डाॅ. बाबासाहेब आंबेडकर : देशाची बौद्धिक संपदा !
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर : देशाची बौद्धिक संपदा !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल ही तारीख जसजशी जवळ येते तसतशी उत्सुकता शिगेला पोहचलेली असते. बॅनर, झेंडे, कट आऊटस् यांची जणू रेलचेल होत असते. भीम अनुयायांमध्ये एक प्रकारचा उत्साह संचारतो. बाजारात खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे सर्व जाती धर्माचे व्यापारी एकदम खूष असतात. हे सारे पाहून कांही जणांना हेवा वाटतो तर कांहीजण तिरस्कार व्यक्त करीत असतात. कोण होते बाबासाहेब आंबेडकर ? का त्यांची जयंती एवढी धूमधडाक्यात साजरी होते ?
बाबासाहेबांची जयंती साजरी करणारा व्यक्ती म्हणत असतो की डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे माझे सर्व कांही आहेत. सर्वस्व आहेत. माझे दैवत आहेत. त्यांच्यामुळेच आम्ही माणसांत आलो आहोत. नसता या देशात जनावरांना मान आहे पण आम्ही माणूस असून आम्हाला कुणी विचारत नव्हते. बाबासाहेबांनी आम्हाला माणसात आणले. माणुसकीचे सारे हक्क आणि अधिकार मिळऊन दिले. ही झाली शोषितांची बाजू.
शोषित समाजाबरोबरच भारत देशावर देखिल बाबासाहेबांचे फार मोठे उपकार आहेत. का करायची बाबासाहेबांची जयंती ? अशी किंचितशी जरी शंका कुणाला येत असेल तर त्यांनी थोडासा वेळ काढून खुल्या मनाने समजून घेतले पाहिजे की बाबासाहेबांचे देशासाठी काय योगदान आहे ? हे एकदा समजले की बाबासाहेब केवळ दलितांचे नव्हे तर देशाचे नेते आहेत, भारत देशाची एक बौद्धिक संपदा म्हणून जगाने बाबासाहेबांची नोंद घेतली आहे.
भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी एक संहिता आवश्यक होती. विविध प्रांत, विविध भाषा, विविध परंपरा, विविध जाती आणि धर्म यांनी नटलेल्या या भारत देशाला एका सुत्रात बांधून ठेवण्यासाठी एक सर्व समावेशक, बहुजन हिताय, बहुजन सुखाय असे संविधान देणे ही एक अवघड जबाबदारी होती, तारेवरची कठोर कसरत होती, ती जबाबदारी कोण पार पाडणार ?
देशात त्यावेळी कायद्याचे उच्च शिक्षण घेतलेले तीन बॅरिस्टर होते. एक म. गांधी, त्यांचा सामाजिक आणि राजकीय व्याप एवढा मोठा होता की त्यांना संविधान लिहिण्याची फुरसत नव्हती. एक किंगमेकर म्हणून जवाहरलाल नेहरु यांना प्रधानमंत्री बनविणे हेच त्यांचे ध्येय होते. दुसरे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांना भारताचे विभाजन करुन पाकिस्तानचे प्रधानमंत्री होण्याची चिंता होती. शेवटी ही अवघड जबाबदारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिरावर आली, नव्हे देशहितासासाठी ती त्यांनी स्वीकारली.
घटना समिती जाहिर झाली तेंव्हा डाॅ. राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्ष बनविण्यात आले, ते फक्त नामधारी अध्यक्ष होते. जी अठरा लोकांची समिती बनविण्यात आली, त्यात ड्राफ्टींग समितीचे प्रमुख डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना बनविण्यात आले. समिती ज्या कांही कायदेशीर बाजू मांडेल ती लिहून काढणे एवढीच जबाबदारी बाबासाहेबांची होती. म्हणजे बाबासाहेबांनी संपूर्ण संविधान लिहून काढावे अशी कुणाही सवर्णांची ईच्छा नसावी पण समितीमधील कुणी आजारी पडले, कुणाची ईच्छा नव्हती, कुणी मरण पावले तर कुणी बाहेर देशात निघून गेले, अखेर संविधान निर्मितीची संपूर्ण जबाबदारी डाॅ. आंबेडकरांवर आली. बाकी सदस्यांप्रमाणे ही जबाबदारी ते टाळू शकले असते किंवा हळूहळू त्यातून त्यांनी अंग काढून घेतले असते तर त्यांना कोण काय म्हटले असते ? पण देशप्रेमी बाबासाहेबांनी संविधान निर्मितीची संपूर्ण जबाबदारी हसतमुखाने स्वीकारली.
समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावर आधारित अभ्यासपूर्ण व एक परिपूर्ण असे संविधान बाबासाहेबांनी देशाला दिले, भारतीय घटनेचे ते शिल्पकार ठरले, म्हणून सारा देश बाबासाहेबांच्या ऋणात आहे, हे सर्वांना मान्य करावेच लागेल. या संविधानातील समतेची तत्वे ज्यांना मान्य नाहित ते मुठभर सनातनी, जे कांही वर्षापूर्वी चोरुन लपून आणि आता केंद्रीय सत्तेमुळे उघडपणे संविधान बदलाची भाषा बोलतात, तेच लोक केवळ जातीय द्वेष भावनेतून हळू आवाजात प्रश्न ऊपस्थित करीत असतील की, का करायची बाबासाहेबांची जयंती ?
एवढेच नाही तर देशाचे पहिले कायदेमंत्री, मजूर मंत्री म्हणून बाबासाहेबांनी जे अमोल असे योगदान दिले ते कसे विसरुन चालेल ? महिलांसाठी हिंदू कोड बिल सादर करुन अनेक सुधारणा बाबासाहेबांनी सुचविल्या, ते नेहरु सरकारमधील सनातनी लोकांना आवडले नाही. देशातील एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्क्याहून अधिक असलेल्या ओ.बी.सी. समाजाला आरक्षणासाठीचा आग्रह बाबासाहेबांनी संसदेत धरला त्यावेळी त्यांना विरोध करण्यात आला, या दोन मुद्द्यांवरुन बाबासाहेबांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला, हे देशाने समजून घेतले पाहिजे. बाबासाहेबांच्या या मागण्या कालांतराने देशाने मान्य केल्या आहेत.
कसे घडले बाबासाहेब ?
बाबासाहेब इंग्लंडनला शिकायला गेले होते तेंव्हा वेळ आणि पैसा वाचावा म्हणून सहा वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी दोन वर्षात पूर्ण केला. त्याकरिता त्यांना अहोरात्र परिश्रम करावे लागले. बाबासाहेबांची ज्ञानलालसा पहा, जगातील सर्वात मोठे ग्रंथालय ब्रिटिश म्युझीयम सकाळी
सात वाजता उघडायचे तेंव्हा त्यात प्रवेश करणारे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले विद्यार्थी असायचे.
सकाळी ०७-०० ते रात्री ०८-०० वाजता ग्रंथालय बंद होईपर्यंत बाबासाहेब तेथे अभ्यास करीत. दुपारी १ ते २ ग्रंथालयाला जेवणाची सुट्टी असायची पण जेवणाचा वेळ वाया जावू नये म्हणून बाबासाहेब आपल्या सोबत खिशात ब्रेड घेऊन जात.
ग्रंथालयात कोणतेही खाण्याचे पदार्थ नेण्यास बंदी होती, म्हणून बाबासाहेब ब्रेडचा तुकडा लवऊन ठेवत आणि भुक लागली की पुस्तकाच्या आड तोंड लपवून
पटकन ब्रेडचा तुकडा तोंडात घालीत. एकदा बाबासाहेब ब्रेडचा तुकडा खातांना पकडले गेले आणि त्यांना मुख्य ग्रंथपालकडे नेण्यात आले. त्या ग्रंथपालाने बाबासाहेबांना वाचनालयाचा नियमभंग करण्याबाबत विचारले तेंव्हा बाबासाहेबांनी आपण तसे का करीत आहोत हे सरळ सरळ सविस्तर सांगून टाकले.
त्या ग्रंथपालाला ह्या ज्ञानपिपासू भारतीय विद्यार्थ्याचे खूप कौतुक वाटले. त्यांनी बाबासाहेबांना नुसती ताकीद देऊन सोडून दिले. रात्री आठ वाजता ब्रिटिश ग्रंथालयामधून बाबासाहेब आपल्या खोलीवर जाऊन जेवण करुन थोडी विश्रांती घेत आणि पुन्हा अभ्यासाला बसत, मग उत्तररात्र उलटून पहाटवारा उलटू लागला तरी त्यांची अभ्यासाची तंद्री भंग होत नसे.
रूमवर त्यांच्यासोबत एक भारतीय विद्यार्थी राहायचा,
त्याला रात्री कधीही जाग आली तरी बाबासाहेब अभ्यास करतांना आढळायचे. एकदा तसाच तो विद्यार्थी रात्री जागा झाला. त्याला बाबासाहेब अभ्यास करतांना आढळले. त्याने घड्याळाकडे बघितले. रात्रीचे तीन वाजत होते. तो म्हणाला, मिस्टर आंबेडकर ही काय अभ्यास करण्याची तऱ्हा आहे काय ? अहो, अभ्यास करायलाही कांही मर्यादा असते. अशाने तुम्ही नक्कीच आजारी पडाल.
हा मुद्दा महत्वाचा होता. कारण आरोग्य बिघडले तर फार नुकसान झाले असते, म्हणून बाबासाहेब क्षणभर पुस्तक बाजूला करीत म्हणाले, "मी इथे उच्च शिक्षण घेण्सायाठी आलोय खरा पण माझा जीव भारतातच घुटमळतोय. तिथे माझे करोडो बांधव धर्म आणि रुढीच्या नावाखाली साध्या माणुसकीपासून वंचित झाले आहेत.
कुत्र्यापेक्षाही लाचार आणि हीन दीन जीवन ते जगत आहेत. इथला हा शिक्षणक्रम कमी वेळात आटोपून मला लवकरात लवकर भारतात जायचे आहे. त्यांच्याकरिता मानवी हक्काचा लढा उभारायचा आहे. आज माझ्याजवळ वाया घालवायला थोडाही वेळ आणि पैसा नाहि रे !" असे म्हणून बाबासाहेबांनी पुन्हा पुस्तक हातात घेऊन वाचू लागले. तो विद्यार्थी नुसता बघत राहिला !
इतका कठोर परिश्रम करुन उच्च विद्या प्राप्त केली म्हणूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विशालकाय भारताचे सर्वांगसुंदर असे संविधान लिहू शकले. जगातील अनेक देशांनी या संविधानाचा अभ्यास करुन तसे संविधान आपल्या देशात निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. म्हणून बाबासाहेबांचा आपणाला अभिमान वाटतो की ते आपल्या देशाची बौद्धिक संपदा आहेत.
- इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर
राष्ट्रीय महासचिव, नॅशनल भीम आर्मी बहुजन एकता मिशन
रा. सांगवी बु. विमानतळ मार्ग, नांदेड
मो. 9423781114
No comments