पाकिस्तानवर पराभवाची नामुष्की, अफगाणिस्तानने साकारला दणदणीत विजय...

 


पाकिस्तानवर पराभवाची नामुष्की, अफगाणिस्तानने साकारला दणदणीत विजय...


नवी दिल्ली : पाकिस्तानच्या संघावर आता पराभवाची मोठी नामुष्की ओढवली आहे. कारण पाकिस्तानवर अफगाणिस्तानने दणदणीत विजय साकारला. अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानच्या फलंदाजीचा धुव्वा उडवला आणि हा दमदार विजय साकारला आहे.

अफगाणिस्तानने टॉस जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केलेे. पण यावेळी पाकिस्तानच्या संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. पाकिस्तानच्या संघातील सात फलंदाजांना यावेळी दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही. पाकिस्तानला २१ धावांवर असताना पहिला धक्का बसला. त्यानंतर थोड्या फरकाने पाकिस्ताने फलंदाज बाद होत गेले, त्यामुळे त्यांना या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अफगाणिस्तानच्या फरीद अहमदने यावेळी फक्त तीन षटकांत पाकिस्तानचे तीन फलंदाज बाद केले, यासाठी त्याला १५ धावा मोजाव्या लागल्या. अहमदला यावेळी अफगाणिस्तानच्या अन्य गोलंदाजांनी सुरेख साथ दिली, त्यामुळे पाकिस्तानचा डाव यावेळी फक्त ११५ धावांत आटोपला. पाकिस्तानकडून यावेळी ओरम युसूफला सर्वाधिक २४ धावा करता आल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला यावेळी विजयासाठी ११६ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करत असताना अफगाणिस्तनलाही सुरुवातीला धक्के बसले. पण नूर अली झारदानने यावेळी अफगाणिस्तानचा डाव सावरला. झारदानने यावेळी चार चौकार आणि दोन षटकारांच्या डोरावर ३९ धावांची खेळी साकारली. त्यानंतर अफगाणिस्तानच्या गुलबदीन नैबने १६ चेंडूंत नाबाद २६ धावा केल्या आणि त्यामुळे त्यांना विजय मिळवता आला. अफगाणिस्तानने पाकिस्तानवर चार विकेट्स आणि १३ चेंडू राखून विजय साकारला.

अफगाणिस्तानने आशियाई स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानवर विजय साकारला, त्यामुळे आता त्यांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत आता अंतिम फेरीत अफगाणिस्तानला भारताचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल त्यांना सुवर्णपदक मिळणार आहे, तर जो संघ पराभूत होईल त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे क्रिकेट विश्वातील सर्व चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post