शाही जामा मशिदीचा सर्व्हे करताना झालेल्या हिंसाचारात 3 जणांचा मृत्यू, काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. संभल जिल्ह्यातील जामा मशिदीचा सर्व्हे होत असताना हा हिंसाचार झाला.
यावेळी संतप्त जमावानं अनेक गाड्यांना आग लावली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले आणि लाठीमार देखील केला.
गल्ल्यांमध्ये जमलेले लोक आणि दगडं दिसत असलेले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत आहेत.
मुरादाबादचे विभागीय आयुक्त अंजनेय कुमार सिंह यांनी या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.
जियाउर्रहमान बर्क संभलचे समाजवादी पार्टीचे खासदार आहेत. बीबीसीचे प्रतिनिधी दिलनवाज पाशा, जियाउर्रहमान बर्क यांच्याशी फोनवर बोलले असता बर्क यांनी दावा केला की 'पोलिसांनी गोळीबार केला आहे आणि शहरात तणाव आहे.'
प्रशासन काय करतं आहे?
मुरादाबादचे विभागीय आयुक्त अंजनेय कुमार सिंह म्हणाले की 11 वाजता सर्व्हे करून झाल्यानंतर जेव्हा टीम निघाली तेव्हा जमावानं तिन्ही बाजूंनी दगडफेक केली. यानंतर सर्व्हे करणाऱ्या टीमला तिथून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.
ते म्हणाले की याच दरम्यान तिन्ही बाजूंनी जमाव समोरा-समोर होता. त्याच वेळेस पोलीस अधीक्षकांच्या पीआरओच्या पायाला गोळी लागली. त्याचबरोबर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे आणि 15-20 जवान जखमी झाले आहेत.

विभागीय आयुक्तांनी सांगितलं की या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या व्यक्तींची नावं, नईम, बिलाल आणि नौमान अशी आहेत. तिन्ही मृतदेहांचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. सध्या त्या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आहे.
त्यांनी सांगितलं की, "दगडफेकीच्या घटनेत दोन महिलांसह 15 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हा नक्कीच चिथावणी देण्याचा प्रकार आहे. यामध्ये तरुण आणि महिला होत्या. सर्व्हे करण्याचं काम न्यायालयाच्या आदेशानुसार आणि शांततेत सुरू होतं."
संभलचे पोलीस अधीक्षक (एसपी) कृष्ण कुमार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की 'जमावाकडून गोळीबार करण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी देखील गोळीबार केला आहे'. त्यांनी सांगितलं की दगडफेकीत अनेक पोलीस देखील जखमी झाले आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की संभल मध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर
अधिकारी उपस्थित आहेत. ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
रविवारच्या घटनेबद्दल पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार म्हणाले, "संभलच्या पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरात न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व्हे केला जात होता. सर्व्हे शांततेत सुरू होता. त्याचवेळी अनेक गल्ल्यांमधून लोक बाहेर आले आणि त्यांनी अचानक पोलीस दलावर दगडफेक केली."
"लाठीमार करून जमाव पांगवण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्या जमावावर अश्रूधुराचे नळकांडे देखील फोडण्यात आले आहेत. संभलमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे."

कृष्ण कुमार म्हणाले, "ज्या लोकांनी जमावाला भडकवलं आहे, त्यांची सीसीटीव्हीद्वारे ओळख पटवली जाईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यांच्यावर अशी कारवाई केली जाईल की लोक त्यापासून धडा घेतील."
संभलमध्ये झालेल्या दगडफेकीवर उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "काही समाजकंटकांनी दगडफेक केली आहे. पोलीस आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनेच्या ठिकाणी उपस्थित आहेत. तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे. दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवून पोलीस त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतील."
काय आहे हे प्रकरण?
कैलादेवी मंदिराचे महंत ऋषिराज गिरी महाराज यांनी दावा केला होता की संभलची शाही मशीद हीच हरिहर मंदिर आहे.
महंत ऋषी राज गिरी महाराज यांनी 19 नोव्हेंबरला सिव्हिल कोर्टात एक याचिका दाखल करून मशिदीचा सर्व्हे करण्याची मागणी केली होती.
त्यावर न्यायालयानं सात दिवसांच्या आत सर्व्हे करण्याचा आदेश दिला होता. त्याचबरोबर सर्व्हे करणाऱ्या टीमला व्हिडिओ आणि फोटोग्राफीसह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

न्यायालयानं रमेश सिंह राघव यांना अॅडव्होकेट कमिश्नर केलं आहे. रविवारी सर्व्हे करणारी टीम मशिदीत पोहोचल्यानंतर तिथे लोकं गोळा होण्यास सुरूवात झाली होती.
संभलचे जिल्हाधिकारी राजेंद्र पेंसिया म्हणाले की गेल्या वेळेस रात्र झाल्यामुळे सर्व्हे पूर्ण होऊ शकला नव्हता. त्यामुळे आज सर्व्हे करण्यात आला.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वकाही व्यवस्थित सुरू होतं. मात्र मशिदीच्या बाहेर जमलेल्या जमावानं अचानक पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे तिथे तणाव निर्माण झाला.
हिंदूंच्या वकिलानं काय सांगितलं?
अॅडव्होकेट विष्णू शंकर जैन यांनी अनेक याचिकाकर्त्यांच्या वतीनं संभलच्या सिव्हिल जज (सीनियर डिव्हिजन) च्या न्यायालयात मंगळवारीच खटला दाखल केला होता.
विष्णू शंकर जैन हेच वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणात देखील वकील आहेत.
विष्णू शंकर जैन यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं की मशिदीतील सर्व्हेचं काम पूर्ण झालं आहे.
ते म्हणाले, "सकाळी साडे सात वाजेपासून दहा वाजेपर्यंत कारवाई झाली. मला तुम्हाला सांगायचं आहे की मशिदीची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अॅडव्होकेट कमिश्नरद्वारे करण्यात आली. आता हा सर्व्हे पूर्ण झाला आहे. 29 नोव्हेंबरला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे."
"मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी कायद्यावर विश्वास ठेवावा. ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. ही प्रदीर्घ प्रक्रिया आहे. यात लगेचच कोणताही निर्णय होणार नाही. अॅडव्होकेट कमिश्नर न्यायालयात त्यांचा अहवाल सादर करतील."

विष्णू जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅडव्होकेट कमिश्नरचा अहवालात न्यायालयात सादर केल्यानंतर विरोधी बाजूच्या पक्षकारांना त्यावर प्रश्नोत्तरं करण्याची संधी मिळेल. त्यानंतर या खटल्याची सुनावणी पुढे सरकेल.
विष्णू शंकर यांच्या मते, सर्व्हे होत असताना मशीद समितीचे वकील आणि समितीचे सदस्य देखील उपस्थित होते.
नेमका वाद काय आहे?
संभलची ऐतिहासिक जामा मशीद नेमकी कधी बांधण्यात आली आहे, यासंदर्भात वाद आहे. मात्र हिंदू याचिकाकर्त्यांनी न्यायालयात दावा केला आहे की मुघल बादशाह बाबरच्या आदेशावरून एका हिंदू मंदिराच्या जागी ही मशीद बांधण्यात आली होती.
मात्र संभलच्या इतिहासावर 'तारीख ए संभल' हे पुस्तक लिहिणारे मौलाना मोईद म्हणतात, "बाबरनं या मशिदीची डागडुजी केली होती. त्यामुळे बाबरनंच ही मशीद बांधली ही गोष्ट खरी नाही."
मौलाना मोईद म्हणतात, "ही बाब ऐतिहासिक सत्य आहे की बाबरनं लोधी राजवटीचा पराभव केल्यानंतर 1526 मध्ये संभलचा दौरा केला होता. मात्र बाबरनं जामा मशीद बांधलेली नाही."
मौलाना मोईद यांच्या मते, ही मशीद तुघलक राजवटीच्या काळात बांधली गेली असण्याची मोठी शक्यता आहे. या मशिदीची स्थापत्यशैली मुघल काळासारखी नाही.

सध्या ही मशीद भारतीय पुरातत्व खात्याच्या देखरेखीखाली आहे आणि एक संरक्षित वास्तू आहे.
या जामा मशिदीबाबत वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ही मशीद म्हणजे मंदिरच असल्याचा दावा हिंदू संघटना करत आल्या आहेत. शिवाय शिवरात्रीच्या वेळेस इथल्या विहिरीजवळ पूजा करण्याचे प्रयत्न देखील करण्यात आले आहेत.
मात्र मुस्लिम पक्षकारांचं म्हणणं आहे की अलीकडच्या काळात मशीदीबाबत न्यायालयात एखादा खटला दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मुस्लिम पक्षकारांचे वकील मसूद अहमद म्हणाले, "हा खटला दाखल करून मुस्लिमांच्या धार्मिक स्थळाबाबत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या मशिदीबाबत न्यायालयात आधीपासून कोणताही वाद नाही."
राजकीय नेते काय म्हणाले?
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य संभलच्या प्रकरणाबाबत म्हणाले की न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणी संदर्भात जे कोणी अडथळे आणतील त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.
ते म्हणाले, "न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणं हे सरकार आणि पोलीस यंत्रणेची जबाबदारी आहे. ती पार पाडण्यात येईल. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना जे लोक अडथळे निर्माण करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल."
तर भाजपाचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी एक व्हिडिओ जारी करत म्हटलं आहे की, "संभलमध्ये सर्व्हे करण्यासाठी कोर्ट कमिश्नरची टीम पोहोचली होती. या टीमवर झालेल्या दगडफेकीतून दिसून येतं की तुमचा राज्यघटनेवर विश्वास नाही, देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही, कायद्यावर विश्वास नाही."

राकेश त्रिपाठी यांनी लोकांना आवाहन केलं की संभल मध्ये शांतता राखावी आणि कोणत्याही परिस्थितीत कायदा हाती घेऊ नये.
बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी संभलच्या घटनेसाठी योगी आदित्यनाथ यांचं सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
त्या म्हणाल्या, "संभलमध्ये जे काही घडतं आहे ते अतिशय निषेधार्ह आहे. हे काम दोन्ही बाजूच्या लोकांना एकत्र घेऊन शांततेत पार पाडायला हवं होतं. मात्र तसं घडलेलं नाही."
मायावती म्हणाल्या की संभल मध्ये झालेल्या निर्माण वादासाठी आणि हिंसाचारासाठी प्रशासन आणि सरकार जबाबदार आहे. त्याचबरोबर त्यांना लोकांना शांतता राखण्याचं आवाहन देखील केलं आहे.