लातूरच्या समजदार मतदारांनी विनोद खटकेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे : लक्ष्मण गायकवाड
लातूरच्या समजदार मतदारांनी विनोद खटकेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे : लक्ष्मण गायकवाड
लातूर : लातूरचा मतदार सुजाण, जागरूक आहे. त्यांना चांगल्या -वाईटाची जाण आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देऊन लातूरच्या समजदार मतदारांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे , असे प्रतिपादन भटके विमुक्त ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष , ' उचल्या' कार लक्ष्मण गायकवाड यांनी बुधवारी लातुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले. भटके विमुक्त ओबीसी महासंघाने खटके यांना जाहीर पाठिंबा दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीकडून लातूर शहर विधानसभा मतदार संघातून व्हीएस पँथर चे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके हे निवडणूक लढवत आहेत. त्यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित करण्याच्या उद्देशाने लातुरात आल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी पत्रकारांशी सुसंवाद साधला. आपण सातत्याने शोषण करणाऱ्यांच्या विरोधात लढा देत आलो आहोत. आजही सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य मिळालेले नाही. राजेशाही संपली असली तरी राजकारण्यांची घराणेशाही सुरु झाल्याचा आरोप करून लक्ष्मण गायकवाड पुढे म्हणाले की, आपल्या देशात स्वातंत्र्यापूर्वी होत नव्हत्या एवढ्या आत्महत्या आता होताना दिसत आहेत. सगळ्याच गोष्टीत आघाडीवर असणारा मराठा समाज आता ओबीसीच्या आरक्षणाची मागणी करून मसणजोगी, वडार, कैकाडी समाजासोबत यायला तयार झाला आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिले गेले तर ते मसणजोगी, वडाराच्या मुलीशी सोयरीक करणार का ? त्यांच्या ताटात जेवणार का ? असा सवाल करून गायकवाड यांनी भारतात एवढे खोटे बोलणारे लोक कधी पाहिले नव्हते,असे बोलून दाखवले.
विनोद खटके सामान्य परिवारातून आणि सामाजिक चळवळीतून आलेले उमदे नेतृत्व आहे. त्यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपल्या कार्याची चुणूक लातूरकरांना वेळोवेळी दाखवून दिली आहे. एकवेळ मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री करा, पण सामान्यांच्या हिताआड येणाऱ्या गढीवरची देशमुख - पाटलांना हद्दपार करा,असे आवाहन करून त्यांनी लातूरच्या मतदारांनी विनोद खटकेसारख्या उमद्या युवा नेतृत्वाच्या पाठीशी राहावे,असे आवाहन केले. वंचितचे उमेदवार विनोद खटके यांनी आपल्याला भटके विमुक्तांच्या पाठिंबा मिळाल्याने आपली बाजू आणखी मजबूत झाली असून निवडून आल्यास त्यांच्या न्याय मागण्याच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू,असे सांगितले. लातूरच्या मतदारांकडून आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आपण ही लढाई नक्कीच जिंकणार असल्याचा विश्वासही खटके यांनी व्यक्त केला. प्रा. मच्छिन्द्र भोसले यांनीही यावेळी मतदारांनी विनोद खटके यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. या प्रसंगी सलीम सय्यद, बाबू शेल्हाळ , रमेश गायकवाड, सोफीभाई सय्यद, आनंद जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
No comments