लातूर : लातूरमधील रेणापूर तालुक्यात लातूर - अंबाजोगाई महामार्गावर असणाऱ्या कोळगाव तांड्याजवळील दत्त मंदिराजवळ गवताचा भारा घेऊन निघालेल्या वृध्द शेतकरी महिलेला आयशर टेम्पोने चिरडल्याची घटना घडली. यात वृध्द शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तांड्यावरील नागरिकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाइकांसह नागरिकांनी रस्ता रोखून धरल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जावे यासाठी सद्या लातूर पोलीस प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर आहे. विविध ठिकाणी वाहतूक पोलीस नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करत आहेत. असेच एक पथक लातूर अंबाजोगाई महामार्गावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत होते. कोळगाव तांडा जवळील दत्त मंदिर येथे लातूरहून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या एका आयशर टेम्पोला त्यांनी थांबण्यासाठी सांगितले.त्यानंतर आयशर टेम्पो चालकाने पुढे गेलेला टेम्पो थोडा रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी डोक्यावर गवताचा भारा घेऊन शांताबाई चालत निघाल्या होत्या. आयशर टेम्पोच्या पाठीमागील बाजूने शांताबाई यांना जोराचा धक्का लागला आणि त्या टेम्पोच्या मागच्या चाकाखाली आल्या. शांताबाई यांना किंवा चालकाला काही समजायच्या आत टेम्पोचा चाक शांताबाई यांच्या अंगावरून गेला आणि यात त्यांचा जागीच चिरडून मृत्यू झाला. घटनास्थळी नातेवाईक गोळा झाल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला.
शांताबाई यांच्या अपघाती मृत्यूची माहिती कोळगाव तांड्यावर वाऱ्यासारखे पसरली. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. ही घटना पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच घडली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आणि दोन अडीच तास नातेवाईकांसह नागरिकांनी रस्ता रोखून धरला. त्यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक शिंदे, पोलीस कर्मचारी बाळासाहेब कन्हेरे गौतम कांबळे आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला. त्यामुळे सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चौकशी पूर्ण करून संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन नातेवाईक आणि ग्रामस्थांना दिल्यानंतर परिस्थितीतील तणाव निवळला.
No comments:
Post a Comment