ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडविणारं
मतदान केंद्र ठरले मतदारांचे आकर्षण
· उदगीर येथील लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयात साकारले मतदान केंद्र
· पारंपारिक संस्कृती आणि आधुनिकतेची अनोखी सांगड
लातूर, दि. २० : निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. या उत्सवात सहभागी होणाऱ्या मतदार राजासाठी उदगीर शहरात अनोखी संकल्पना घेवून अभिनव मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयात उभारलेले हे मतदान केंद्र मतदारांचे आकर्षण ठरले.
मतदानाचा टक्का वाढवा, यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत जनजागृती करण्यात आली. यासोबतच मतदारांना मतदान करणे सुसह्य व्हावे, यासाठी मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच सखी मतदान केंद्र, युवा मतदान केंद्र, दिव्यांग संचालित मतदान केंद्र यासारख्या विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. तसेच लातूर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका अभिनव, आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती.
उदगीर येथील लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयात यापैकी एक अभिनव मतदान केंद्र उभारण्यात आले होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार आणि निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या मतदान केंद्रावर महाराष्ट्राच्या ग्रामीण परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या प्रतिकृती आणि फलक लावण्यात आले होते. ग्रामीण संस्कृती ते आजची आधुनिक जीवनशैली हा प्रवास या फलकाद्वारे उलघाडण्यात आला. दगडी जाते, पौष्टिक तृणधान्याचे महत्व सांगणारी रांगोळी आणि मिलेट हाऊसची प्रतिकृती, बैलजोडीची प्रतिकृती याठिकाणी ठेवण्यात आली होती. प्रवेशद्वारापासूनच विविध सजावटीद्वारे ग्रामीण परंपरा आणि संस्कृतीची माहिती देणाऱ्या या मतदान केंद्रात येणाऱ्या मतदारांना यामुळे ग्रामीण जीवन शैलीची प्रचीती येत होती.
महाराष्ट्राची ग्रामीण परंपरा ते आजची आधुनिक महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन मतदारांना व्हावे, यासाठी या अभिनव मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. तसेच भरड धान्यांच्या जोडीला, लाकडी बैलगाडी प्रतिकृती जुन्या काळातील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले धान्य भरण्याची जाते आणि धान्य पाखडणारे सूप याबाबत युवा पिढीला व्हावी, अशी यामागील संकल्पना होती, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा उदगीरचे निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे यांनी दिली.
‘हरित लातूर’ मतदान केंद्रावर मतदारांचे उत्साहात मतदान
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील रेनिसन्स सीबीएसी इंटरनॅशनल शाळेत ‘हरित लातूर’ या संकल्पनेवरआधारित मतदान केंद्र उभारण्यात आले होते. विविध वृक्षांच्या रोपांची मांडणी, विविध जैव विविधतेच्या चित्रांची सजावट याठिकाणी करण्यात आली होती. प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्ष संवर्धन करणे आवश्यक आहे. लातूर जिल्ह्यात वृक्ष संवर्धनाचे महत्व आणि जनजागृती करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या पुढाकारातूर रेनिसन्स सीबीएसी इंटरनॅशनल शाळेत ‘हरित लातूर’ संकल्पनेवर आधारित हरित लातूर मतदान केंद्र उभारण्यात आले. हे मतदान केंद्र मोहगणी, सीताफळ, जांभूळ, रूद्राक्ष, आंबा व इतर वृक्षांच्या रोपांनी तसेच पर्यावण, वृक्ष संवर्धन जनजागृतीपर संदेशाचे फलक आणि जैवविविधतेची चित्रे, रांगोळी यांनी सजविण्यात आले होते. यामुळे मतदान केद्राचा परिसर चैत्यन्यमय वातारण निर्माण झाले होते.
आजपर्यंत कित्येक वेळा मतदान केले परंतू वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारे, हरित लातूर संकल्पनेवर आधारित मतदान केद्रावर मतदान करण्याचा प्रसंग पहिलाच आणि आनंददायी असा आहे, असे भास्कर लहाने यांनी सांगितले.