असदुद्दीन ओवेसींकडून इस्रायली पंतप्रधानांचा ‘सैतान’ उल्लेख; पंतप्रधान मोदींचं नाव घेत म्हणाले…

modi


 गेल्या शनिवारी (७ ऑक्टोबर) पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटलं आहे. हमासच्या हल्लानंतर इस्रायलने गाझापट्टीवर बॉम्बवर्षाव केला आहे. या हल्ल्यात हमासच्या दहशतवाद्यांसह अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. हमास-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना गाझामधील लोकांच्या बाजुने उभं राहण्याची आणि इस्रायल-हमास युद्धात होरपळलेल्या हजारो निष्पाप लोकांना मदत करावी, असं आवाहन केलं आहे.








“मी पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभा आहे आणि यापुढेही उभा राहीन. आजही इस्रायलविरोधात लढणाऱ्या गाझातील लाखो शूरवीरांना माझा सलाम! नेतान्याहू (इस्रायली पंतप्रधान) हा एक जुलमी सैतान आणि युद्ध गुन्हेगार आहे. आपल्या देशातील एक बाबा मुख्यमंत्री (योगी आदित्यनाथ) म्हणाले की, पॅलेस्टाईनचे नाव घेणाऱ्यांवर खटले दाखल केले जातील. तर मी त्या बाबा मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, मी आपल्या तिरंग्यासह अभिमानाने पॅलेस्टाईनचा झेंडाही धारण करतो. मी पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभा आहे,” असं विधान ओवेसी यांनी केलं. ते हैदराबाद येथील जाहीर सभेत बोलत होते.शनिवारी (७ ऑक्टोबर) हमासने ‘ऑपरेशन अल अक्सा फ्लड बॅटल’ची घोषणा करत इस्रायलवर हल्ला चढवला होता. याचा बदला म्हणून इस्रायलने ‘ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स’ची घोषणा केली. हमास-इस्रायलच्या युद्धात दोन्ही देशातील ३२०० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. तर गाझा पट्टीत १९०० पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये सुमारे ७०० लहान मुलं असल्याचं ‘युनिसेफ’ने म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post