भाजपा आणि नरेंद्र मोदींचा निर्णय आम्हाला मान्य असेल- एकनाथ शिंदे

 भाजपा आणि नरेंद्र मोदींचा निर्णय आम्हाला मान्य असेल- एकनाथ शिंदे

भाजपा आणि नरेंद्र मोदींचा निर्णय आम्हाला मान्य असेल- एकनाथ शिंदे


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. कधी नव्हे एवढं मोठं यश एखाद्या आघाडीला या निवडणुकीत मिळाल्याचं पाहायला मिळालं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र नवे मुख्यमंत्री पदावर येईपर्यंत ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.

आज 27 नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे यांची ठाण्यात पत्रकार परिषद होत आहे.

यावेळेस बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले,

“मी मोदींना काल फोन केला. सरकार बनवताना निर्णय घेताना कुठलं काही अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे हे कधीही मनात आणू नका. तुम्ही अडिच वर्षं संधी दिली. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या. महायुतीचे प्रमुख म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय भाजपसाठी अंतिम असतो तसा तो आमच्यासाठी अंतिम आहे. एकनाथ शिंदे अडचण नाही. शहांनाही फोन केला.”

उद्या दिल्लीत अमित शहांसोबत बैठक होणार आहे. तेथे वरिष्ठ निर्णय घेतील. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“ही लँडस्लाईड व्हिक्टरी आहे. असा विजय यापूर्वी कधीही झालेला नाही. महायुतीने केलेलं काम, महायुतीवर दाखवलेला विश्वास. मविआने थांबवलेली कामं आम्ही सुरू केली. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली. हा जनतेचा विजय आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीत प्रचंड काम केलं.

मी पहाटेपर्यंत काम करायचो. दोन तीन तास झोप घ्यायचो. परत सभेला जायचो. 80-90 सभा घेतल्या. प्रवास खूप केला. पायाला भिंगरी लावून काम केलं. कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी मुख्यमंत्री स्वतः समजलो नाही. काॅमन मॅन म्हणून काम केलं. अडीच वर्षं मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मला त्यांनी दिली. मी त्यांना धन्यवाद देतो”

“अडीच वर्षाच्या कारकीर्दीत मी समाधानी आहे. आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. आतापर्यंतच्या सरकारमध्ये एवढे निर्णय कोणीच घेतले नाहीत.”

ते पुढे म्हणाले, “या निवडणुकीत मतांचा वर्षाव हा केवळ आणि केवळ आम्ही जे काम केलं, निर्णय घेतले आणि सकारात्मकता दाखवली यामुळे झालं. मी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झालो ही ओळख निर्माण झाली. ही ओळख मला पदांपेक्षा मोठी वाटते. आम्ही नाराज होऊन रडणारे लोक नाही. काम करणारे लोक आहोत.”

महाराष्ट्रातील अनेक नेत्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी मात्र सपशेल अपयशी ठरल्याचं पाहायला मिळालं आहे.

महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपदही मिळेल की नाही? अशी एकूण स्थिती निकालानंतर निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

निकालातील जागांचा विचार करता महायुतीला या निवडणुकीत 230 जागावंर विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला मात्र अवघ्या 46 जागांवर समाधान मानावं लागलंय.

महायुतीच्या 230 जागांमध्ये भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर विजय मिळाला आहे.

महाविकास आघाडीचा विचार करता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा मिळाल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post