शरद पवार आमच्यासोबत येण्यास तयार असतील तर आम्ही स्वागत करु; - latursaptrangnews

Breaking

Wednesday, April 26, 2023

शरद पवार आमच्यासोबत येण्यास तयार असतील तर आम्ही स्वागत करु;



शरद पवार आमच्यासोबत येण्यास तयार असतील तर आम्ही स्वागत करु;


मुंबई: भाजप हा या देशाच्या प्रगतीसाठी काम करणारा पक्ष आहे. या विकासाच्या प्रक्रियेत ज्या ज्या लोकांनी भाजपला सहकार्य करण्याची भूमिका घेतली, त्या सगळ्यांना पक्षात सामावून घेण्याची भूमिका असते. त्यामुळे उद्या अजित पवारच काय शरद पवार यांनीही भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांचेही स्वागत असेल, असे वक्तव्य राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते बुधवारी 'टीव्ही ९ मराठी' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये काही वाटाघाटी सुरु आहेत का? ते भाजपमध्ये आल्यास त्यांना सामावून घेण्याची तुमची तयारी आहे का, असे प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांना विचारण्यात आले. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी भविष्यात राष्ट्रवादीसोबत एकत्र येण्यास भाजपला कोणताही अडचण नसल्याचे संकेत दिले. तसेच राज्यातील मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे कायम राहतील, असा विश्वासही सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही नवा बदल अपेक्षित नाही. कधी कधी वेगळी हवा, धुकं पसरतं. या धुक्याच्या मागे काहीतरी अघटित घडतंय, असे आपल्याला वाटते. हे एक राजकीय धुकं आहे. हे धुकं दोन-तीन दिवसांत दूर होईल, तेव्हा सर्वकाही स्पष्ट होईल. २०२४ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यात नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवली जाईल. ही गोष्ट आमच्या पक्षाचे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे नेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर या मुद्द्यावर फार बोलण्यात अर्थ नाही, असे सांगत मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री बदलाबाबतच्या चर्चांना अर्थ नसल्याचे सांगितले.

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपोसबतच्या संभाव्य युतीबाबतही भाष्य केले. अजित पवार आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची काय चर्चा झाली हे मला माहिती नाही. अजितदादाच त्यावर अधिक बोलू शकतील. या देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी ज्या ज्या लोकांनी इच्छा व्यक्त केली, भाजपला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्या सगळ्यांना पक्षात सामावून घेतले जाते. भाजप हा काही एका कुटुंबापुरता मर्यादित असलेला पक्ष नाही. त्यामुळे अजित पवार आमच्यासोबत आले तर स्वागत करणार का हा प्रश्न असेल तर, मी सांगेन की, उद्या शरद पवारही भाजपमध्ये आले, ते येणार नाहीत, पण ते भाजपला पाठिंबा द्यायला तयार झाले किंवा उद्या जयंत पाटील भाजपमध्ये येणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे वक्तव्य करुन सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप-राष्ट्रवादी यांच्यातील संभाव्य युतीबाबचा सस्पेन्स आणखी वाढवला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. दिल्लीच्या वर्तुळात याबाबत विचारविनिमय सुरु असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. सन २०२४च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्याच नेतृत्वात आम्ही निवडणुका लढवू आणि त्या जिंकू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment