1 कोटीपेक्षा जास्त मतदार, 36 मतदारसंघ; मुंबईतल्या लढती सत्तेच्या गणितासाठी निर्णायक ठरणार?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता अखेर मुंबईतल्या मुद्यांवर येऊन थांबली. मुंबई शहर आणि उपनगर मिळून 36 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि यासाठी 420 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर आतापर्यंत एकूण 1 कोटी 2 लाख 29 हजार 708 मतदारांची नोंद झाली आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेस असो वा शिवसेना ठाकरे गट आणि युतीत भाजपा असो वा शिवसेना शिंदे गट या चारही पक्षांसाठी मुंबई आणि ठाण्यातील लढती अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई कोणाला कौल देणार? यावर दोन्ही आघाड्यांमधील या चारही पक्षांची बरीच गणितंही अवलंबून आहेत.
विशेषत: तब्बल 25 वर्षं मुंबई महानगर पालिकेवर सत्ता कायम ठेवणाऱ्या शिवसेनेसाठीही या विधानसभेत मुंबईकर कोणत्या शिवसेनेच्या बाजूने उभे राहतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई आणि मुंबईलगतच्या विधानसभेच्या जागा राज्यातील सत्तेचा मार्ग सुकर करू शकतात याची जाणीव महाविकास आघाडी आणि महायुतीला आहे.
म्हणूनच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यातील जागांवर लक्ष केंद्रीत केल्याचं पहायला मिळालं.
मुंबई शहर आणि उपनगर मिळून एकूण 36 विधानसभा मतदारसंघात लढत होणार आहे. शिवसेनेचे बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुंबईत पक्ष फुटीनंतर 11 मतदारसंघांमध्ये शिवेसना विरुद्ध शिवसेना अशी मुख्य लढत पहायला मिळेल तर भाजप आणि काँग्रेससाठीही मुंबईतील लढती शिवसेनेइतक्यात महत्त्वाच्या आहेत.
मुंबईत अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने तिरंगी लढतही पहायला मिळेल. तसंच काही मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारही महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांसाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे?
मुंबईतील 1 कोटी 2 लाख 29 हजार 708 मतदारांपैकी 54 लाख 67 हजार 361 पुरुष मतदार आहेत तर 46 लाख 61 हजार 265 महिला मतदार आहेत. तसंच 1 हजार 82 तृतीयपंथी मतदार आहेत. मुंबईत एकूण 10 हजार 117 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत प्रचारादरम्यान धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्याला प्रधान्य दिलं तर महायुतीकडून यावर प्रत्युत्तर दिलं गेलं.
शिवाय, मुंबईतील रस्ते, वाहतूक कोंडी, महागाई, नोकरी आणि शिक्षणाच्या संधी अशा अनेक प्रश्नांवर मुंबईतील मतदार भाष्य करत आहेत. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही काही सामान्य मुंबईकरांशी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
बीबीसी मराठीशी बोलताना मुंबईकरांनी सांगितलं, “निवडणूक आली की योजनांमधून पैसे दिले जात आहेत पण महागाईवर तोडगा काढलेला नाही. रस्त्याचे मुंबईत मोठे प्रश्न आहेत. माझी स्कूटर आहे पण मुंबईत रस्ते एवढे खराब आहे की दोन महिन्यात स्कूटर खराब होते.”
तर आणखी एकाने सांगितलं, “कामं झालेली नाहीत. मुंबईत वाहतूक कोंडी खूप होते. यात दिवसाचा वेळ जातो. शिवाय, प्रदूषण आहे. मराठी मतदारांचं विभाजन झालेलं आहे. शिवसेना फुटल्याचंही आम्हाला दु:ख आहे. शिवसेनेची विभागणी झाल्याने आम्ही कोणाला मत द्यायचं, आम्ही कोणालाही मत दिलं तर उमेदवार नंतर दुसऱ्या पक्षात जातो.”
एका महिला मतदाराने महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडेही लक्ष वेधलं. त्या म्हणाल्या, “महिला सुरक्षेला प्राधान्य दिलं पाहिजे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी राजकीय पक्षांनी काय करणार ते सांगितलं पाहिजे.”
तर एका तरुणाने सांगितलं की, “मुंबईतही नोकरीची संधी नाही. लोकसंख्या जास्त आहे पण तरुणांना नोकऱ्या नाहीत.”
मुंबईतील लक्षवेधी लढत
मुंबईत 11 मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी मुख्य लढत होणार आहे. म्हणजेच शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे मुंबईकर कोणत्या शिवसेनेला कौल देतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे.
या लढतींमध्ये सर्वाधिक लक्ष लागलं आहे ते शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाकडे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार आणि माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी संधी दिली आहे. तर याच मतदारसंघातून मनसेचे संदीप देशपांडेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दुसरीकडे माहीम मतदारसंघाची लढतही लक्षवेधी ठरली आहे. या मतदारसंघातून राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर निवडणूक लढवतील तर उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.
तसंच भायखळा मतदारसंघात विद्यमान आमदार यामिनी जाधव या शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर ठाकरे गटाकडून मनोज जामसूतकर मैदानात आहेत. याशिवाय, भांडुप, विक्रोळी, कुर्ला, मागाठणे, अंधेरी पूर्व, दिंडोशी, जोगेश्वरी या मतदारसंघांमध्येही शिवसेनेच्या दोन्ही गटांचे उमेदवार रिंगणात आहेत.
तसंच शिवडी मतदारसंघाची लढतही महत्त्वाची ठरणार आहे. कारण याठिकाणी भाजपने मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार अजय चौधरी विरुद्ध मनसेचे बाळा नांदगावकर अशी लढत होईल.
शिवाय, काँग्रेस आणि ठाकरे गटाचा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिलेल्या धारावी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांच्या बहीण ज्योती गायकवाड निवडणूक लढवत आहेत. तर याठिकाणी शिंदे गटाकडून राजेश खंदारे उमेदवार आहेत.
याव्यतिरिक्त, राष्ट्रवादी काँग्रेससाठी अणुशक्ती नगर आणि मानखुर्द विधानसभा मतदारसंघाची लढत महत्त्वाची ठरेल. एकाबाजूला अणुशक्ती नगर मतदारसंघातून माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून फहाद अहमद निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
तसंच मानखुर्द मतदारसंघातून अजित पवार यांनी भाजपचा विरोध डावलून नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. परंतु या मतदारसंघावरून महायुतीत शेवटपर्यंत एकमत होऊ शकलं नाही. भाजपने नवाब मलिकांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका घेतली. तर शिंदे गटाकडून याठिकाणी स्वतंत्र उमेदवारही देण्यात आला. मलिक यांच्याविरोधात सपाचे अबू आझमी निवडणूक लढवणार आहेत.
तसंच वांद्रे पूर्व मतदारसंघाच्या लढतीकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’च्या अंगणातील ही निवडणूक आहे. या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आणि युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाई पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्यासमोर विद्यमान आमदार झीशान सिद्दीकी यांचं आव्हान असेल.
तसंच राहुल नार्वेकर, अमीन पटेल, आशिष शेलार, राम कदम, पराग आळवणी, अस्लम शेख या विद्यमान आमदार असलेल्या उंमेदवारांसाठीही वर्चस्वाची लढाई आहे.
मराठी मतांचं विभाजन कोणाच्या फायद्याचं?
मुंबईत मराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. तसंच गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारही काही भागात निर्णायक ठरू शकतात. मुंबईत भाजपने 18, शिवसेना शिंदे गटाने 14, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 3 उमेदवार दिले आहेत. तर महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाचे 22, काँग्रेस 11, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 2 आणि सपाकडून 1 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहे.
यात महाविकास आघाडीने 23 मराठी भाषिक उमेदवार दिलेत तर 6 उमेदवारी अमराठी आहेत. तसंच युतीकडून 20 मराठी उमेदवार आणि 12 अमराठी उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, “लोकसभेच्या निकालाचा विचार करता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला यश मिळालं. या तुलनेत एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना प्रतिसाद मिळालेला नाही. मला वाटतं विधानसभेलाही मुंबईत उद्धव ठाकरे यांना पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर सहानुभूती मिळू शकते. भाजपचा पारंपरिक मतदार त्यांच्यासोबतच राहील असं वाटतं. गुजराती मतदारही मुंबईत मोठ्या संख्येने आहेत, हे मतदान भाजपला फायदा मिळवून देऊ शकतं. तसंच उत्तर भारतीय मतदारांचा फायदाही भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनाही होईल. मराठी मतांचं मात्र मोठं विभाजन या निवडणुकीत दिसेल. शिवसेनेचे दोन गट, भाजप, आणि मनसे यात मराठी मतदारांची मोठी विभागणी होईल. परंतु मनसे आणि वंचित बहुजन आघाडी फार काही मतं खातील असं वाटत नाही. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे हे आतापर्यंत लोकांच्या लक्षात आलेलं आहे.”
भाजपच्याच सदस्याकडून मुंबईत काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोसह काही नारे दिले गेले, तसंच भाजप नेत्यांनीही ‘एक है तो सेफ है’ अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. परंतु याचा मुंबईत तरी फार परिणाम दिसणार नाही असं संदीप प्रधान सागंतात.
ते म्हणाले, “भाजपकडून नारे दिले गेले परंतु मुंबईत हिंदु मतांचं धुव्रीकरण करण्यासाठी हा प्रयोग यशस्वी होईल असं वाटत नाही. आपल्याकडे हिजाब, लव्ह जिहाद, लँड जिहाद हे मुद्दे लोकसभेत चालले नव्हते. याचा भाजपला फायदा झालेला नाही. महाराष्ट्रात अशी जडणघडण नाही. यामुळे महाराष्ट्रात या मुद्यांना थारा मिळेल असं वाटत नाही. मुंबईत बॉम्बस्फोट झाले त्याकाळात लोकांनी काही मोजक्या पॉकेट्समध्ये या मुद्यांवर मतदान केलं होतं पण आता हे मुद्दे मुंबईत राहिलेले नाहीत. मुंबई ही कामाला, नोकरी-धंद्याला प्राधान्य देणारी आहे. यामुळे हे वातावरण मुंबईकरांना नकोय हे आतापर्यंत स्पष्ट आहे. तसंच कोरोना संकट काळात आर्थिक फटका खाल्ल्यानंतर हे मुद्दे स्वीकारून वातावरण अस्थिर करण्याकडे लोकांचा कल आहे असं मला वाटत नाही. यामुळे मुंबईतील मतदारसंघांमध्ये आतापर्यंत जो निकाल येत होता त्यापेक्षा फार काही वेगळा निकाल असेल असं वाटत नाही.”
तर मराठी मतांचं विभाजन शिवसेनेच्या दोन गटात होईल परंतु मनसे खूप काही मतं घेईल असं वाटत नाही असा अंदाज ज्येष्ठ पत्रकार दीपक भातूसे यांनी वर्तवला. ते सांगतात, “गेल्या निवडणुकांमध्ये मनसेच्या उमेदवारांमध्ये मराठी मतांची घसरण पहायला मिळाली आहे. यामुळे मराठी मतं फार काही मनसेकडे वळतील असं वाटत नाही. शिवसेनेच्या दोन गटात मात्र मतं विभागली जातील. तर भाजप आणि काँग्रेसच्या बाबतीत काही अपवाद वगळता त्यांच्याकडे पारंपरिक मतदारसंघ राहतील असं सध्याचं चित्र आहे. तसंच ठाकरे गट आणि काँग्रेसकडून प्रकल्प गुजरातला गेल्याचा प्रचार करण्यात आला. याचा काही प्रमाणात परिणाम दिसू शकतो.”
शिवसेना उद्धव ठाकरे गट पहिल्यांदाच काँग्रेससोबत आघाडीत विधानसभा निवडणूक लढवत आहे. लोकसभेच्या निकालात काँग्रेसची मतं उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांकडे ट्रांसफर झाल्याचं दिसलं होतं. काही प्रमाणात शिवसेनेची मतंही काँग्रेसकडे वळली. मात्र आता विधानसभेत सुद्धा एकमेकांची मतं ट्रांसफर करण्यात दोन्ही पक्षांना कितपत यश मिळतं ते पहावं लागेल. तसंच शिवसेना शिंदे गटची मतं भाजपला मिळतात का हे सुद्धा महत्त्वाचं ठरेल.

मुंबईतील पक्षनिहाय उमेदवार यादी
दक्षिण मुंबई विभाग
कुलाबा विधानसभा मतदारसंघ
भाजप – राहुल नार्वेकर (विद्यमान)
काँग्रेस – हिरा देवासी
अर्जुन रुखे – बसपा
मुंबादेवी मतदारसंघ
काँग्रेस - अमीन पटेल (विद्यमान)
शिंदे शिवसेना – शायना एनसी
मनसे- केशव मुख्ये
एमआयएम – मोहम्मद मन्सुरी
मलबार हिल मतदारसंघ
भाजप – मगलप्रभात लोढा विद्यमान आमदार
शिवसेना ठाकरे गट – भैरू चौधरी
एमआयएम – सबीना सलीम पठाण
भायखळा मतदारसंघ
शिवसेना शिंदे गट – यामिनी जाधव, विद्यमान आमदार
शिवसेना ठाकरे गट – मनोज जामसूदकर
सपा – सईद खान
शिवडी मतदारसंघ
शिवसेना ठाकरे गट – अजय चौधरी विद्यमान
मनसे – बाळा नांदगावकर
भाजप – नाना आंबोले
वरळी मतदारसंघ
शिवसेना ठाकरे गट – आदित्य ठाकरे विद्यमान
शिवसेना शिंदे गट – मिलिंद देवरा
मनसे – संदीप देशपांडे
वंचित – अमोल निकाळजे
मुंबई दक्षिण मध्य विभाग
माहीम मतदारसंघ
शिवसेना शिंदे गट – सदा सरवणकर विद्यमान
शिवसेना उद्धव ठाकरे – महेश सावंत
मनसे- अमित ठाकरे
बसपा – सूधीर जाधव
वडाळा मतदारसंघ
शिवसेना ठाकरे गट – श्रद्धा जाधव
भाजप – कालिदास कोळंबर विद्यमान
मनसे – स्नेहल जाधव
धारावी मतदारसंघ
काँग्रेस – ज्योती गायकवाड
शिवसेना शिंदे गट – राजेश खंदारे
बसपा – मनोहर रायबागे
सायन कोळीवाडा मतदारसंघ
भाजप – तमिल सेल्वन विद्यमान
काँग्रेस – गणेश यादव
मनसे – संजय भोगले
वंचित – राजगुरु कदम
चेंबूर मतदारसंघ
शिवसेना ठाकरे गट – प्रकाश फातर्पेकर विद्यमान
शिवसेना शिंदे गट – तुकाराम काते
मनसे – माऊली थोरवे
वंचित – दीपक निकाळजे
अणुशक्ती नगर मतदारसंघ
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – फहाद अहमद
अजित पवार गट – सना मलिक
मनसे – नवीन आचार्य
वंचित – सतीश राजगुरू
मुंबई उत्तर पूर्व विभाग
मानखूर्द मतदारसंघ
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – नवाब मलिक (विद्यमान अणुशक्ती नगर)
सपा - अबू आझमी
मनसे – जगदीश खांडेकर
बसपा – विद्यासागर
घाटकोपर पूर्व मतदारसंघ
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – राखी जाधव
भाजप – पराग शाह विद्यमान
मनसे- संदीप कुलथे
वंचित – सूनीता गायकवाड
घाटकोपर पश्चिम मतदारसंघ
भाजप – राम कदम विद्यमान
शिवसेना ठाकरे गट – संजय भालेराव
मनसे- गणेश चुक्कल
वंचित – सागर गवई
भांडुप पश्चिम मतदारसंघ
शिवसेना ठाकरे गट – रमेश कोरगावकर विद्यमान
शिवसेना शिंदे गट – अशोक पाटील
मनसे – शिरीष सावंत
वंचित – स्नेहल सोहानी
विक्रोळी मतदारसंघ
शिवसेना ठाकरे गट – सुनील राऊत विद्यमान
शिवसेना शिंदे गट – सुवर्णा करंजे
मनसे- विश्वजीत ढोलम
बसपा – हर्षवर्धन खांडेकर
मुलूंड मतदारसंघ
भाजप – मिहीर कोटेचा विद्यमान
काँग्रेस – राकेश शेट्टी
वंचित – प्रदीप शिरसाठ
मुंबई उत्तर मध्य विभाग
वांद्रे पश्चिम मतदारसंघ
भाजप – आशिष शेलार विद्यमान
काँग्रेस – असीफ झकेरीया
बसपा – अझीझ कुरेशी
वांद्रे पूर्व मतदारसंघ
शिवसेना ठाकरे गट – वरुण सरदेसाई
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – झीशान सिद्दीकी विद्यमान
मनसे – तृप्ती सावंत
वंचित – प्रतिक जाधव
कलीना मतदारसंघ
शिवसेना उद्धव ठाकरे गट - संजय पोतनीस
भाजप – अमरजित सिंग
मनसे – संदीप हुटगी
वंचित – मोहम्मद सिद्दीकी
कुर्ला मतदारसंघ
शिवसेना शिंदे गट – मंगेश कुडाळकर
शिवसेना ठाकरे गट – प्रवीणा मोरजकर
मनसे – प्रदीप वाघमारे
बसपा – विनोद मोरे
चांदिवली मतदारसंघ
काँग्रेस – नसीम खान
शिवसेना शिंदे गट – दिलिप लांडे विद्यमान
मनसे – महेंद्र भानुशाली
एमआयएम – गफर सय्यद
विलेपार्ले मतदारसंघ
भाजप – पराग आळवणी विद्यमान
शिवसेना ठाकरे गट – संदीप नाईक
मनसे – जुईली शेंडे
वंचित – संतोष अंबुलगे
मुंबई उत्तर पश्चिम विभाग
मालाड पश्चिम मतदारसंघ
काँग्रेस – अस्लम शेख विद्यमान
भाजप – विनोद शेलार
वंचित – अजय रोकडे
चारकोप मतदारसंघ
भाजप – योगेश सागर विद्यमान
काँग्रेस – यशवंत सिंग
मनसे- दिनेश साळवी
वंचित – दिलीप लिंगायत
कांदिवली पूर्व मतदारसंघ
भाजप – अतुल भातखळकर विद्यमान
कांग्रेस – कालू बुधेलिया
मनसे- महेश फरकासे
वंचित – विकास शिरसाठ
मागाठणे मतदारसंघ
शिवसेना शिंदे गट – प्रकाश सुर्वे
शिवसेना ठाकरे गट – उदेश पाटेकर
मनसे – नयन कदम
वंचित – दीपक हनवते
दहिसर मतदारसंघ
शिवसेना ठाकरे गट – विनोद घोसाळकर
भाजप – मनीषा चौधरी विद्यमान
मनसे – राजेश येरूणकर
वंचित कमलाकर साळवे
बोरिवली मतदारसंघ
शिवसेना ठाकरे गट – संजय भोसले
भाजप - संजय उपाध्याय
मनसे – कुणाल माईणकर
बसपा – किसन इंगोले
उत्तर पश्चिम विभाग
अंधेरी पूर्व मतदारसंघ
शिवसेना ठाकरे गट – ऋतुला लटके (विद्यमान आमदार)
शिवसेना शिंदे गट – मुरजी पटेल
बसपा – अजीज कुरेशी
अंधेरी पश्चिम मतदारसंघ
काँग्रेस – अशोक जाधव
भाजप – अमित साटम
बसपा- पतीतपावन नित्य
वर्सोवा मतदारसंघ
शिवसेना ठाकरे गट – हारून खान
भाजप – भारती लव्हेकर (विद्यमान आमदार)
मनसे – संदेश देसाई
गोरेगाव मतदारसंघ
शिवसेना ठाकरे गट – समीर देसाई
भाजप – विद्या ठाकूर (विद्यमान आमदार)
मनसे – विरेंद्र जाधव
बसपा – अमोल सावंत
दिंडोशी मतदारसंघ
शिवसेना ठाकरे गट – सुनील प्रभू (विद्यमान आमदार)
शिवसेना शिंदे गट – संजय निरुपम
मनसे – भास्कर परब
वंचित बहुजन आघाडी – राजेंद्र ससाणे
जोगेश्वरी पूर्व मतदारसंघ
शिवसेना ठाकरे गट – अनंत नर
शिवसेना शिंदे गट – मनिषा वायकर
मनसे – भालचंद्र अंबुरे
वंचित बहूजन आघाडी – परमेश्वर रणशूर