विधानसभा निवडणुका जाहिर झाल्या असल्याने ईच्छूक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची धावपळ चालू झाली आहे. पक्षाचे जाणकार लोकं खऱ्या कार्यकर्त्यांची नोंद ठेवित असतात असे म्हणतात. कधी कधी उलटेही अनुभव येतात. पक्षाचा नेताच बेईमान असेल तर निष्ठावान कार्यकर्त्याची मात्र फारच कोंडी होत असते. अनेक वर्ष काम करणाऱ्यांना डावलून ऐनवेळी पक्षात येणाऱ्या कुणाही आयाराम गयाराम यांना पक्ष जेंव्हा निवडणुकीत उमेदवारी देत असतो, तेंव्हा त्या जुन्या कार्यकर्त्यावर काय बितत असेल ? बिचारा धाय मोकलून रडत बसतो !! नेत्याला त्याचे कांही देणे घेणे नसते. पक्षासाठी त्याने लावलेला वेळ आणि पैसा सारे धुळीस मिळत असते. याचे नेत्याला काय ?
हा पक्ष तिकीट देत नसेल तर त्या पक्षात जा, तो पक्ष बरा नाही तर ह्या पक्षात या अशी सर्कस चालू झालेली आहे. असे ऐनवेळी पक्ष बदल करणारे किती स्वार्थी असतात याची कल्पना न केलेली बरी. स्वतःच्या स्वार्थासाठी कांहीही करायला ते तयार होतात. जनतेचे त्यांना कांहीही देणेघेणे नसते. स्वतः अगोदर कुठे सेट होतोत याचीच त्यांना घाई झालेली असते. विचारधारा वगैरे सारी गुंडाळून ठेवलेली असते. सर्व पक्षांनी तिकीट नाकारल्यावर कांही महाभाग आपली विझऊन घेण्यासाठी अपक्ष म्हणूनही लढण्यास तयार असतात. एवढा अट्टाहास कशासाठी ?
वंचितचे नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत बरेच निष्ठावान कार्यकर्ते निवडणुकीत नेहमी नाराज होत असतात. ते ऐनवेळी असा विचित्र निर्णय घेतात की जुने जाणकार निष्ठावान कार्यकर्ते हवालदिल होत असतात. असाच वाईट अनुभव सध्या नांदेडचे तरुण तडफदार वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांना नुकताच आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर काय बितली असेल ते त्यांनी कळू दिले नसले तरी त्यांचे समर्थक कार्यकर्ते मात्र उघडपणे व्यक्त होत आहेत. या जागेचा पुनर्विचार करा असे कांही कार्यकर्ते उघड बोलू लागले आहेत.
कालपरवापर्यंत प्रशांत इंगोले यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून वंचितचे जोरदार कार्य नांदेड जिल्ह्यात केले आहे. त्यांनी पक्षाकडे उमेदवारीही मागितली होती. त्यांनी त्या दृष्टीने शहरात मोठमोठे कार्यक्रम लावले. नांदेड उत्तर सर्वसाधारण विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छूक होते. तरुण तडफदार उमेदवार म्हणून लोक त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत होते. त्यांची आर्थिक परिस्थितीही बरी होती त्यामुळे सीट लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
वंचितने जेंव्हा उमेदवारांची नावे जाहिर केली तेंव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. कुणाच्याही ध्यानी मनी नसलेले व पक्षात कधीही सक्रीय नसलेले प्रा. गौतम दुथडे यांना नांदेड उत्तरची वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यांच्याकडे पैसा असेल पण कार्यकर्ता म्हणून कधी कोणते धडाडीचे काम केल्याचे कुणाला आठवत नाही, मग त्यांना उमेदवारी कोणत्या आधारे बाळासाहेबांनी जाहिर केली..? भाजपाचे खा. अशोक चव्हाण यांच्या संस्थेवर ते प्राध्यापक आहेत, म्हणून त्यांना भाजपने तर पाठविले नाही ना ? अशी उघड शंका घेतली जात आहे.
यावेळी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना चारी मुंड्या चित्त करण्यासाठी बडे बडे दिग्गज नांदेड उत्तर मधून शड्डू ठोकून आहेत, त्यापैकी अनेकांनी वंचितची उमेदवारी मागितली होती. काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांची खा. अशोक चव्हाणांमुळे बरीच अडचण झाली. खा. चव्हाणांसोबत ते भाजपात गेले पण तिथे ते रमले नाहित. त्यांनी वंचितची उमेदवारी मागितली होती. त्यांचा चांगला जनसंपर्क आहे व ते ताकतीने लढलेही असते.
साहेबराव धनगे हे मूलतः बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते असल्याने ते आमच्या घरी भेटायला आले होते. तेंव्हा त्यांनी त्यांची व्युहरचना स्पष्ट केली होती. त्यांच्याकडे नियोजन आहे. मतदार संघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांची योजना आम्हाला आवडली होती. बसपातून वंचितमध्ये गेलेले सर्वजीत बनसोडे यांच्या संपर्कात ते होते पण प्रकाश आंबेडकर चर्मकार समाजाला बिलकूल जवळ करीत नाहित. धनगे हे चर्मकार असल्याने त्यांना वंचितचे तिकीट भेटू शकले नसावे.
वंचितने आजवर जाहिर केलेल्या विधानसभा उमेदवारांच्या यादीत सध्या तरी एकही चर्मकार समाजाचा व्यक्ती नाही. प्रकाश आंबेडकर असे का वागतात ? चर्मकार त्यांना का नको आहेत ? मातंगही त्यांना फारसे चालत नाहित. बौद्ध, मराठा, माळी, धनगर, मुसलमान यांना ते जास्त प्राधान्य देत असतात. त्यातही पैसेवाले त्यांना जास्त चालतात असे ऐकिवात आहे. निवडणुकीत हेलिकाॅप्टरने फिरण्यासाठी पैसा तर लागतोच ना ?
बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी, बहन मायावतीजी यांचा ते सतत द्वेष करतात असे दिसून येते. सुशिलकुमार शिंदे यांच्या सोलापूरमध्ये जाऊन त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून शिंदे यांना पराभूत केले. त्यांच्यामुळे तिथे भाजपचे निष्क्रीय असे एक लिंगायत महाराज निवडून आले. हातचे अकोला गेले आणि सोलापूरही गेले. मला ना तुला घाल कुत्र्याला असा हा प्रकार आहे. यावेळी त्यांनी बसपाबरोबर युतीचे संकेत दिले होते, त्याचे बसपा महाराष्ट्र युनिटने स्वागतही केले पण पुढे काय झाले ते कळू शकले नाही.
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कुणाच्या ध्यानीमनी नसलेले मुकुंद चावरे या साधारण सेवानिवृत कर्मचाऱ्यास नांदेड उत्तरची उमेदवारी ऐनवेळी दिली होती. महावितरणमध्ये ते कामाला होते. त्यांचा प्लाॅटिंगचाही व्यवसाय होता. त्यांचा लवकरच अकाली मृत्यू झाला. त्यामुळे ते कुणाच्या स्मरणात राहिले नाहित व त्यांची फारशी राजकीय दखल कुणी घेतली नाही, कारण ते राजकारणी नव्हतेच. त्यांना सोबत घेऊन आम्ही एकदा वीज कामगार पतसंस्थेची निवडणूक आम आदमी पॅनलतर्फे लढवली होती. हाच काय तो तेवढा निवडणूक अनुभव त्यांच्याकडे होता.
देगलूर बिलोली राखीव मतदार संघातही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तेथील निष्ठावंत कार्यकर्ते डाॅ. उत्तम इंगोले यांना डावलून ऐनवेळी देगलूरचे माजी नगरसेवक सुशीलकुमार देगलूरकर यांची उमेदवारी जाहिर केली आहे. ते तरुण तडफदार आहेत व चांगली लढत देतीलही पण डाॅ. उत्तम इंगोले हे २०१९ मध्ये वंचितचे उमेदवार होते व त्यांनी त्यावेळी चांगली लढत दिली होती. यावेळीही त्यांनाच उमेदवारी दिली असती तर त्यांचा आणखी सन्मान वाढला असता आणि त्यांचे मताधिक्यही वाढले असते. त्या हिशोबाने ते प्रचार कार्याला देखिल लागले होते पण आपल्या नेहमीच्या स्टाईलने प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना ऐनवेळी दे धक्का दिला !
डाॅ. इंगोले यांच्या पूर्वी लोक स्वराज्य आंदोलनचे नेते प्रा. रामचंद्र भरांडे हे वंचितचे उमेदवार होते. त्यांनीही चांगली लढत दिली होती. पंधरा हजाराहून अधिक मते त्यांनी मिळवली होती. मातंग समाजाचे ते असल्याने बौद्ध मतांनी त्यांना जर चांगली साथ दिली असती तर चित्र पालटू शकले असते. त्यांना जर परत तिकीट दिले असते तर त्यांचे मताधिक्यही वाढले असते व कदाचित विजयही मिळाला असता पण अशी माणसे जोडून ठेवणे हे वंचितला का जमत नाही हे आकलनाबाहेरचे आहे.
देगलूर बिलोलीमध्ये यावेळी दलित उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील हा एकमेव राखीव मतदारसंघ असल्याने जिल्ह्यातील सर्व दलित नेत्यांनी ईकडेच धाव घेतली आहे. लोकसभेला काँग्रेस विजयी झाली असल्याने यातील बहुतेक जणांनी काँग्रेसकडे तिकीटांची मागणी केली आहे. सुरेश गायकवाड यात आघाडीवर आहेत. त्यांनाही दे धक्का असू शकतो कारण त्यांच्यासारखा अवजड कार्यकर्ता काँग्रेसला पचत नसतो.
भाजप की शिंदे गट अशीही येथे चुरस निर्माण झाली आहे. अशोक चव्हाणामुळे ही जागा भाजपला सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अशोक चव्हाणांचे भाजपने किती ऐकायचे ? बाप खासदार आणि आता पोरगी भोकरची उमेदवार ! भाजपमध्ये घराणेशाही वाढत असल्याचा हा पुरावा आहे. माजी आ. सुभाष साबने हे मागील कांही वर्षांपासून भाजपमध्ये असल्याने त्यांचा भाजपच्या तिकीटावर दावा असणे साहजिक आहे पण भाजपने त्यांना स्पष्ट नकार दिल्याचे दिसून येते, त्यामुळे त्यांनी नुकतीच भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. आता ते कुठे जातील ते अजून स्पष्ट झाले नाही.
देगलूरचे विद्यमान आमदार रितेश अंतापूरकर हे आपल्या धन्यासोबत भाजपमध्ये गेल्याने त्यांचा तिकीटावर दावा आहे तर शिंदे गटाकडून हवाहवाई माजी कर्मचारी ज्याचे कधी जमिनीला पाय टेकले नाहित, जे स्वतःला सनदी अधिकारी म्हणऊन घेत मुंबईला राहून देगलूरमधील आमदारकीचे दिवास्वप्न पाहत आहेत. मुंबईत आमदार व मंत्र्यांची जी हुजुरेगिरी करुन त्यांना स्वतः आमदार झाल्याचा भास होत असावा पण हे एवढे सोपे आहे काय ? तिकीट नाही मिळाल्यास अपक्ष राहण्याची देखिल त्यांची तयारी दिसते. रासपचे महादेव जानकर यांच्याशीही ते संपर्क ठेऊन आहेत. कांहीही करुन आमदार व्हायचे पण कशासाठी ? आणखी पैसा कमवायचा हीच अभिलाषा ना ? अरे किती कमाई करायची ? बस झाले ना ! अशा लोकांना एकंदरीत पाप की कमाईचा कुठेतरी हिशोब द्यावा लागतोच ना ? निवडणुकीत लोकं जेंव्हा धुऊन वाळू घालतील तेंव्हाच ते होशवर येतील !
समाज कार्याचा गंधही नसलेले असे संधी साधू अधिकारी आणखी बऱ्याच ठिकाणी आपले नशिब आजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे सर्व कशाच्या जोरावर ? व कशासाठी ? नोकरीत असताना समाजाकडे ढुंकूनही न पाहता भर अब्दुला गुड थैली में असे वागायचे आणि सेवानिवृतीनंतर मीच समाजाचा खरा उद्धारक, मीच खरा समाज सेवच अशा गप्पा मारायच्या यामुळे मतदार भुलत नाहित. मतदाराच्या कानाला बिड्या आहेत असे त्यांना वाटते की काय ?
आठवड्यातील पाच दिवस मुंबईला एसीत राहून ऐश करायची आणि शनिवार रविवारी येऊन मतदार संघाच्या विकासाच्या गप्पा मारायच्या असे उपरे निवडणुकीच्या मैदानात टिकत नसतात. अशा लोकांना निवडून दिले तर ते मुंबई सोडून मतदार संघाकडे फिरकतील याची काय गॅरंटी ? ईथे या मातीत झिजणारे असंख्य कार्यकर्ते आहेत व त्यांचा या मतदार संघावर पहिला अधिकार असतो याचा त्यांना रितसर विसर पडलेला दिसतो. पैशाच्या जोरावर सामाजिक चळवळी खिशात घालण्याची व या चळवळींना आपणच मदत केल्याची भाषा असे महाभाग बोलत असतील तर प्रसंगी त्यांना आसमान दाखविण्याची हिंमत या सामाजिक कार्यकर्त्यांत असू शकते हे कुणी विसरु नये ! बहुजन समाज पक्षाचा हत्ती देखिल या मतदार संघात आपली डौलदार चाल चलणार असल्याने अनेकांना धडकी भरल्याचे समजते.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कांही निर्णय मात्र चांगले घेतले आहेत. लोहा कंधारमधून त्यांनी शिवा नरंगले या लिंगायत समाजाच्या युवकाला पुन्हा संधी दिली. अनेक दिग्गज येथे पैशाचा महापूर सोडण्यासाठी तयार असतांना बाळासाहेबांनी जुन्या कार्यकर्त्याची ईथे कदर केली आहे. शिवाभाऊ येथे यावेळी चांगली फाईट देतील असे वाटते. त्यांना यावेळी मतदारांकडून नोट आणि वोट दोन्ही मिळत आहेत. ही चांगली बाब आहे पण बड्या प्रस्थापितांविरुद्ध त्यांना कडवी झूंज द्यावी लागणार आहे. येथील ओबीसी एकवटला तर चित्र पालटू शकते.
नांदेड दक्षिणमधून बाळासाहेब आंबेडकरांनी फारुख अहमद या जुन्या जाणकार कार्यकर्त्याला पुन्हा उमेदवारी दिली आहे. दक्षिणपेक्षा उत्तरमध्ये मुस्लीम समाज जास्त आहे. यावेळी फारुखभाई उत्तरमध्ये राहिले असते तर चांगली लढत झाली असती पण तसे होऊ शकले नाही. ईथे नवख्या उमेदवारास तिकीट देऊन बाळासाहेबांनी फार मोठी घोडचूक केली असे राजकीय विश्लेषक बोलत आहेत.
कांही झाले तरी नांदेड उत्तरमधून विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांना यावेळी जड जाणार आहे. त्यांनी बऱ्याच विकास कामांची केवळ उदघाटने केली आहेत, दिखावा केला आहे, भरपूर बॅनरबाजी केली आहे तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी सध्या नकारात्मक हवा असल्याने बालाजीरावांना त्याचा फटका बसू शकतो. शिवाय घरातच गुत्तेदारी जोपासल्याचा आणि निकृष्ट कामे केल्याचा जाब जनता मतदानातून विचारल्याशिवाय राहणार नाही असे दिसते. मतदारांचा हा दे धक्का कल्याणकर यांना यावेळी बसू शकतो.
- इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर,
नांदेड. मो. 8554995320
Tags
विशेष लेख.