Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    मुरुड-लातूर मार्गाचे चौपदरीकरण संथ गतीने;अर्धवट कामामुळे होतायेत दररोज लहान-मोठे अपघात

     



    मुरुड-लातूर मार्गाचे चौपदरीकरण संथ गतीने;अर्धवट कामामुळे होतायेत दररोज लहान-मोठे अपघात


    मुरुड(प्रतिनिधी):- लातूर-मुरुड महामार्गाचे काम मागील अनेक दिवसांपासून अतिशय संथ गतीने सुरू आहे. पर्यायी मार्गही नित्कृष्ट बनविल्यामुळे या मार्गावर दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. यात काही प्रवाशांना जीवही गमवावे लागले आहेत. या खराब रस्त्यामुळे प्रवासी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या एका बाजुचे तरी काम पावसाळ्यापूर्वी करावे, यामुळे अपघात कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

    मागील पंचवीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूर-मुरुड-टेंभुर्णी

    महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न शासन दरबारी रेंगाळत होता. मात्र केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी तीनवेळा आश्वासन देऊन चौथ्यांदा या कामाला मंजुरी दिली. मात्र या कामात अनेक अधिकारी, राजकारण्यांना फायदा व्हावा म्हणून कामाचे तुकडे पाडण्यात आले आहेत. लातूर येथील निकी बार ते मुरुड अकोलापर्यंतचे अठरा किलो मीटरचे काम अर्धवट झाले आहे. चार पुलांचे काम संथ गतीने सुरू आहे.


    मुरुड अकोला ते बोरगाव या अकरा किलोमीटरसाठी नऊ मीटरची एक बाजू मंजूर झाली आहे. हे काम मात्र कासवगतीने सुरू आहे. मागील वर्षापूर्वी काम सुरू होऊनही अद्यापपर्यंत एक बाजू पूर्ण झाली नाही. सुरुवातीचे पाच महिने तर कंत्राटदाराकडून केवळ एक जेसीबी, दोन टिप्पर, एक बुलडोझर, दोन ट्रॅक्टर अशा किरकोळ सामुग्रीवरच ११ किलोमीटरचे काम चालू होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच या कामात ढिलाई होताना दिसून आली. मात्र मागील दोन महिन्यांपासून या कामाला पावसाळ्यामुळे झटपट उरकण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कामाच्या गुणवत्तेबाबत मात्र अनेक सामाजिक कार्यकर्ते, प्रवाशांकडून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

     या मार्गावर काम चालू असलेल्या रस्त्यालगतच पर्यायी रस्ता गुत्तेदाराने करून दिला आहे. परंतु, त्यावर प्रचंड मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यातून २० च्या गतीनेही चारचाकी धाऊ शकत नाहीत. यामुळे पंचवीस वर्षांपासून रस्ता खराब होता. त्यावेळीही अडचणींना सामोरे जावे लागत होते. आताही काम सुरू असूनही मोठ्या समस्यांना प्रवासी व वाहनधारकांना तोंड द्यावे लागत आहे.

    अनेकजण या मार्गावरील समस्यांना वैतागून बोरगाव-गाधवडमार्गे १३ किलोमीटर दूरचे आंतर कापून लातूरकडे जात आहेत. परंतु, प्रत्येकाला हे शक्य होत नाही. या ११ किलोमीटर रस्त्यावरही अर्धवट काम चालू असलेले चार मोठे पूल आहेत. लातूर-मुरुड मार्गावर ३६ किमी अंतरात आठ मोठे पूल आहेत. सर्वच पुलांचे काम अर्धवट झाले आहे. या पुलांचेही काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पावसाळा सुरू झाल्यामुळे आणखी किती दिवस हा मनस्ताप सहन करायचा, असा सवाल वाहनधारक व प्रवाशांतून उपस्थित होत आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad