*मसलगा मध्यम प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींचे निरीक्षण; धरणाला कसलाही धोका नाही*
लातूर, दि. 8 : पाटबंधारे विभाग क्रमांक 1 या विभागाअंतर्गत असलेला मसलगा मध्यम प्रकल्पाचे बांधकाम होवून जवळपास 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींचे निरीक्षण करण्यात येत असून धरणाला कसलाही धोका नाही, प्रकल्पात पाण्याची आवक सुरू असल्याने क्रमशः विसर्ग सोडण्यात येत आहे. याबाबत लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून सोडण्यात येत असलेले पाणी कमी प्रमाणात असून यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही , असे पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील यांनी कळविले आहे.
मसलगा प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 14.676 दलघमी आहे. (उपयुक्त साठा 13.599 दलघमी, मृतसाठा- 1.077 दलघमी) व या प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमता 1664 हेक्टर एवढी आहे. प्रकल्पाची एकुण लांबी 2077 मीटर असून त्यातील 155.75 मीटर लांबीमध्ये ओगी पद्धतीचा, सांडवा असून त्यावर 12 x 6.50 मीटर आकाराची एकूण 6 वक्रद्वारे आहेत. त्याची जास्तीत जास्त उत्सर्जन क्षमता 3009 क्युमेक आहे.
गतवर्षी आक्टोबर महिन्यात या प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त 60.63 टक्के पाणीसाठा निर्माण झाला होता. मे 2024 अखेर 12.82 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. पुढे जुन-2024 महिन्यात सुरु झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. मात्र जुलै व ऑगस्ट महिन्यात जास्त पाऊस झाल्यामुळे धरणात अचानक पाण्याची जास्त आवक झाली. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला धरणाच्या 60 मीटर भागात भेग पडल्याचे निदर्शनास आले. तथापि, धरणासंबंधीत तांत्रिक बाबींचे निरीक्षण करण्यात येत असून धरणास कसलाही धोका नाही.
तसेच धरणासंबंधी तांत्रिक बाबींच्या निरीक्षणानुसार धरणास धोका होवू नये, यासाठी धरणातील जास्तीचा पाणीसाठा क्रमशः कमी करण्यात येत आहे. सुरक्षित पाणीसाठा धरणात ठेवण्यात येत आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत नजिकच्या गावांना सूचना देण्यात आल्या असून अत्यंत कमी प्रमाणात नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पाण्यामुळे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. धरणामध्ये पाण्याची आवक सुरु असून धरणासंबंधीत तांत्रिक बाबींचे निरीक्षण करून पाणीसाठा वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
*नागरिकांनी प्रकल्पाबाबत चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये*
प्रकल्पासंबंधीत अधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प सुस्थितीत राहण्याबाबत सातत्याने नियंत्रण ठेवण्यात येत असून प्रकल्पास कोणताही धोका नाही. जलसंपदा विभागाचे प्रकल्प अधिकारी हे सातत्याने प्रकल्पाच्या सुरक्षिततेसाठी दक्ष असून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या सुरक्षिततेचा अनुषंगाने चुकीच्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. सुरक्षिततेच्या दृष्टीने सामान्य नागरिकांना प्रकल्पावर प्रवेश निषिद्ध असल्यामुळे विनापरवानगी धरणावर जावू नये, असे आवाहन लातूर पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
Tags
लातूर