वैविध्यपूर्ण दिवाळी अंकांची परंपरा केवळ मराठी भाषेतच संविधान गौरव दिनी ग्रंथमित्र पांडुरंग अडसुळे यांचे प्रतिपादन - latursaptrangnews

Breaking

Wednesday, November 27, 2024

वैविध्यपूर्ण दिवाळी अंकांची परंपरा केवळ मराठी भाषेतच संविधान गौरव दिनी ग्रंथमित्र पांडुरंग अडसुळे यांचे प्रतिपादन



 वैविध्यपूर्ण दिवाळी अंकांची परंपरा केवळ मराठी भाषेतच

संविधान गौरव दिनी ग्रंथमित्र पांडुरंग अडसुळे यांचे प्रतिपादन
लातूर,दि.२७ःसाहित्य,विज्ञान,आरोग्य,शेती,पर्यावरण,ज्योतिशास्त्र आदि विविध विषयांवरील ज्ञान दिवाळी अंकांच्या माध्यमातून देण्याची गेली ११५ वषार्ंंची परंपरा आजही कायम असून,ज्या दिवाळी अंक जगभर परसलेला मराठी वाचक त्यांचा आस्वाद घेत असतो,दिवाळी अंक काढण्याची ही अभिमानास्पद परंपरा केवळ मराठी भाषेतच आहे असे सांगून,सर्वांगसुंदर अशा भारतीय संविधानामुळेच आपण आज सुरक्षित राहून विकासाच्या वाटा धुंडाळतो आहोत,असे प्रतिपादन ग्रंथमित्र पांडुरंग अडसुळे यांनी येथे केले.
लातूरच्या हरिभाऊ नगरातील सम्राट अशोक सार्वजनिक वाचनालयात मंगळवार,दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान गौरव दिन आणि दिवाळी अंक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ग्रंथमित्र अडसुळे बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी साहित्यिक इंजि.हरिदास अडसुळे हे होते.
पुढे बोलताना ग्रंथमित्र अडसुळे पुढे म्हणाले की,ज्ञानाची परंपरा प्रगाढ आहे, ती टिकली पाहिजे,यासाठी सार्वजनिक ग्रंथालयातून काम केले जाते,बाराव्या शतकापासून संतांनी ज्ञानाची  परंपरा टिकवली. भारतात २२ बोली भाषा आहेत,डॉ.गणेश देवी यांनी भाषेचे संशोधन करुन दहा हजार बोली भाषेची सूची केली.सुमारे सव्वाशे वर्षांपासून दिवाळी अंकांमधून सुरु असलेली ही ज्ञान गंगा अहोरात्र वाहती ठेवण्याचे काम सार्वजनिक ग्रंथालये करीत आहेत.त्याचा उपयोग करुन घ्यावा.म.ज्योतिराव फुले,सयाजीराव गायकवाड,शाहू महाराज,बाबासाहेब आंबेडकर यांनीही वसतीगृहे,शाळा,ग्रंथालये सुरुवात करुन ज्ञानाचा प्रसार केला.अलिकडे ज्ञान बंदिस्त करण्याचे कारस्थान सुरु आहे,पण ज्ञानाची किंमत ओळखून आपण त्याचा उपयोग विकासासाठी करावा.संविधानाचे वाचन प्रत्येकाने केले पाहिजे हा देश सगळ्यांचा आहे,असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात इंजि.हरिदास अडसुळे यांनी संविधानाने सर्वांना विकासाच्या संधी उपलब्ध करुन दिले आहे,तथापि आज संविधानाला मोडीत काढण्याचे प्रयत्न होत आहेत,अशावेळी सर्वांनी याकडे गांभीर्यांने पाहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिव बाळकृष्ण होळीकर यांनी केले.ग्रंथपाल अंजुषा काटे यांनी आभार मानले.प्रारंभी ग्रंथमित्र पांडुरंग अडसुळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.नंतर मान्यवरांचे ग्रंथभेट देवून स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला लिपिक संकेत होळीकर,वाचक गणपत वाव्हळे,विकी सोमवंशी,प्रल्हाद गायकवाड,कवी प्रदीप कांबळे,अर्थव कदम,आर.एन.खाडप,जे.एन.माने,किशन यमुलवाड, धनराज कांबळे, मारुती तलवारे,जी.एच.गायकवाड,पी.एन.बसपूरे,एस.एस.साबळे,आनंद अडसुळे आदींची उपस्थिती होती..

No comments:

Post a Comment