मोदींची सभा होऊन सुद्धा लातूरचा मूड बदललेलाच..! - latursaptrangnews

Breaking

Friday, May 3, 2024

मोदींची सभा होऊन सुद्धा लातूरचा मूड बदललेलाच..!



 मोदींची सभा होऊन सुद्धा लातूरचा मूड बदललेलाच..!


गेल्या काही दिवसांपासून देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे.
सत्ताधारी, विरोधक सर्वच पक्षच आपला उमेदवार निवडून यावा यासाठी
प्रचाराची राळ उठवत आहेत. लातूर हे देखील याला अपवाद नाही. २०१४ पूर्वी
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला लातूर मतदारसंघ मोदी लाटेत भाजपाने जिंकला.
२०१९ मध्ये निष्क्रियतेचा ठप्पा मारत भाजपाने उमेदवार बदलला. या वेळी
सुधाकर शृंगारे यांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे. त्यांच्यासमोर
काँग्रेसच्या वतीने राजकारणात नवखे असलेल्या डॉ. शिवाजी काळगे यांना
उतरवण्यात आले आहे.

सुरुवातीच्या काळात काहीशी एकतर्फी वाटणारी ही लढाई आता तुल्यबळ होताना
दिसत आहे. राष्ट्रीय मुद्द्यांसोबत स्थानिक मुद्द्यानी जोर पकडल्याने
काँग्रेसचे पारडे जड होताना दिसत आहे. गेल्या दिवसात बदलेली राजकीय
समीकरणे आणि शेतकरी कष्टकऱ्यांच्या वाढत्या समस्या यामुळे भाजपकडे असलेला
मतदार काँग्रेसच्या बाजूने झुकलेला दिसतोय. सोयाबीनचे घसरलेले दर,
कापसाला नसलेला भाव, कांद्यावर असलेली निर्यात बंदी, हमीभावाच हवेत
विरलेलं आश्वासन हे मुद्दे घेऊन काँग्रेसने रान उठवल्याचं दिसून येत आहे.
या मुद्द्यांचा चांगला परिणाम प्रचारात पाहायला मिळतोय. तुलनेने नवखे
असलेले काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांनी प्रचारात घेतलेली आघाडी,
काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांची उदगीर येथे
झालेली सभा या सोबतच माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ. अमित
देशमुख, आमदार धीरज देशमुख यांनी निवडणूक अंगावर घेत स्वतः लातूर
मतदारसंघ पिंजून काढला आहे.

भाजपा बद्दल मराठा आणि धनगर समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन निर्माण
झालेला रोष बघता, तसेच जातीय समीकरणांची काँग्रेसच्या बाजूने असणारी
जुळवाजुळव बघता, काँग्रेस मागील दोन निवडणुकांमधील अनुशेष भरून काढत
आघाडी घेताना दिसत आहे.
एकीकडे काँग्रेस, शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
एकत्रित काम करताना दिसत आहेत. तर महायुतीमध्ये म्हणावं तशी एकी अजूनही
पाहायला मिळाली नाही. लातूरच्या निवडणुकीत मोदींची जादू चालेल या आशेने
भाजपाने पंतप्रधान मोदींची सभा घेतली पण राष्ट्रीय मुद्द्यांवर बोलताना
मोदींनी सोयाबीन, आरक्षण, शेतकरी आत्महत्या असे विषय टाळल्याने लातूरकर
निराशाच झाल्याचे पाहायला मिळाले. थोडक्यात प्रत्यक्ष पंतप्रधान मोदींची
सभा होऊन देखील लातूर लोकसभा मतदारसंघात नवखे असलेले डॉ. शिवाजी काळगे
हेच आजही आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment