विनापरवाना झाड तोडले;मनपाकडून एक लाख रुपये दंडाची नोटीस
पोलिसात गुन्हा दाखल
लातूर/प्रतिनिधी: परवानगी न घेता झाड तोडल्या प्रकरणी लातूर महानगरपालिकेने शहरातील नागरिकास १ लाख रुपये दंडाची नोटीस पाठवली असून संबंधितांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये देशिकेंद्र शाळेच्या पाठीमागील बाजूस वास्तव्यास असणारे प्रशांत विलास जाधव यांनी काशीद जातीचे अंदाजे ४० फूट उंच असणारे डेरेदार झाड शनिवारी (दि.१० जून )तोडले. त्याच्या बाजूस असणारे तेवढ्याच उंचीचे झाड तोडण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून सुरू होता. मनपाला या प्रकाराची माहिती समजली असता आयुक्त श्री.बाबासाहेब मनोहरे यांच्या आदेशावरून मनपाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक आयुक्त श्रीमती मंजुषा गुरमे, क्षेत्रीय अधिकारी विजय राजुरे, स्वच्छता निरीक्षक डी.एस. सोनवणे,कनिष्ठ अभियंता वैभव स्वामी यांच्यासह मनपाचा उद्यान विभाग व क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.या पथकाने संबंधित व्यक्तीस दुसरे झाड तोडण्यास मज्जाव केला.विनापरवानगी झाड तोडल्याबद्दल प्रशांत विलास जाधव यांना ४ दिवसांच्या आत १ लाख रुपये दंड भरण्याची नोटीस पाठवण्यात आली. स्वच्छता निरीक्षक डी.एस. सोनवणे यांच्या फिर्यादीवरून जाधव यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
मनपाच्या या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.शहरातील नागरिकांनी विनापरवाना झाडे तोडू नयेत.परवानगी न घेता झाडे तोडल्याचे दिसून आले तर संबंधितावर कठोर कार्यवाही केली जाईल, असा इशाराही मनपाच्या वतीने देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment