बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी : एक झंजावात !
बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी : एक झंजावात !
विश्व वंदनीय, परमपूज्य पितामह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वतेच्या जोरावर भारतात दलित अस्मितेचा एक झंजावात निर्माण केला होता. त्यांचे अकाली महापरिनिर्वाण म्हणजे दलित चळवळीवर फार मोठा आघात ठरला. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे अनेक तुकडे झाले. प्रत्येक गट मीच खरा आंबेडकरवादी म्हणून मिरऊ लागला. सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन स्वतःची राजकीय सत्ता कशी प्रस्थापित करता येईल, ज्यामुळे सामाजिक समता प्रस्थापित होईल, याकडे लक्ष न देता जातदांडग्या व धनदांडग्या प्रस्थापित राजकीय पक्षांबरोबर समझौता, युती, आघाडी, पाठिंबा यातच मश्गूल राहून प्रत्येक गटाने स्वतःचे अस्तित्व संपऊन घेतले.
१९७१ मध्ये पुण्याच्या गाडगेबाबा धर्म शाळेत काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाची जी युती झाली, त्यास रिपब्लिकन पक्षाचे एक सामान्य कार्यकर्ते या नात्याने मा. कांशीरामजी यांनी तीव्र विरोध केला. ५२१ पैकी गांधीच्या काँग्रेस पक्षाला ५२० आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाला फक्त एक जागा या युतीत सोडण्यात आली होती. ही युती सन्मानजनक नसून अपमानजनक आहे, ही बाबासाहेबांच्या विचारांची अवहेलना आहे, असे कांशीरामजी ओरडून ओरडून, घसा कोरडा करुन सांगत होते पण तिथे त्यांचे कुणीही कांहीही ऐकून घेत नव्हते. युती झाली म्हणून सारे दलितजन आनंदोत्सव साजरा करीत होते. एकमेकांना पेढे भरवित होते.
हे सारे पाहून एकटे कांशीरामजी मात्र प्रचंड उदास झाले होते. रिपब्लिकन पक्षाच्या अशा लाचार कार्यप्रणालीची त्यांना राहून राहून चीड येत होती, तरीही त्यांनी हिंमत हारली नाही. ते सरळ तड तड चालत बस स्टँडला गेले. नाशिकच्या बसमध्ये बसले. नाशिकला गेल्यावर त्यांनी दादासाहेब गायकवाड यांचे घर शोधून काढले. त्यांना हात जोडून विनंती केली. पुण्यात झालेली युती रद्द करा, आपण स्वबळावर लढू, सर्व जाती धर्माचे उमेदवार उभे करु, आपली स्वतःची सत्ता स्थापन करु, नाही तरी आपली पाच पंचवीस माणसे तरी निवडून आणू असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला, पण दादासाहेबांनी त्यांचे कांहीही ऐकले नाही. स्वबळावर महाराष्ट्रात लढता येत नाही. "तुम यूपी के चमार हो, उधर जा कर देखो, यहां महाराष्ट्र में ऐसा कुछ नहीं होता, यहां बडे लोगों से हाथ मिलाकर ही चलना पडता है.." असे म्हणून दादासाहेबांनी कांशीरामजी यांना यूपीचा रस्ता दाखविला.
यानंतर कांशीरामजी यांनी काँग्रेसला धडा शिकविण्याचा निर्धार केला. युती म्हणजे काय असते ? कशी असते ? "बाबासाहब डा. भीमराव अंबेडकर जी की विचारधारा को मै पराजित होते हुए नहीं देख सकता ! बाबासाहब की विचारधारा के आधार पर ही हम हुक्मरान बन सकते हैं...!!" हे मी दाखऊन देतो असा दृढ संकल्प कांशीरामजी यांनी केला. त्याप्रमाणे नियोजन करुन प्रत्यक्ष कामाला त्यांनी पुण्यापासून सुरुवात केली.
कांशीराम हरिसिंह रामदासियां यांचा जन्म गुरुवार दि. १५ मार्च १९३४ रोजी भारतातील पंजाब राज्यातील रोपड जिल्ह्यातील खवासपूर तालुक्यातील पिर्थीपूर बुंगाग्राम येथे चर्मकार जातीतील गरीब कुटुंबात झाला. कांशीराम हे सर्वात मोठे अपत्य. अन्य दोन लहान भाऊ आणि चार बहिणी असा मोठा परिवार होता. घरची परिस्थिती बेताचीच होती. वडिलांनी आपल्या सर्व आशा आकांक्षा कांशीराम यांच्यावरच केंद्रीत केल्या होत्या. तोच कांही तरी शिकून सवरुन घर परिवाराचा उद्धार करील अशी त्यांना आशा होती, म्हणून त्यांनी कांशीराम यांना चांगल्या शाळेत टाकले. आपण अहोरात्र काबाड कष्ट करुन ते कांशीराम यांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देत होते. कांशीराम हे प्रत्येक वर्गातील एक हुशार विद्यार्थी म्हणून नावाजले जात होते.
विज्ञानाचे उच्च शिक्षण घेतल्यानंतर कांशीराम यांनी नोकरीची शोधाशोध सुरु केली. १९५८ मध्ये पुण्यात केंद्र सरकारच्या रक्षा उत्पादन विभागात सहाय्यक वैज्ञानिक म्हणून वर्ग एकची चांगल्या पगाराची नोकरी त्यांना मिळाली. आपल्या खर्चापुरता पैसा ठेऊन बाकी सर्व रक्कम ते पोस्टाने गावाकडे पाठवायचे. यामुळे सर्व परिवार सुखात होता. अन्य भावंडे शिकत होती. कांशीराम यांच्या आईला आता फक्त एकच चिंता होती ती फक्त कांशीराम यांच्या लग्नाची, कारण बरेच नातेवाईक टपून होते, आपली मुलगी नोकरी करणाऱ्या कांशीराम यांना देण्यासाठी ते आईची भेट घेत होते.
सन १९६४ च्या दरम्यान कांशीरामजी यांच्या कार्यालयात दिना भाना नावाच्या अनुसूचित जातीतील भंगी जातीच्या एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने प्रशासनाच्या विरोधात बंड पुकारले होते. कार्यालयाने शासकीय सुट्ट्यांची एक यादी तयार केली होती, त्यात बुद्ध आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सुट्टीचा समावेश नव्हता. दिना भाना यांना ही गोष्ट खटकली, त्यांनी प्रशासनाला लेखी अर्ज देऊन बुद्ध आणि आंबेडकर जयंतीच्या सुट्ट्यांची मागणी केली. याचा उच्चवर्णीय प्रशासनाला खूप राग आला, त्यांनी दिना भाना यांना विचारले, सुट्टी पाहिजे की नोकरी पाहिजे ? त्यांनी सांगितले, मला दोन्ही पाहिजे ! तो माझा हक्क आहे.
प्रशासनाने सुट्टी तर दिली नाही पण दिना भाना यांना नोकरीवरुन काढून टाकले. या अन्यायाच्या विरोधात ते एकटे लढत होते. कार्यालयातील प्रत्येक मागासवर्गीय कर्मचाऱ्यांकडे जाऊन ते सहकार्य करण्याची विनंती करीत होते पण त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. प्रत्येकाला आपली नोकरी प्रिय होती. दिना भाना यांना साथ देणे म्हणजे प्रशासनाचा रोष ओढऊन घेणे होते. शेवटी कांशीराम यांना दिना भाना यांनी विनंती केली. कांशीराम यांनी दिना भाना यांना समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला. सुट्ट्यांचा आग्रह सोडा, प्रशासनाची माफी मागून नोकरी परत मिळवा. एवढी चांगली केंद्र सरकारची नोकरी गमाऊ नका, लेकरं बाळं उपाशी मरतील, नीट विचार करा.
दिना भाना आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांना सुट्टी पाहिजे होती आणि नोकरी देखिल पाहिकजे होती. कांशीराम विचार करु लागले. कोण बुद्ध, कोण आंबेडकर ? त्यांनी काय केले आपल्यासाठी ? त्यांच्यासाठी दिना भानाने नोकरी गमावली ! नोकरीपेक्षा महामानवांच्या सुट्टींचा स्वाभिमान महत्वाचा समजणाऱ्या दिना भाना यांचा गर्व कांशीराम यांना वाटला. त्याच कार्यालयातील डी. के. खापर्डे नावाच्या बौद्ध कर्मचाऱ्याने कांशीराम यांची तळमळ ओळखली. त्यांनी कांशीराम यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक पुस्तक "जाती संस्थेचे विच्छेदन !" (Anhilation of caste) खापर्डे यांनी कांशीराम यांना वाचण्यासाठी आणून दिले.
हे पुस्तक कांशीराम यांनी एका झटक्यात वाचून काढले. पुन्हा पुन्हा ते पुस्तक त्यांनी अनेक वेळा वाचले. त्यांना आता कळून चुकले की दिना भाना का लढतो आहे ? नोकरीपेक्षा स्वाभिमान किती महत्वाचा आहे ! दिना भाना यांच्यासाठी कांशीराम यांनी प्रशासनाला वेठीस धरले परंतु जातीयवादी प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम होते. कांशीराम यांनी समजाऊन सांगण्याचा लेखी व तोंडी भरपूर प्रयत्न केला. सहा फूट उंच तगड्या कांशीराम यांनी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची या प्रकरणात धुलाई देखिल केली. बाहेरुन सामाजिक व राजकीय दबाव आणण्याचा देखिल प्रयत्न करुन पाहिला परंतु प्रशासन थोडेही झुकायला तयार नव्हते.
शेवटी कांशीरामजी कोर्टात गेले. आपला भरपूर वेळ व पैसा त्यांनी दिना भाना यांच्यासाठी खर्च केला. वकिलाला लागतील तेवढे पैसे दिले. कांशीरामजी यांच्या प्रयत्नाला यश आले, शेवटी दिना भाना यांचा विजय झाला. कांशीराम यांनी कोर्टाचा आदेश घेऊन दिना भाना यांना कार्यालयात सन्मानाने नेऊन नोकरीवर रुजू करावयास लावले पण स्वतः कांशीरामजी यांनी नोकरीचा राजीनामा दिला. दिना भाना यांच्या नोकरीसाठी संघर्ष करणाऱ्या कांशीराम यांनी स्वतःची नोकरी का सोडली ? देशात असे किती तरी दिना भाना असतील जे आपल्या स्वाभिमानासाठी संघर्ष करीत असतील ! त्या सर्वांना साथ द्यायला प्रत्येक ठिकाणी कांशीराम थोडेच सापडतील ? मग कांशीराम एका कार्यालयापुरते सिमित कसे काय राहतील ?
आपल्या आईला पस्तीस पानांचे पत्र लिहून कांशीरामजींनी कळऊन टाकले की आजपासून कांशीराम तुमच्यासाठी मेला आहे. बहुजन समाज हेच आता माझे कुटुंब आहे. मी घरी येणार नाही, लग्न करणार नाही, कुणाशी नातेसंबंध ठेवणार नाही, बँकेत खाते उघडून पैसे जमा ठेवणार नाही, देशात कुठे माझ्या नावावर जमिन जुमला व संपती बाळगणार नाही. आता यापुढे डाॅ. बाबासाहेब यांचे विचार आणि बहुजन समाजासाठी जगणार आणि बहुजन समाजासाठीच मरणार ! असा कठोर निर्धार करुन त्याप्रमाणे सर्वस्व कुर्बान करुन कठोर वाटचाल करणारे त्यागमूर्ती कांशीरामजी हे भारतातील नव्हे तर जगातील एकमेव नेते आहेत.
नोकरी सोडल्याने पुण्यात ओळखीच्या कुणाही कार्यकर्त्यांकडे राहून एक खटारा सायकल घेऊन सारखे फिरत राहायचे. कर्मचारी आणि समाजात जागृती करायची. आंबेडकरवाद मांडायचा. लोकांना स्वाभिमान शिकवायचा, रोज बैठका, काॅर्नर सभा, भेटीगाठी, चर्चा यातच दिवस जायचा. भेटली कुठे सन्मानाने तर कोरभर भाकर खायचे, नसता पाणी पिऊन झोपी जायचे, सकाळी ऊठून आंघोळ करुन कपडे स्वच्छ धुऊन वाळू घालायचे, स्वच्छ राहायचे, स्वच्छ कपडे घालायचे, पायी किंवा सायकलने फिरायचे, हाच त्यांचा नित्यक्रम झाला होता. वर्ग एकचा अधिकारी असलेल्या व्यक्तीने बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वतःच्या भौतिक आणि वैयक्तिक सुखाकडे पूर्णपणे पाठ फिरवली होती.
अनुसूचित जाती, अनु. जमाती, अन्य मागास जाती आणि अल्पसंख्यांक कर्मचारी कल्याण संस्थेची पुण्यात स्थापना करुन कांशीरामजी यांनी रितसर कामाला सुरुवात केली. त्यांच्यासोबत निष्ठेने साथ देणारे शेकडो कर्मचारी सभासद अहोरात्र काम करु लागले. हळूहळू समाजात बुद्ध, रविदास, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ, गाडगेबाबा यांच्या विचारांची रितसर पेरणी होऊ लागली. समाज जागा होऊ लागला. अधून मधून बाहेर राज्यातही कांशीराम जाऊ लागले. तिथेही कर्मचारी ते जोडत होते. खास करुन पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणामध्ये त्यांना भक्कम साथ मिळत होती.
आता या संघटित शक्तीचा राष्ट्रीय पातळीवर विस्तार होणे आवश्यक असल्याचे जाणऊ लागताच कांशीरामजी यांनी व्यापक योजना आखली. प्रवासाची वाट्टेल ती साधने मिळऊन जवळपास पन्नास धाडसी युवा कर्मचाऱ्यांची टीम पुण्यातून दिल्लीकडे रवाना झाली. मजल दर मजल करीत दिल्लीत आल्यानंतर दि. ६ डिसेंबर १९७३ रोजी अखिल भारतीय स्तरावरील शिक्षीत कर्मचाऱ्यांची संघटना स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय कांशीरामजी यांनी जाहिर केला. या संघटनेचे नाव, व्याप्ती, स्वरुप व रचना याबद्दल कांशीरामजी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले, त्यास सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या नविन कर्मचारी संघटनेचे नाव "बामसेफ" (बॅकवर्ड अँड मायनाॅरिटीज कम्युनिटीज एम्प्लाॅईज फेडरेशन) बी. ए. एम. सी. ई. एफ (B A M C E F) राहिल अशी घोषणा कांशीरामजी यांनी करताच टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या संघटनेचे एक लाख सभासद करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ही संघटना ब्राॅड बेस, मास बेस, केडर बेस असेल. संघर्षविरहित, अराजकीय, अनोंदणीकृत आणि धर्मनिरपेक्ष अशी ही संघटना असेल, ज्यात सर्व जाती धर्माच्या व शोषित समाजाच्या कर्मचाऱ्यांना, स्वतःच्या प्रश्नांसाठी नाही तर केवळ सामाजिक बांधीलकीच्या आधारावर प्रवेश देण्याचा मनोदय कांशीरामजी यांनी जाहिर केला, त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.
बामसेफची व्यापक संकल्पना मांडणारे सर्वेसर्वा व बामसेफचे संस्थापक म्हणून कांशीरामजी यांचा यावेळी शब्द सुमनांनी गौरव करण्यात आला. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी ही संघटना स्थापन करण्यात आल्याने कसलाही सन्मान व सत्काराचा स्वीकार न करता कांशीरामजी यांनी बाबासाहेबांची विचारधारा शिस्तबद्ध बामसेफच्या माध्यमातून जनमानसात रुजविण्याचा दृढ संकल्प करुन यावेळी बाबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल होते.
देशभरातील मागासवर्गीय व बहुजन समाजातील कर्मचारी बामसेफमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत होते. "ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाकडे मागे वळून पाहिले पाहिजे !" या बाबासाहेबांच्या सिद्धांताप्रमाणे (पे बॅक टु द सोसायटी) कर्मचारी बामसेफला नियमित वर्गणी देऊ लागले. देशभर बामसेफची अधिवेशने आणि मेळावे होऊ लागले. देशभर बामसेफ आणि कांशीराम या नावाने भिंती रंगू लागल्या. कांशीरामजी यांनी प्रशिक्षीत केलेले पेंटिंग स्क्वाड रात्रभर जागून शहर रंगऊन टाकत. शहरातील एकही सरकारी भींत कोरी सोडली जात नव्हती. त्यामुळे सामाजिक चळवळ गतीमान झाली होती.
बामसेफच्या माध्यमातून कांशीराम नावाचा एक झंजावात देशात निर्माण झाला होता. त्यामुळे शासन - प्रशासन हादरुन गेले होते. "हत्ती" कसा काढायचा याचे खास प्रशिक्षण घेतलेले पेंटर्स बहुजन समाज पक्षाच्या स्थापनेनंतर सर्वत्र भींतीवर हत्ती काढू लागले, याचा काँग्रेसने जणू धसकाच घेतला होता. त्यामुळे तत्कालिन मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषण यांनी आचारसंहितेच्या नावाखाली शासकीय भींती रंगवण्यावर बंदी घातली होती.
बामसेफची एवढी व्यापक प्रसिद्धी रातोरात कशी काय होत आहे ? शहरेच्या शहर कसे काय झटक्यात रंगवले जातात ? एवढी मोठमोठी अधिवेशने कशी काय संपन्न होत आहेत ? यासाठी पैसा कुठून येत आहे ? बाहेर देशातून कुणी मदत तर करीत नाही ना ? अशी चौकशी केंद्र सरकारने सुरु केली होती. १९७६ मध्ये दिल्लीत बामसेफचे केंद्रीय कार्यालय सुरु करण्यात आले. विविध भाषेतून स्वतःची वृत्तपत्रे सुरु करण्यात आली. ६ डिसेंबर १९७८ रोजी न भूतो न भविष्यती असे भव्य अधिवेशन दिल्लीत घेण्यात आले. देशभरातील लाखो कर्मचारी आणि बहुजन समाज बांधव या अधिवेशनात स्वतःचा पैसा लाऊन सहभागी झाले होते.
सन १९८० मध्ये "आंबेडकर मेळा" या नावाने कांशीराम यांनी एक यात्रा सुरु केली. त्याद्वारे देशभरातील बहुजन समाजाशी संवाद साधण्याचा प्रयत्न ते करीत होते, त्यामुळे समाजावर होणाऱ्या अन्याय - अत्त्याचारांचे पाढेच त्यांच्यापुढे वाचण्यात येत होते. यासाठी पुढाकार घेऊन लढणारे एखादे सामाजिक संघटन असावे, याची गरज भासू लागली. कर्मचारी तर रस्त्यांवर येऊन लढू शकत नाहित. त्यासाठी वेगळी टीम असावी याचा विचार करुन दि. ६ डिसेंबर १९८१ रोजी "दलित, शोषित, समाज संघर्ष समिती" (डी.एस. फोर) ही संघटना स्थापन करण्यात आली. या डीएसफोरने देखिल देशभरातील अन्याय - अत्त्याचारांच्या विरोधात आवाज प्रचंड बुलंद केला होता. त्यावेळी सरकारच्या विरोधात रस्त्यांवरील शेकडो आंदोलने डीएसफोरच्या वतीने झाली.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे भंडारा आणि मुंबईच्या निवडणुकीत पराभूत झाले होते, असे म्हणण्यापेक्षा काँग्रेसने तशी व्युहरचनाच केली होती. बाबासाहेब निवडून येऊच नयेत अशी काँग्रेसची नियत होती. पश्चिम बंगालच्या खुलना प्रांतातील चांडाळ लोकांनी बाबासाहेबांना निवडून दिले. विभाजनानंतर गांधी व त्यांच्या काँग्रेसने खुलना प्रांत पाकिस्तानला देऊन टाकला. काँग्रेसची ही मनुवादी रणनिती बाबासाहेबांनी इंग्रजांपुढे उघड केली तेंव्हा स्वातंत्र्य पाहिजे असेल डाॅ. आंबेडकरांना निवडून दिलेच पाहिजे असा आग्रह ब्रिटिशांनी धरला, तेंव्हा कुठे पुण्याच्या बॅ. जयकर यांना राजीनामा देण्यास सांगून त्याठिकाणी डाॅ. आंबेडकरांना निवडावे लागले, हा कटू इतिहास विसरुन रिपब्लिकन पक्षाने १९७१ मध्ये काँग्रेससोबत युती करुन स्वतःचे हसे करुन घेतले होते.
या सर्व परिस्थितीची गंभीर जाण ठेऊन मान्यवर कांशीराम साहेब यांनी विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ९३ व्या जयंतीदिनी १४ एप्रिल १९८४ रोजी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. यामुळे त्यांनी हजारो वर्ष दबल्या गेलेल्या बहुजन समाजात राजकीय महत्वाकांक्षा निर्माण केली. म्हणून तर बसपा कार्यकर्ते आजही मोठ्या गर्वाने म्हणतात, "कांशी तुम्हारी नेक कमाई, सोती हुई कौम जगाई !" बसपा हळूहळू देशभर पसरली. खास करुन उत्तर प्रदेशात बसपाने आपले बस्तान मांडले, त्यामुळे तिथे बसपाची चार वेळा सत्ता प्रस्थापित होऊ शकली.
बसपाची स्थापना एप्रिल १९८४ मध्ये झाली. मार्च १९८५ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक झाली, त्यात बसपाने जोरदार मुसंडी मारत एकूण मतदानाच्या दोन टक्के मतदान मिळविले. या दोन टक्क्याचा झटका एवढा जोरदार होता की, त्यामुळे काँग्रेसचे १६५ उमेदवार पराभूत झाले. परत १९८६ मध्ये निवडणूक झाली त्यात बसपाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली. १९८९ मध्ये झालेल्या निवडणुकीत बसपाला नऊ टक्के मतदान मिळाले. काँग्रेसचे मतदान ४९ टक्क्यावरुन ३८ टक्के झाले. यावेळी बसपाचे दोन खासदार आणि १५ आमदार निवडून आले.
१९९१ आणि १९९३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाचे ६७ आमदार निवडून आले. त्यावेळी सपा-बसपाची सत्ता प्रस्थापित झाली. बसपाला सत्तेत चाळीस टक्के वाटा मिळाला. १९९६ च्या निवडणुकीत बसपाचे ७० आमदार निवडून आले (२०.६ % मतदान) व बहन मायावती मुख्यमंत्री झाल्या. मराठवाडा विद्यापिठ नामांतरासाठी महाराष्ट्रात सोळा वर्ष रक्तरंजित संघर्ष करावा लागला, उत्तर प्रदेशात स्वतःची सत्ता प्रस्थापित केल्यानंतर रक्ताचा एकही थेंब न सांडता रातोरात विद्यापिठ आणि जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली. सत्तेची भीक मागणे आणि स्वतःची सत्ता प्रस्थापित केल्याने काय होते हे कांशीरामजी यांनी सप्रयोग दाखऊन दिले. उत्तर प्रदेशातील सतरा जिल्ह्यांना महामानवांची नावे देण्यात आली.
कांशीरामजी यांनी महाराष्ट्र सोडून उत्तर प्रदेशात लक्ष घातले तेंव्हा चार - पाच वर्षातच काँग्रेस आमदारांची संख्या ३५० वरुन ९६ वर आली. पुढे ९६ चे ४६ झाले. नंतर ४६ चे २८ झाले. उत्तर प्रदेशात काँग्रेसची अवस्था महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षांसारखी झाली म्हणून पी. व्ही. नरसिंह राव यांनी उत्तर प्रदेश काँग्रेसची बसपा सोबत एकदा युती केली. त्यावेळी विधान सभेच्या ४२५ जागांपैकी बसपाला म्हणजे बाबासाहेबांच्या पक्षाला ३०० जागा आणि गांधींच्या पक्षाला म्हणजे काँग्रेसला फक्त १२५ जागा सोडण्यात आल्या. हा कांशीरामजी यांच्या कामाचा करिष्मा होता.
महाराष्ट्रात १९७१ मध्ये दादासाहेब गायकवाड यांनी काँग्रेस सोबत फक्त एका जागेसाठी युती केली होती, त्याचा बदला कांशीरामजी यांनी ३०० जागा मिळऊन घेतला. यासाठी पंधरा वीस वर्ष त्यांना परिश्रम करावे लागले. जिद्द आणि कट्टर आंबेडकरवादाच्या बळावर त्यांनी देशात एक झंजावात निर्माण केला. सामाजिक, राजकीय आणि धार्मिक आघाडीवर त्यांनी भरपूर काम केले. विविध विंग निर्माण केले. व्यवस्था परिवर्तन हे आपले ध्येय ठरविले. सत्ता हे साधन समजले. बहुजन समाजात त्यांनी एक प्रखर राजकीय महत्वाकांक्षा निर्माण केली.
मान्यवर कांशीरामजी यांच्या पश्चात आजघडीला देशात बसपाला कमजोर करण्यासाठी नकली बामसेफ आणि पक्ष संघटना खूप तयार झाल्या आहेत. कांशीरामजी यांचा खरा इतिहास लपवण्याचे वामनी प्रयत्न चालू आहेत, प्रती कांशीराम होण्याची प्रत्येकाची धडपड चालू आहे, पण अजूनपर्यंत ते कुणाला जमले नाही. कांशीराम नावाचे रसायनच वेगळेच होते. माणसे जोडण्याची कला त्यांच्याकडे होती. नेतागिरीचा आव त्यांनी कधी आणला नाही. मान्यवर साहेब कांशीरामजी यांच्या मूळ बामसेफचा झंजावात देशात पुन्हा एकदा निर्माण करणे, ही आता आमची जबाबदारी आहे, असे प्रत्येकांनी समजले पाहिजे, हाच संदेश आजच्या जयंतीनिमित्त सर्वांना द्यावा वाटतो..!
- इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर
सांगवी, नांदेड
मो. 9423781114

No comments