागवड करुन त्यांचाही अभ्यास करण्यात येत आहे. ‘एक दिवस बळीराजासाठी’ सारख्या उपक्रमातून विद्यापीठाचे प्राध्यापक, संशोधक हे ९८ गावांमधून ३६९६ शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचले आहेत.  तसेच विविध माध्यमांचा वापर करुन विद्यापीठ आपले संशोधन, तंत्रज्ञान हे अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवित असते.

असा झाला सोहळा

वाद्यवृंदाद्वारे मान्यवरांचे दीक्षान्त मिरवणुकीद्वारे कार्यक्रम स्थळी आगमन झाले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  त्यानंतर कुलपतींनी दीक्षान्त समारंभ सुरु करीत असल्याचे घोषित केले. त्यानंतर विद्यापीठ गीत, सरस्वती वंदना,  झाली. प्रास्ताविकानंतर मुख्य दीक्षान्त सोहळ्यास सुरुवात होऊन पदवीदानास प्रारंभ झाला. विविध गुणवत्ता व पारितोषिक धारकांना त्यांची पारितोषिके प्रदान करण्यात आली. या सोहळ्यात कृषी विद्याशाखा, कृषी अभियांत्रिकी विद्याशाखा, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम व आचार्य अशा एकूण ४३२७ पदव्यांचे पदवीदान करण्यात आले. ३० आचार्य पदवीधारक, २३ स्नातकोत्तर तर १९२२ पदवीपूर्व पदवीधारक यांनी समारंभात उपस्थित राहून  पदवी प्राप्त केली.  त्याच प्रमाणे उत्कृष्ट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्व नव पदवीधारकांना कुलपतींनी दीक्षान्त उपदेश दिला. त्यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पसायदानानंतर कुलपतींनी दीक्षान्त समारंभ संपन्न झाल्याचे घोषित केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



from महासंवाद https://ift.tt/jKQxv9P
via IFTTT https://ift.tt/Co0cIpk

No comments:

Post a Comment