दिवसभरातील ताज्या घडामोडी
महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढणार :
राज्यात विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांत ३० मार्चपर्यंत ढगाळ वातावरण व किरकोळ पावसाची शक्यता असून राज्याच्या उर्वरित भागात उन्हाचा चटका हळूहळू वाढणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
🔥 ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक? :
राज्यात 1 एप्रिलपासून वीज जवळपास अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोग येत्या शुक्रवारी (31 मार्च) विजांच्या दरनिश्चितीबाबतचा आदेश जारी करणार आहे. त्यामुळे मार्च एंडलाच ग्राहकांना वीजदरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे.
👍 उद्धव ठाकरे यांना तूर्तास दिलासा :
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निर्माण झालेल्या आव्हानामुळे कोंडीत सापडलेल्या उद्धव ठाकरे यांना सध्या एक दिलासा मिळाला आहे. त्यानुसार त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह आता तूर्तास वापरण्याची परवानगी मिळाल्याचे समजते आहे.
🗣️ चंद्रशेखर बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान :
काँग्रेसने 100 वेळा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सावरकरांवरुन नौटंकी करू नये. हिंमत असेल तर काँग्रेसला सोडावे, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. मालेगाव येथील जाहीर सभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना सुनावले होते.
👀 CM शिंदेंच्या भेटीवर राऊतांचा टोला :
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल रात्री झालेली भेट म्हणजे सधू आणि मधूची भेट आहे. उद्धव ठाकरेंच्या मालेगाव येथील सभेनंतर दोघांच्या भावना उंचबळून आल्या असतील. त्यामुळे एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी दोघेजण भेटले असतील, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
No comments