दिवसभरातील ताज्या घडामोडी
🚀 भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण :
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इसरो आज आणखी एक इतिहास रचला आहे. आज भारताने पहिलं खासगी रॉकेट लाँच केलं आहे. इसरोचं पहिलं प्रायव्हेट रॉकेट श्रीहरीकोटा येथून लाँच करण्यात आलं आहे. भारताचं पहिलं खासगी रॉकेट विक्रम-एस आज सतीश धवन अंतराळ केंद्रांतून अवकाशात झेपावलं आहे. भारतासाठी हे फार मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे अवकाशात भारतासाठी नवा अध्याय सुरु झाला आहे.
😇 भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी :
भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इंदूरमध्ये बॉम्बनं उडवण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. हे इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात धमकीचं निनावी पत्र आलं आहे. दरम्यान, हे पत्र नेमकं कोणी दिलं? हे अद्याप समजलं नाही. याप्रकरणी पोलिस आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी तपास करत आहेत.
🔎 नेहरू माफीवीर:भाजपकडून कागदपत्रे जाहीर :
पंडित जवाहरलाल नेहरू हे माफीवीर आहेत. तुरुंगवास सहन न झाल्याने ब्रिटिशांची माफी मागून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली, असा आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे. त्यासाठी त्यांनी नेहरूंच्या आत्मचरित्राचा संदर्भ देत काही कागदपत्रेही सादर केली आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी अकोला जिल्ह्यातल्या चान्नी येथे सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या माफीनाम्याची कागदपत्रे सादर केली होती.
🚆 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेवर 27 तासांचा 'मेगाब्लॉक' :
उद्यापासून मध्य रेल्वेवर 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी-मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचं पाडकाम सुरु करण्यात येणार आहे. यानिमित्त मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कर्नाक पुलाच्या कामासोबत कोपरी पुलाच्या कामासाठीही वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
👍 शहरी नक्षलवाद प्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना दिलासा :
मुंबई उच्च न्यायालयाकडून आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र एनआयएनं (NIA) या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची परवानगी मागितल्यानं, हायकोर्टाकडून जामीनाच्या निकालाला आठवड्याभराची स्थगिती देण्यात आली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.