संभाजी भिडे यांच्या सभेला परवानगी देऊ नये !
संभाजी भिडे यांच्या सभेला परवानगी देऊ नये !
लातूर : मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांना लातूरात पाय ठेवू देणार नसल्याचा निर्धार बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला आहे. संभाजी भिडे यांच्या विरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज लातूर शहरातील गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान, भिडे यांच्या सभेला परवानगी देण्यात येऊ नये या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची सोड उठली आहे, लातूरमध्ये ही याचे पडसाद उमटले असून संभाजी भिडेचा विविध पक्षाच्या संघटनांच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. बहुजन समाजवादी पार्टीच्या वतीनेही संभाजी भिडे यांच्या विरोधात लातूर येथील गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
संभाजी भिडे यांची लातूरला नियोजित सभा असल्याचे समजते त्यामुळे या सभेला परवानगी देण्यात येऊ नये अन्यथा सभा उधळून लावण्यात येईल याप्रसंगी अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशाराही बहुजन समाज पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. या आंदोलनाला बहुजन समाजवादी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments