मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा -विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे

अमरावती, दि. १३ : लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचे कर्तव्य पार पाडणे आवश्यक असते. मतदानाविषयीची उदासीनता दूर करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे आयोजित भित्तीचित्रकला व व्हिडीओ मेकिंग स्पर्धेचा बक्षीसवितरण कार्यक्रम बचतभवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार संतोष काकडे, नायब तहसीलदार श्याम देशमुख आदी उपस्थित होते.

लोकशाहीने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार अनेकांकडून बजावला जात नाही. जागरूक नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदानाविषयी उदासीन राहून चालणार नाही. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे आवाहन डॉ. पांढरपट्‌टे यांनी केले.

मतदार यादीत नाव नसलेल्या १८ वर्षांवरील युवक, तसेच प्रत्येकाने मतदार नोंदणी पूर्ण करावी. तसेच प्रत्येक निवड़णूकीत स्वत: मतदान करून आपल्या कुटुंबियांनाही सहभागी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले.

अमरावती जिल्हा निवडणूक कार्यालयाने घेतलेली स्पर्धा राज्यात अभिनव ठरली, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. व्यवहारे यांनी प्रास्ताविकात सांगितले. करण पारिख यांनी सूत्रसंचालन केले. श्री. देशमुख यांनी आभार मानले.

भित्तीचित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे ४ हजार रू. चे पारितोषिक सुनीत निसगुडे, विशाल वानखडे, निखिल लिंगाटे, प्रशिक  तायडे यांना, तसेच ३ हजार रु. चे दुसरे बक्षीस आकांक्षा मोटघरे, रोहिणी नेवारे, प्रगती चौरे, समीक्षा मालसाने, ऐश्वर्या विभूते यांना आणि २ हजार रू. चे तिसरे बक्षीस परीक्षित भेले, दर्शन खेसे व अमर कदम यांना मिळाले. गणेश सावंत, अस्मिता सावंत, सार्थक धवल, पूर्वा खुशादे, सानिका बुधाले यांना १ हजार रू. चे व संकेत ताभणे, दीपक खंडागळे, ओम इंगळे, प्रणाली दातिर, पायल गणोरकर व सौरभ इंगोले यांना साडेसातशे रू. चे प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले.

व्हिडीओ मेकिंग स्पर्धेत रवींद्र वानखडे यांना प्रथम क्रमांकांचे ३ हजार रू. चे, तर रूचा काटकर व नेहा सराफ यांना २ हजार रु. चे दुसरे बक्षीस मिळाले. निशिगंधा कांबळे, दिप्ती टेंभुर्णे, अश्विनी खडसे यांना १ हजार रु. चे तिसरे, तसेच प्रियंका भटेजा व अतुल चव्हाण यांना साडेसातशे रु. चे प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले. सर्वाधिक व्ह्युज मिळवल्याबद्दल सार्थक मुंडवाईक यांना २ हजार रू. चे विशेष पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेला आय- क्लीन संस्थेचे सहकार्य मिळाले.

०००



from महासंवाद https://ift.tt/nAO4V2v
via IFTTT https://ift.tt/7ZL9FKQ

Post a Comment

Previous Post Next Post