*लातूर नगरीत आजपासून दोन दिवसीय 'लातूर ग्रंथोत्सव'*
दोन दिवस भव्य ग्रंथप्रदर्शन व विक्रीसाठी दालन
लातूर, दि. ३ (जिमाका) : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय अंतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत लातूर येथील दयानंद सभागृह येथे सोमवार, ४ मार्च २०२४ पासून दोन दिवसीय 'लातूर ग्रंथोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार रमेश कराड, आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धिरज देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले, सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर कापसे यावेळी उपस्थित राहतील.
तत्पूर्वी सकाळी ९ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क पासून दयानंद सभागृह पर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येईल. जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष ब्रिजमोहन झंवर, डॉ. आरती झंवर, राजमाता जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डी. एन. केंद्रे, दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव गायकवाड, साने गुरुजी शिक्षण संकुलाचे अध्यक्ष कालिदास माने यांची यावेळी उपस्थिती राहील. दुपारी २ वाजता 'बाप समजून घेताना' या विषयावर वसंत हंकारे यांचे व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी भारत सातपुते राहतील. दुपारी ४ वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन होईल. प्रख्यात साहित्यिक फ. म. शहाजिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून योगिराज माने हे सूत्रसंचालन करतील.
दुसऱ्या दिवशी ५ मार्च रोजी सकाळी १० वाजता बालकांचे कथाकथन कार्यक्रम होणार आहे. बाल साहित्यिक रमेश चिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात गायत्री जाधव, प्राची काळे, प्रियांका वरडे, अवणी चिलमे, अक्षरा लटपटे, अक्षता कुलकर्णी यांचा सहभाग राहील. सकाळी ११.३० वाजता 'वाचन आधी की लेखन आधी' या विषयावरील परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत तथा 'विचारशलाका'चे संपादक डॉ. नागोराव कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात डॉ. सुनिता सांगोले, डॉ. राजशेखर सोलापुरे, विवेक सौतडेकर, चंद्रशेखर मलकमपट्टे यांचा सहभाग राहील.
दुपारी २ वाजता कथाकार जी. जी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विलास सिंदगीकर, धनंजय गुडसुरकर, अंबादास केदार, डॉ. नयना राजमाने, अनिता येलमाटे यांचा सहभाग राहील. दुपारी ४ वाजता 'साहित्याने मला काय दिले' या विषयावर परिसंवाद होणार असून ज्येष्ठ कथा-कादंबरीकार शेषराव मोहिते अध्यक्षस्थानी राहतील. सुरेंद्र पाटील, जयद्रथ जाधव, मोहिब कादरी, अनंत कदम यांचा परिसंवादात सहभाग राहील.
सायंकाळी ५.३० वाजता लातूर ग्रंथोत्सवाचा समारोप होणार असून ज्येष्ठ विचारवंत तथा माजी प्राचार्य सोमनाथ रोडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. सहायक ग्रंथालय संचालक सु. सं. हुसे, जिल्हा कोषागार अधिकारी उज्ज्वला पाटील, सुधाकर तेलंग यांची प्रमुख उपस्थिती राहील. ग्रंथोत्सवात दोन्ही दिवस ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसाठी दालन सुरू राहील, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment